अभय टिळक

गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांच्या जीवनातील एक कथा. अतिशय रम्य, बोलकी आणि आशयसंपन्न. मुळातच कमालीचे कविहृदय जन्मजात लाभलेले गुरुदेव एकेदिवशी आपल्या एका अंतरंग मित्रासह नौकाविहारासाठी बाहेर पडले. वेळ होती रात्रीच्या पहिल्या प्रहराची. शुक्ल पक्षातील रात्र आणि त्यात शरद ऋतू. पौर्णिमेला चार-दोन दिवसांचाच काय तो अवधी राहिलेला असेल. हवेत आल्हादक गारवा व पिठूर चांदण्याने सृष्टी अंतर्बाह्य़ न्हाहून निघालेली. सर्वत्र नीरव शांतता. नदीच्या प्रवाहावर हेलकावे घेणाऱ्या नावेला धडकणाऱ्या हळुवार लाटा आणि नावाडी मारत असलेले वल्हे यांचाच काय तो आवाज. गुरुदेव, त्यांचा मित्र व नावाडी असे तीनच जण नावेमध्ये. काव्यशास्त्र विनोदामध्ये टागोर आणि त्यांचा मित्र रमलेले. गप्पागोष्टींमध्ये रात्रीचा पहिला प्रहर सरला कधी ते दोघांनाही कळले नाही. माथ्यावर चंद्र चांगलाच वर येऊन शोभायमान बनला. गारठय़ाची तीव्रता अंमळ वाढल्यानंतर दोघेही मित्र नावेमध्येच तयार केलेल्या झापाच्या आडोशाला आले. नावेमधील तात्पुरत्या विसाव्यासाठी तयार केलेल्या त्या कोपीमध्ये उजेडासाठी कोपऱ्यात एक इवलीशी पणती तेवत होती. उघडय़ावरील गप्पांची मोडलेली दोन्ही मित्रांची बैठक कोपीमध्ये पुन्हा जमली. गप्पा रंगात आल्या व प्रवाहावरून आलेल्या वाऱ्याच्या मंद झुळुकीने कोपीमधील दिवली अवचितच विझली. वात शांत झाली आणि क्षण-दोन क्षणांत सगळ्या आसमंतात भरून उरला तो केवळ मृदुमुलायम चंद्रप्रकाश. बघावे तिकडे आकाशात चांदण्या चमकत होत्या. ते अनुपम सौंदर्य अनुभवून दिपलेला टागोरांचा तो मित्र म्हणाला, ‘‘ठाकुरजी, चांदणे काय देखणे पडले आहे नाही..’’ मंदसे हसून गुरुदेव उद्गारले, ‘‘मित्रा, चांदणे तर आकाशात केव्हाचेच सांडलेले आहे. आपली दिवली विझली म्हणून त्याचा साक्षात्कार आपल्याला आता होतो आहे इतकेच!’’ आपली अवस्था असते ती गुरुदेव टागोरांच्या त्या मित्रासारखीच. जगाचा कानाकोपरा चैतन्याने उजळलेला आहे, या वास्तवाची जाणीव आपल्याठायी बोथट झालेली असते; कारण आपल्या स्वतंत्र, वेगळ्या अस्तित्वाची दिवटी जाणिवेचे तेल घालत आपणच तेवती ठेवलेली असते. ‘‘व्यापिलें हें नारायणें। ऐसीं गर्जती पुराणें।’’ असे तुकोबा आपल्याला हाकारून सांगत आहेत. यच्चयावत अक्षरब्रह्माचा हाच तर उपदेश आहे, हे- ‘‘जग अवघें देव। मुख्य उपदेशाची ठेव।’’ असे तुकोबा परोपरीने बजावत राहतात. पण ते ऐकायला कोणालाही सवड आहेच कोठे? ‘स्व’च्या प्रेमामध्ये अहोरात्र आकंठ बुडून गेल्याने विश्वात्मक होऊन प्रगटलेल्या शिवशक्तीच्या अनुभूतीस वंचित होणाऱ्या समाजमनाला, म्हणूनच तुकोबा- ‘‘आधीं आपणयां नासी। तरि उतरे ये कसीं।’’ हा उपाय सुचवतात. स्वच्या पृथक जाणिवेची दिवली डोळसपणे शांत केली तरच शिवशक्तीच्या विश्व व्यापून उरलेल्या अनादी-अनंत चांदण्याचा अनुभव येऊ शकेल, हाच तुकोबांच्या सांगण्याचा इत्यर्थ. हे मर्म अचूक आकळलेले असल्यामुळेच ‘निवृत्ती’ या पदाचे विवरण- ‘‘वृत्तीचा उच्छेदु निवृत्ति तत्त्वता। सर्वही समता सांगितली।’’ अशा आशयगर्भ शब्दांत मुक्ताबाई करतात. ‘विचार’ हा ‘वृत्ती’ या शब्दाचा एक अर्थ होय. ‘मी कोणी तरी वेगळा, भिन्न, विशेष आहे’ या विचाराचा समूळ उच्छेद घडून आला तरच समता आपल्या व्यवहारामध्ये साकारेल, इतका नि:संदिग्ध सांगावा आहे मुक्ताबाईंचा. राज्यघटनेतील समतेचे तत्त्व प्रत्यक्षात कधी अवतरेल याचे हे मार्मिक सूचनच जणू!

agtilak@gmail.com