अभय टिळक agtilak@gmail.com

समाधिवस्था चिरंतन अनुभवणाऱ्या अद्वय योग्याला विश्वात सर्वत्र अनुभूती येत राहते एकात्मतेचीच. बाह्य आकार निरनिराळे दिसले तरी सर्वातर्यामी नसणारे अंतिम जीवनसूत्र एकच एक असते, ही जाणीव अंत:करणात दृढ असल्याने असा जीव मुक्त अखंड निर्द्वद्वावस्थेत जागृतीचा प्रत्येक क्षण व्यतीत करत राहतो. नाग मुदी कंकण। त्रििलगी भेदली खूण। घेतां तरी सुवर्ण । घेई जें की अशी त्या महात्म्याची जीवनरीत ज्ञानदेव वर्णन करतात ‘अनुभवामृता’च्या नवव्या प्रकरणात. दंडामध्ये धारण करण्याची नागदळ, बोटामध्ये घालण्याची अंगठी अथवा मनगटावर ल्यायचे कंकण हे तीन अलंकार अलग अलग असले तरी अंतिमत: ते सोनेच होय. ज्ञातादर्शक वरपांगाला भुलत नसतो. परमशिवाच्या विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण अशा उभय रूपांचे यथार्थ आकलन मनीमानसी स्थिरावले की वृत्ती अभेदामध्ये अंतर्बाह्य रंगते. अनंत रूपांनी विलसणाऱ्या शिवतत्त्वाच्या कुशीमध्ये आपला प्रत्येक व्यापार साकारतो आहे, ही प्रचीती हाच त्या अद्वययोग्याचा मग स्थायिभाव बनून राहतो. शिवदर्शनासाठी, अशा विभूतीला मग शिवमंदिरात जावे लागत नाही. त्याची प्रत्येक लहानसहान हेतुक-निर्हेतुक कृतीदेखील, ज्ञानदेवांच्या प्रतिपादनानुसार बनते शिवार्चना. पाऊल घालावे तिथून त्याची सुरू होते प्रदक्षिणा. घालितां अव्हासव्हा पाय। शिवयात्राची होत जाय। शिवा गेलियाही नोहे। केहि जाणें अशा शब्दांत ज्ञानदेव वर्णन करतात जीवनमुक्ताची जीवनरीत. काही मिळवण्याची इच्छा,ऊर्मी नाही आणि त्यांमुळेच काही गमावण्याची धास्ती नाही असे ते नि:शंक, निर्भय जगणे. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी। अत्तां दिवस चारी खेळीमेळीं अशी आपली जीवनावस्था तुकोबा विदित करतात ती याच भूमिकेतून. जगण्याची ती रीतच आगळी. शब्दांनी वर्णन करता न येण्याजोगी. ‘तुका म्हणे हे तों वाचे बोलवेना। बाबाजीने खुणा सांगितल्या’ असा या संदर्भातील अनुभव तुकोबा सांगून टाकतात. ती स्थिती वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात एवढेच केवळ नव्हे,तर ते ठरतात अप्रस्तुत! अनुभवाच्या त्या प्रांतात व्यवहारातील शब्दकळा शाबीत होते पुरती निर्थक. घरामध्ये आपण एका जागी स्थिर बसून राहिलो काय अथवा घरातल्या घरातच इकडेतिकडे फिरलो काय, आपण घरातच असतो. त्यामुळे ‘बसणे-उठणे-फिरणे’ या शब्दांना काही अर्थवत्ताच संभवत नाही. घरामांजी पाये। चालता मार्गुही तोचि होये। ना बैसे तरी आहे। पावणेंचि अशा शब्दांत ज्ञानदेव वर्णन करतात अद्वययोग्याची परी. अद्वयांच्या प्रांतातील ‘भक्ती’ हीच! भक्ती उरतच नाही. उरते अनुभूती ‘भक्त’ अवस्थेची. अखंड कातळातून कोरलेल्या देवालयाच्या शिल्पाप्रमाणे हा भक्तीचा व्यवहार असावा, अशी अपेक्षा आहे ज्ञानदेवांची. देव देऊळ परिवारू। कीजे कोरूनि डोंगरू। तैसा भक्तीचा व्यवहारू। कां न व्हावा? हे त्यांचे उद्गार हे त्याच अपेक्षेचे शब्दरूप. विश्वात्मकाशी तादात्म्य पावून अखंडित समाधिस्थ अद्वययोगी निरामय विचरत राहतो अगदी तसाच. तो अहंकारातें दंडुनी। सकळ कामु सांडोनी। विचरे विश्व होऊनि। विश्वाचि माजीं. ही अद्वययोग्याची ज्ञानदेवकृत शब्दप्रतिमा.

model code of conduct for general elections by central election commission
पहिली बाजू : आचारसंहिता : रोखठोक तरीही मानवी!
loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
loksatta Health Special article, nutrition, food, pregnancy period
Health Special: गरोदरपणात किती खावं? काय खावं?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!