– अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हरिदिन’ असा अन्वर्थक आणि गोड शब्द योजतात नामदेवराय ‘एकादशी’साठी. ज्ञानदेवांच्या समाधिप्रसंगाचे इत्थंभूत वर्णन करणाऱ्या नामदेवरायांच्या करुणरम्य अभंगांपैकी एका अभंगात ‘हरिदिन’ ही शब्दयोजना आढळते. तो प्रसंगही आहे भावगम्य आणि रोमांचक. ज्ञानदेवांच्या समाधीक्षणी उपस्थित राहण्यासाठी लवाजम्यासह अलंकापुरात आलेल्या पंढरीनाथाकडे ज्ञानदेव एक मागणे मागतात, असा वृत्तान्त कथन करतात नामदेवराय तिथे. ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासीं । व्रत एकादशी स्वामीकडे असे सांगत कार्तिकाच्या शुद्ध पक्षातील प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी वैष्णवमेळा पंढरीक्षेत्रामध्ये नामघोषाचा गजर करील, असे ज्ञानदेव विदित करतात पंढरीशाला. त्यानंतर पंधरवडय़ानेच येणाऱ्या कार्तिकातील वद्य एकादशीस, देवा, तुम्ही वैष्णवमेळ्यासह आळंदी क्षेत्रामध्ये येण्याचे करावे असे पांडुरंगाला जणू करारबद्धच करतात ज्ञानदेव! कृष्णपक्षीं व्रत हरिदिनी परिपूर्ण। मागितला मान ज्ञानदेवें अशा रसाळ शब्दकळेद्वारे नामदेवराय अक्षरबद्ध करतात देव-भक्तांचा तो सुखसंवाद. भक्तीच्या भावविभोर प्रांतात उमलणाऱ्या या कोवळ्या भावविश्वाला लौकिक जगातील ऐन्द्रिय अनुभवांच्या यथार्थतेचे कडवे निकष लागू करण्याचा मोह होईलही काही तर्ककठोर बुद्धिनिष्ठांना या ठिकाणी. परंतु, इथे महत्त्व आहे ते विठ्ठल मुखातून नामदेवरायांसारखा ज्ञानी आणि अनुभूतीसंपन्न सत्पुरुष वदवत असलेल्या ‘ज्ञानदेव’नामक तत्त्वाच्या विराट दर्शनाचे व्यापकत्व सम्यकपणे आकळण्याचा प्रयत्न करण्याला. ज्ञानदेवांनी सिद्ध केलेल्या गीताटीकेचे आपल्याला भावलेले अ-साधारणत्व नामदेवरायांनी मुखर केलेले आहे विष्णुस्वरूप विठ्ठलाच्या वाणीद्वारे, ही यांतील सर्वाधिक लडिवाळ बाब. तुवां जो ग्रंथानुभव। गीतेसी सांगितला भाव। तें मुख्य ठेवणें राणीव। अनुभवी जाणती हे नामदेवरायांनी प्रत्यक्ष विठ्ठलदेवाच्या मुखाद्वारे प्रगटवलेले वचन अर्थगर्भ होय. कोणत्याही वाङ्मयीन कृतीच्या रसग्रहणाचे आद्य मर्मच विशद करतात नामदेवराय या प्रसंगी. ‘ज्ञानदेवी’ ही गीतेवरील निव्वळ प्रतिपद शाब्दिक मल्लीनाथी नव्हे तर, ज्ञानदेवा, तुझा गीतानुभवच तू प्रचीतीयुक्त शब्दमाध्यमाद्वारे प्रगट केलेला आहेस, असे कथन मांडतात नामदेवराय ‘ज्ञानेश्वरी’संदर्भात पांडुरंगाच्या माध्यमातून. ग्रंथगत अक्षरांच्या रूपाने प्रगटलेला ग्रंथकर्त्यांचा अनुभव अनुभवविश्वाशी तादात्म्य पावतो त्या वेळी संबंधित ग्रंथ खऱ्या अर्थाने ‘आपलासा’ होतो, हे सांगायचे आहे नामदेवरायांना इथे. पारायण करत असलेल्या ग्रंथातील अक्षरांना ‘भाव’ म्हणजे स्वानुभवाद्वारे अर्थवत्ता तेव्हाच प्राप्त होत असते, हे यांतील गुह्य़. तो अनुभव असतो निखळ व्यक्तिगत. त्याची देवाणघेवाण शक्यच नसते. पठनाद्वारे हस्तगत होणारा वाचनानंद आणि ग्रंथगत अक्षरांमध्ये वसणाऱ्या अनुभवाची वाचकाला वाचनांती लाभणारी अनुभूती तो ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येक वाचकागणिक निरनिराळ्या पद्धतीने प्रगटते त्यांमागील कार्यकारणभाव हाच. ग्रंथकर्त्यांने शब्दबद्ध केलेल्या त्याच्या अनुभवाशी वाचकाच्या अनुभवाचे सूर जुळले की तिथे साकारते साम्राज्य त्या तादात्म्याद्वारे उमलणाऱ्या सानुभूत आनंदाचे. ‘राणीव’ हा ‘साम्राज्य’वाचक शब्द नामदेवरायांनी अभंगात योजलेला आहे तो उगीच नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओंवी अनुभवावी असे ते परोपरीने विनवतात त्याचे कारणही हेच. त्यासाठी साधावा लागतो योग तन-मन-बुद्धीच्या एकात्मतेचा. तोच दिवस एकादशीचा. ‘हरी’तत्त्वाच्या निकट (उप) वास घडणे तोच होय ‘उप-वास’ आणि त्यालाच म्हणावे हरिदिन!

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak haridin worship god zws
First published on: 30-11-2021 at 01:05 IST