– अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कबीरजींच्या संदर्भात एक कथा सांगितली जाते. ती सत्यकथा आहे किंवा नाही, हे नाही सांगता यायचे. परंतु, ती बोधकथा होय हे मात्र निर्विवाद. कबीरजींना समकालीन असणाऱ्या आध्यात्मिक अनुभूतीसंपन्न अशा एका तपस्वींनी कबीरजींच्या भेटीचा मानस व्यक्त केला. मोठय़ा शिष्यपरिवारासह ते दाखल झाले परसात कबीरजींच्या. कबीरजींची आणि त्यांची डोळाभेट झाली मात्र आणि उभयतांच्या नेत्रांतून अश्रू ओघळले. पारमार्थिक अधिकारसंपन्न अशा दोन विभूतींच्या त्या भेटीदरम्यान काही तरी गहनगंभीर शास्त्रचर्चा साकारून आपले कान तृप्त होतील, अशा अपेक्षेने बसलेल्या शिष्यमंडळाची त्यांमुळे झाली पुरती निराशा. आजच्या पहिल्या भेटीदरम्यान नाही तर नाही, निदान उद्या तरी मौलिक असे काही बोधामृत कानावर पडेल, अशी आशा शिष्यवरांच्या मनी विसावली. मात्र, दुसऱ्या दिवशीही पुनरावृत्तीच झाली आदल्या दिवशीच्या प्रकाराची. भेटीच्या तिसऱ्या अंतिम दिवशीही कबीरजी आणि तो महात्मा परस्परांशी बोलले काहीच नाहीत. दोघांच्याही डोळय़ांतून अविरत वाहत राहिल्या केवळ अश्रुधारा. स्तंभित होऊ न तो सगळा घटनाक्रम सलग तीन दिवस निरखणाऱ्या शिष्यांच्या मांदियाळीतील एकाला मात्र आता राहवेना. ‘‘गुरुजी, आपण आणि कबीरजी ओळीने तीन दिवस भेटत राहिलात, मात्र एक शब्दही तुमच्यापैकी कोणीच उच्चारला नाही हे कसे? ही कसली भेट, हा कसला संवाद?’’ अशी प्रश्नांची जणू फैरच झाडली त्याने गुरुमाउलीवर. प्रसन्न हसत गुरुजी उत्तरले, ‘‘कोण म्हणते आमच्यात संवाद झाला नाही? अरे, संवादाची आमची परिभाषा निराळी होती. तुम्हाला ती कळली नाही इतकेच. आमच्या संवादाला शब्दांची गरज नसते.’’ अद्वयबोधाच्या प्रांगणातील संवाद आणि लौकिकातील संवाद या दोहोंत असलेला फरक नेमका हाच. पारलौकिकाच्या प्रांतात शब्द ठरतात अप्रस्तुत. तो सारा परिसर प्रगाढ मौनाचाच. हे सूत्र कळले-उमगले नाही तर पदरी येते निखळ आत्मवंचनाच. ‘अनुभवामृता’ची दोन प्रकरणे, म्हणूनच, ज्ञानदेवांनी वेचलेली आहेत ती ‘वाचा’ आणि ‘शब्द’ या आपल्या परिचयाच्या संवादमाध्यमांची मर्यादा स्पष्ट करण्यासाठी. अद्वयानुभूती व्यक्त करण्यास वैखरी अपयशी ठरण्याचे कारण सोपे आहे. अद्वयानंदाने भरलेले घर ज्या सुदूर प्रदेशात प्रतिष्ठित आहे तिथे वैखरीच काय पण मध्यमा, पश्यन्ती आणि परा या अन्य तीन वाचाही पांगुळतात. शब्देंवीण संवादु दुजेवीण अनुवादु । हें तंव कैसेंनि गमे । परेहि परते बोलणें खुंटलें । वैखरी कैसेनि सांगे अशा शब्दांत ज्ञानदेव आपल्यासाठी जातकुळी शब्दबद्ध करतात त्या घरातील शब्दविहीन मौनसंवादाची. माझाही नित्य निवास याच घरात असतो हेच वास्तव तर परेहुनि परतें घर । तेथें राहूं निरंतर अशा अनुभूतीसंपन्न शब्दकळेद्वारे विदित करतात नामदेवराय. तिथली बोली व भाषा आणि तिच्याद्वारे फुलणारा अ-लौकिक संवाद भावतो एकटय़ा विठ्ठलालाच. केवळ भावतो इतकेच नाही तर, त्या बोलांपायी आनंदलेले विठ्ठलतत्त्व आनंदभरित होऊन डोलायला लागते. ती भाषा मी जाणतो अशी साक्षच बोलूं ऐसे बोल ।  जेणें बोलें विठ्ठल डोले अशा निखळ शब्दांत प्रगट करतात नामदेवराय. बोलण्याची ऊर्मी मावळू लागणे हे अद्वयबोधाच्या साम्राज्याची सीमा नजीक आल्याची खूण ठरते ती अशी व यांमुळेच.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak silent dialogue spiritual experience
First published on: 27-12-2021 at 01:38 IST