अभय टिळक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तथागत भगवान बुद्धांच्या जीवनासंदर्भात एक मोठी मार्मिक कथा सांगितली जाते. भ्रमंतीदरम्यान एका नगरामध्ये तथागतांचा मुक्काम होता. नगराबाहेरून वाहणाऱ्या नदीमध्ये रोज स्नानाला जाणे हा तथागतांचा नित्यनेम. का कोणास ठाऊक, पण त्या नगरातील एक व्यक्ती बुद्धांचा दुस्वास करणारी होती. काहीही कारण नसताना तो माणूस बुद्धांचा पाणउतारा करण्यासाठी टपलेलाच असे. एके दिवशी, स्नानासाठी नदीकडे निघालेल्या तथागतांची आणि या मनुष्याची रस्त्यात गाठ पडली. आत्मचिंतनामध्ये रममाण झालेले बुद्ध संथ पावले टाकत मार्गक्रमण करत होते. तथागतांविषयीचा द्वेष मनात ओतप्रोत भरलेला तो माणूस बुद्धांना पाहून जणू बेभानच झाला. बुद्धांच्या वाटेवर आडवा येऊन तो रस्त्यातच उभा ठाकला. बेताल, अद्वातद्वा बोलत अपशब्दांची लाखोली त्याने बुद्धांना वाहिली. तथागतांच्या चित्ताचा ना तोल गेला, ना अंत:करणाची शांतावस्था ढळली. तोंडाचा पट्टा सैल सोडलेला तो माणूस तोंड फिरवून निघून गेल्यानंतर बुद्धांची पावले मार्ग चालू लागली. कशी कोणास ठाऊक, पण बुद्धांना अकारणच पाण्यात बघणाऱ्या त्या व्यक्तीला घरी गेल्यानंतर हळूहळू उपरती होऊ लागली. अपराधाची भावना त्याला पोळून काढू लागली. पश्चात्तापदग्ध अंत:करणाने तो दुसऱ्या दिवशी तथागतांची वाट बघत त्यांच्या मार्गावर भल्या पहाटेपासूनच उभा ठाकला. नित्याच्या वेळी बुद्ध स्नानासाठी नदीकडे निघाल्यावर अश्रुपूर्ण डोळ्यांनी आदल्या दिवशीच शिव्यांचा भडिमार करणाऱ्या त्या व्यक्तीने बुद्धांच्या पायांवर लोळण घेत तळमळून क्षमायाचना केली. आसवांनी पावले भिजवणाऱ्या त्या माणसाचे दोन्ही खांदे पकडून त्याला उभे करत बुद्ध म्हणाले, ‘‘अरे, काल ज्याला तू शिव्या दिल्यास तो कालचा बुद्ध कालच विलय पावला. कालचा तू कालच संपलास. आजचा हा बुद्ध नवीन आहे, आजचा तूही तितकाच नवीन आहेस. कालच्या ‘तू’ने कालच्या ‘मी’चा केलेला शिळा अपमान ‘आज’ आठवून आजचे आपल्या दोघांचे ताजे जगणे का नासवायचे..!’’ द्वैताची झाडणी घडून येऊन अद्वयभावाचे अधिष्ठान अंत:करणात स्थिर झालेल्या व्यक्तीचे प्रत्येक क्षणीचे जगणे हे असे बुद्धांसारखेच नित्य-नूतन असते. शिळ्या जगण्याचा अंश तिथे अणुमात्रही नसतो. ‘ज्ञानेश्वरी’च्या पहिल्याच अध्यायात ज्ञानदेवांनी एक कमालीचा मधुर प्रसंग गुंफलेला आहे. ज्ञानदेवांनी तिथे शब्दांकित केला आहे शिव आणि त्यांची अर्धागिनी असणाऱ्या शक्ती या उभयतांचा संवाद. अर्जुनाच्या निमित्ताने युद्धप्रसंगी प्रगट झालेल्या गीताबोधाची महती गाताना भगवान शंकरांना आलेले भरते पाहून त्याबाबतचे कुतूहल मनीमानसी दाटलेली भवानी- श्रीमद्भगवद्गीतेचे आगळेपण नेमके कशात आहे, अशा आशयाचा प्रश्न आपल्या पतीस विचारते, असा प्रसंग ज्ञानदेव तिथे चितारतात. आपल्या अर्धागिनीला वाटलेल्या विस्मयाचे निराकरण घडवून आणताना भगवान शंकरांनी दिलेल्या उत्तराचे ज्ञानदेव- ‘‘तेथ हरू म्हणे नेणिजे। देवी जैसें कां स्वरूप तुझें। तैसें हें नित्य नूतन देखिजें। गीतातत्त्व।।’’ असे शब्दांकन करतात. आपण उभयता अनादी काळापासून दाम्पत्यपणे नांदत आलेलो असलो तरी प्रत्येक क्षणी मला तुझे नूतन दर्शन घडते.. असे उत्तर भगवान शंकर त्यांच्या पत्नीला देतात. अद्वयाच्या भूमिकेवर स्थिर झालेल्या व्यक्तीस क्षणोक्षणी बदलणाऱ्या भवतालातून अनुभूती येत असते ती नित्य-नूतनाची. प्रतिक्षणी पालटणारे विश्व त्याला क्षणभंगुर नव्हे तर नित्य नवे, ताजे दिसते-जाणवते.

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh article on ever new abn
First published on: 14-01-2021 at 00:06 IST