नामदेवरायांच्या संगतीने तीर्थयात्रा करण्याचा हट्टच ज्ञानदेव धरून बसले आणि पंढरीनाथाचा वियोग होण्याची कल्पनादेखील असह्य़ होणाऱ्या नामदेवरायांचा नाइलाज झाला, हा या दोन भक्तोत्तमांच्या जीवनातील एक भावमधुर प्रसंग. तीर्थावळ करून पंढरीस परतल्यानंतर, तीर्थाटनाचा वृत्तान्तच जणू एक प्रकारे पांडुरंगाला कथन करतेवेळी, ‘कटीतटीं जेणें  कर नाहीं ठेविले । न देखें पाउलें विटेवरी । त्यांतें म्हणता देव लाजे माझे मन । ते कष्ट दारूण कवणा सांगूं’ असे  भावगर्भ उद्गार नामदेवरायांच्या मुखातून बाहेर पडतात. ज्या देवाच्या गावी वैष्णवांचा मेळा नाही, पताकांचे भार, कुंचे नाहीत, हरिकथेचा सुकाळ जिथे नाही, अशा देवाच्या दिशेने माझी ना पावले वळतात ना माझे हात अशा देवाची पूजा करण्यासाठी सरसावतात, अशी आत्मस्थितीही नामदेवराय प्रांजळपणे कथन करतात. श्रीविठ्ठलाची अशी अव्यभिचारी भक्ती ज्यांच्या अंत:करणामध्ये  सर्वकाळ दाटलेली असे नामदेवराय, ‘नामा म्हणे येथें दुजा नको भाव । विष्णु तोचि शिव शिव विष्णु’ अशी ग्वाही देतात तेव्हा अपूर्व अशा मन्वंतराचे सूचन त्या बिंदूवर घडत असते.  उभ्या साधनाविश्वाच्या केंद्रस्थानी शिवासह विष्णुतत्त्वाचीही स्थापना होणे, ही सहजी साध्य होणारी बाब नव्हे. एकाच परतत्त्वाचे हे दोन अवतार असून ते एकरूप होत, हे शाश्वत सत्य, ‘नामा म्हणे शिव विष्णु एकरूप। ताराया अमूप अवतार’ इतक्या नितळ शब्दांत नामदेवरायांसारख्या एकांतिक वैष्णवाने प्रस्थापित केल्याचाच तो परिपाक म्हणायचा. या भूमीत नांदत आलेल्या परंपरागत दर्शनविश्वामध्ये वारकरी दर्शनाचा प्रगल्भ असा जो नूतन प्रवाह खळखळू लागला त्याचा हा उगमबिंदू ठरतो. ज्या रमावराचे ध्यान कैलासीचा राणा अहर्निश ध्यात असतो त्याचाच नामघोष भागवत धर्म करत असल्याने, वस्तुत:, शिव आणि विष्णू या एकाच तत्त्वाच्या दोन प्रगट रूपांचे स्मरण उपासनेच्या या प्रवाहाद्वारे घडत राहते, ही भूमिका लोकमानसामध्ये बिंबली ती शिव आणि विष्णू यांच्या अशा समन्वयामुळेच. शिव आणि विष्णू यांच्या समन्वयाचा आणि त्यातून पुढे बहरलेल्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृष्ण-विठ्ठलभक्तीचा नामदेवरायांपर्यंतचा प्रवास त्याआधीच्या दोन टप्प्यांचे आकलन करून घेतल्याखेरीज उलगडणार नाही. गहिनीनाथ हा त्या प्रवासाचा आद्य टप्पा. नामसंकीर्तनरूपी यज्ञसाधनेचा पुरस्कार श्रीमद्भागवतामध्ये उच्चरवाने करणाऱ्या नारायणांचे उत्तरावतार म्हणजे गहिनीनाथ, अशी परंपरेची धारणा होय. नाथयोगी आणि श्रीमद्भागवतातील नवनारायण यांच्या समरूपत्वाचा हा दाखला. साहजिकच, कृष्णभक्तीचा असा गहिनीनाथकृत पुरस्कार निवृत्तिनाथांपासून पुढे क्रमाने पाझरत राहावा यात अतक्र्य असे काहीच नाही. ‘निवृत्तीचे ध्येय कृष्ण हाचि होय। गयनिनाथे सोय दाखविली’ अशा निखळ शब्दकळेद्वारे कृष्णोपासनेचा आपल्या गुरूंकडून लाभलेला वारसा निवृत्तिनाथ प्रगट करतात. ‘यज्ञांमध्ये जपयज्ञ ही माझी विभूती होय’, असे श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण जे कथन करतात त्याची आंतरसंगती आता स्पष्ट व्हावी. ज्याने अर्जुनाला गीताबोध केला तोच कृष्ण परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये विटेवर उभा आहे, हे सूत्र, ‘गीता जेणें उपदेशिली । ते हें विटेवरी माऊली’ अशा शब्दांत तुकोबा मांडून दाखवितात, तर ‘निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज । गयनीराजे मज सांगितले’ असे कथून शिव—विष्णू—कृष्ण—विठ्ठल यांच्या समन्वयाचा गोफ निवृत्तिनाथ गुंफून पूर्ण करतात.

– अभय टिळक agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh article zws
First published on: 09-03-2021 at 00:05 IST