रेघ

नामधारकाची जात अगर वर्ण याला काडीइतकेही तिथे महत्त्व नाही, असे- ‘‘तुका म्हणे याती। हो का तयाची भलती।

संतमंडळाने आध्यात्मिक लोकशाहीचा पुकारा केला, असे एक प्रमेय सतत मांडले जाते. परंतु या विधानाचा अर्थ तारतम्यानेच समजावून घ्यावयास हवा. समतेची हाक पंढरीच्या वाळवंटात देणाऱ्या भागवतधर्मी संतमंडळाने भक्तीच्या, परमार्थाच्या क्षेत्रात जातविचार आणि वर्णविचार अप्रस्तुत ठरवला, हा संतप्रणीत आध्यात्मिक लोकशाहीचा वस्तुनिष्ठ अर्थ ठरतो. ‘‘पंढरीचा हाट कउलाची पेठ। मिळाले चतुष्ट वारकरी।’’ अशी द्वाही फिरविणाऱ्या चोखोबारायांना सूचित करावयाचे आहे नेमके तेच. वर्णाभिमानाला तिलांजली देत चारही वर्णामधील साधक, विटेवरील आपले समचरण आणि अखिल विश्वावर प्रेमाचा वर्षांव करणारी स्नेहाळ समदृष्टी यांद्वारे समतेचा संदेश देणाऱ्या पंढरीनिवासी पांडुरंगाचे वारकरी बनून वाळवंटात समरस बनलेले आहेत, हे चोखोबाराय दवंडी पिटून सांगतात. उपजीविकेशी व पर्यायाने लौकिक-भौतिक जीवनाच्या सातत्याशी सांगड घातली गेलेली जातव्यवस्था पूर्णपणे मोडीत काढणे संतपरंपरेला त्या काळात सर्वथैव अशक्यच होते. त्यामागील कारणांची मीमांसा हा स्वतंत्र चिकित्सेचा प्रांत होय. त्याच्याकडे वळण्याचे इथे कारण नाही. त्यामुळे, परतत्त्वाच्या उपासना प्रांतात तरी लहान-थोर, पवित्र-अपवित्र, उंच-नीच, सवर्ण-अवर्ण यांसारखे भेद व त्यांतून उद्भवणारी द्वंद्वे अप्रस्तुत ठरवत संतमंडळाने, त्या काळात जे व जेवढे करणे शक्य होते तेवढे केले. एकदा का पंढरीनाथाशी आणि अमृताहूनही गोड असणाऱ्या त्याच्या नामाशी बांधिलकी स्वीकारली, की लौकिकातील जात-वर्णविचाराशी संबंधित श्रेष्ठ-कनिष्ठ भावनेला आचारविचारामध्ये थारा उरत नाही, हे भागवतधर्माने प्रवर्तन घडविलेल्या आध्यात्मिक लोकशाहीचे मर्म. ‘‘तुका म्हणे नाहीं जातीसवें काम। ज्याचे मुखीं नाम तोचि धन्य।’’ इतकी सरळ, स्वच्छ व नि:संदिग्ध भूमिका आहे तुकोबांची या संदर्भात. पंढरीनाथाचा सेवक अगर निका वैष्णव बनण्यास शुद्ध भाव आणि नामभक्तीबाबत एकविध निष्ठा एवढेच काय ते भांडवल पुरेसे आहे, नामधारकाची जात अगर वर्ण याला काडीइतकेही तिथे महत्त्व नाही, असे- ‘‘तुका म्हणे याती। हो का तयाची भलती।’’ इतक्या ठणठणीत शब्दांत विदित करणारे तुकोबा आध्यात्मिक लोकशाहीच्या प्राणतत्त्वाकडे संकेत करतात. राज्यघटनेशी बांधिलकी जपणारा आजचा नागरिक लोकशाही राज्यव्यवस्थेचा सच्चा पाईक गणला जातो, तसेच हे. समतेची दीक्षा देणाऱ्या वाळवंटात कुळजातीवर्णजन्य अहंकारातून मुक्त झालेला जो  पाऊल टाकतो, त्याच्याकडे बघण्याची आपली दृष्टी- ‘‘जातनसुं मुजे कछु नहि प्यार। असतेके नहिं हेंदू धेड चंभार।’’ अशा नितळ शब्दांत स्पष्ट करणारे तुकोबा, एक प्रकारे आध्यात्मिक लोकशाही व राजकीय लोकशाही या दोहोंतील एका समान सूत्राकडेच निर्देश करत असतात. जात-धर्म-वर्ण-प्रांत-भाषा-पंथ यांशी संलग्न विचारधारेचे प्रामाण्य व्यक्तीने तिच्या खासगी जीवनात फार तर जपावे; व्यापक लोकव्यवहारामध्ये मात्र तसा संकुचित विचार अप्रस्तुतच ठरवला गेला पाहिजे, हे ते सूत्र. जातवर्णसंबद्ध विचारांना आध्यात्मिक क्षेत्रात पाय घालण्यास अटकाव करणारी पहिली लक्ष्मणरेषा आखली संतांनी. ‘एक व्यक्ती एक मत’ हे सूत्र जपणाऱ्या राजकीय लोकशाहीचा घोष राज्यघटनेद्वारे करत घटनाकारांनी रेखाटली दुसरी रेषा. आता, जात-वर्ण-धर्म यांवर आधारित संकुचित विचार समाजजीवनात अप्रस्तुत ठरवणारी तिसरी रेघ आपण कधी आखणार?

अभय टिळक agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध ( Advayabodh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta advayabodh religion spiritual article zws70

Next Story
मग अपेक्षित स्वीकारिती। शाश्वत जें…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी