एकरूप

शिव आणि विष्णू या दोन तत्त्वांमधील अद्वयाचे नाते उलगडून मांडताना नामदेवरायांनी योजलेले शब्दलाघव जितके लोभस, तितकेच आशयगर्भही

(संग्रहित छायाचित्र)

 

अभय टिळक

शिव आणि विष्णू या दोन तत्त्वांमधील अद्वयाचे नाते उलगडून मांडताना नामदेवरायांनी योजलेले शब्दलाघव जितके लोभस, तितकेच आशयगर्भही. वरकरणी दोन रूपांनी प्रगटन होत असले तरी मुळात तत्त्व एकच असल्याने ‘भजन करारे हरिहरा। नारायण शिवशंकरा। माझें बोलणें अवधारा। भेद न करा दोघांचा।’ अशी विनवणी नामदेवराय करतात. शिव व विष्णू या उभय तत्त्वांचे हेच एकरूपत्व ‘उजवें वामांग। तुका म्हणे एकचि अंग।’ असे तुकोबा वर्णून सांगतात. एकाच अस्तित्वाची ही दोन अंगे असल्याने एका अंगात घडून आलेल्या बदलांचे पडसाद दुसऱ्या अंगावर उमटावेत, हे स्वाभाविकच. शिवाला ‘कर्पूरगौर’ असे नाव आहे ते त्याच्या गौर वर्णापायी. तर शिवाला मस्तकी धारण करून पंढरीत विटेवर उभ्या ठाकलेल्या विठ्ठलाला ‘पांडुरंग’ अशा नावाने बाहले जाते. ‘पांडुरंग’ हेही सूचन पुन्हा शुभ्रवर्णाचेच. खिल्लारे चारत गोकुळ-वृंदावनामध्ये बागडलेले बाळकृष्णरूपच विटेवर भक्तराज पुंडलिकरायासाठी समचरण विठ्ठलरूपाने उभे ठाकले असल्याचा दाखला ‘पुंडलिकाच्या भावार्था। गोकुळींहुनीं जाला येता’ अशा शब्दांत ज्ञानदेव देतात. यमुनातटीची पांढरी माती गोखुरांखालून उधळून गोधनामागे हिंडताना घामेजलेल्या कृष्णतनूवर साचल्याने मुळातील मेघश्यामवर्ण हरी ‘पांडुरंग’ बनला, असे स्पष्टीकरण यासंदर्भात दिले जाते. तेच ‘पांडुरंग’स्वरूप गोकुळाहून पुंडलिकरायासाठी थेट भीमेतटी येऊन विटेवर उभे ठाकले, असा हा ‘बाळकृष्ण’ व ‘विठ्ठल’ या दोन रूपांच्या प्रगटीकरणाचा आणि विठ्ठलाच्या ‘पांडुरंग’ या अभिधानाचा जैविक संबंध. असे असले तरी मुळात शिव हा गौरकांती का आणि विष्णूच्या बाळकृष्णावताराचे उत्तररूप असणारा विठ्ठल सावळा का, हे कुतूहल उरतेच. ‘नारायणें सेविलें अमृत। झाला तो महादेव। शंभूनें गिळिलें हलाहल। म्हणोनि विष्णु झाला निळा’ असा नामदेवरायाचा या संदर्भातील बिनतोड सांगावा. हे झाले स्पष्टीकरण शिव व विष्णू या दोन तत्त्वांच्या बाह्य़रूपाबाबतचे. या उभयतांच्या शिकवणुकीमध्ये असणारी एकवाक्यताही नामदेवराय अधोरेखित करतात. एकटा असणारा एकल परमशिवच विश्वरूपाने प्रगटलेला आहे, हा शांभवाद्वयाचा आद्य सिद्धान्तच ‘एकट येकला सर्व हें सकळा। आपणची झाला विश्वहरी’ अशा नेमक्या शब्दांत विदित करत, नेमके हेच सारभूत तत्त्व श्रीमदभगवद्गीतेत श्रीहरी सांगत असल्याचे सूत्र ‘न कळे याची माव कैसा आहे भाव। सर्वाभूतीं देव गीता सांगे’ अशा मार्मिकपणे नामदेवराय विशद करतात. शिवाने अर्धागिनीच्या कानात प्रगट केलेले शांभवाद्वयाचे गु तत्त्व करभाजन नारायणाचे उत्तरावतार असणाऱ्या गहिनीनाथांच्या आज्ञेनुसार ज्ञानदेवांच्या माध्यमातून निवृत्तिनाथांनी उघडपणे प्रसृत केले. त्यासाठी ज्ञानदेवांनी आधार घेतला तो गीताबोधाचा. गंमत म्हणजे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने केलेल्या जीवनबोधाचे शब्दरूप म्हणजे गीता. म्हणजे शक्तीच्या निमित्ताने शिवमुखातून प्रगटलेला शिवबोध आणि अर्जुनाच्या मिषाने कृष्णमुखातून स्रवलेला कृष्णबोध यांचा कल्याणप्रद ठेवा ‘श्रीमदभगवद्गीता’ नामक शब्दगंगेच्या रूपाने प्रगट होऊन खळाळला नसता तर गुह्य़च राहता, हे वास्तव ‘गीता हेचि गंगा गुभाव पैं गा’ असे अक्षररूप लेवून नामदेवरायांच्या मुखातून प्रगटते. विश्वकल्याणाची प्रेरणा हाच स्थायीभाव असलेल्या परतत्त्वाचे ‘शिव’ हे अभिधान म्हणूनच सार्थ होय, असे ‘शिव ऐसा शब्द कल्याणदायक’ अशा शब्दांत नामदेवराय गर्जून सांगतात ते म्हणूनच.

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध ( Advayabodh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta uniform advayabodh article abn

Next Story
गोफ
फोटो गॅलरी