पंढरपूरनिवासी पंढरीशाला मातेच्या रूपात स्तवत एका मोठ्या गोड अभंगात तुकोबाराय मांडतात ‘गोंधळ’. सुदिन सुवेळ। तुझा मांडिला गोंधळ वो। पंच प्राण दिवटे। दोनी नेत्रांचें हिलाल वो हा त्या अभंगाचा पहिला चरण. देवीच्या स्तुतीचा एक उपासनाविधी म्हणजे ‘गोंधळ’. स्वानंदाचें ताटीं। धूप दीप पंचारती वो। ओवाळिली माता। विठाबाई पंचभूतीं वो असा या अभंगाचा पाचवा चरण तर फारच बहारदार आहे. कुळीचा कुळदेव असलेल्या विठ्ठलदेवाचे आराधन तुकोबारायांनी देवीस्वरूपात मांडावे याला फार विलक्षण अर्थ आहे. तो समजायचा तर विटेवर उभ्या ठाकलेल्या पांडुरंगाचे ‘दर्शन’ आपल्याला तुकोबांच्या नजरेतून घडावयास हवे. ते तर महाकठीण. तुकोबांच्या दृष्टीने पंढरीक्षेत्रामध्ये विटेवर साकारलेले परतत्त्व म्हणजे विलोभनीय त्रिवेणीसंगमच जणू. निवृत्तिनाथांच्या निर्वाळ्यानुसार, पुंडलीकरायासाठी भीमेतटी अवतरलेले बालकृष्णरूपातील भगवान विष्णू विटेवर उभे आहेत ते त्यांचे परमप्रिय भक्तराज भगवान शंकरांना माथ्यावर धारण करून. निवृत्तिनाथांची परंपरा नाथसंप्रदायाची म्हणजेच तत्त्वश: शैवागमाची. शक्तिमय शिव हे तर नाथसंप्रदायाचे अधिष्ठान. म्हणजेच, भीवरेतटी उभ्या पंढरीनाथाकडे ज्ञानोबा-तुकोबांच्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न केला तर दर्शन होईल तीन दैवततत्त्वांचे. विठ्ठलरूप धारण केलेले भगवान विष्णू आणि त्यांनी परमप्रेमाने मस्तकी धारण केलेले ‘शक्ति’मान भगवान शिव ही ती तीन तत्त्वे. विठ्ठलाचे असे ‘दर्शन’ घडण्यासाठी दृष्टीवर संस्कार हवा तो अद्वयाचाच. तो संस्कार दृढ असल्यामुळेच, रंगा येई वो ये रंगा येई वो ये । विठाई किठाई माझें कृष्णाई कान्हाई ये अशी साद घालतात ज्ञानदेव विठ्ठलाला. ज्ञानदेवांच्या त्या बहाण्यातील ‘रंगा’ हे पूर्वपद म्हणजे ‘पांडुरंग’ या विठ्ठलनामाचे लडिवाळ लघुरूप. हे नाम पुरुषतत्त्ववाचक. तर, ‘विठाई’, ‘किठाई’, ‘कृष्णाई’, ‘कान्हाई’ ही सारी त्याच विठ्ठलदेवाची स्त्रीतत्त्ववाचक नामावली. विष्णु-शिवस्वरूप पांडुरंग हे पुरुषतत्त्व आणि शिवासह अभिन्नत्वाने नांदणारी शक्ती यांचे सम्यक् दर्शन म्हणजे श्रीविठ्ठल. विठ्ठलाच्या पुरुषांशाला आवाहन करायचे ते ‘रंगा येई वो’ म्हणत, तर, त्याच्या स्वरुपातील स्त्रीअंशाचे माहात्म्यवर्णन करायचे ते ‘विठाई’ अशा लाघवी उद्बोधनाने. विठ्ठलरूपाद्वारे अर्धनारीनटेश्वराचे स्मरण ज्ञानोबा-तुकोबा घडवतात ते असे. दृश्य जगत हे, शैवागमानुसार, शक्तिमय शिवाचे प्रगट विलसन. विश्वोत्तीर्ण शिवाचे ते होय विश्वात्मक शक्तिदर्शन. म्हणूनच, स्वानंदाच्या ताटामध्ये धूपदीप सिद्ध करून तुकोबाराय ओवाळतात ते पंचमहाभूतात्मक विठामातेला. तर, सर्वकळासंपन्न। मंजुळ बोले हास्यवदनीं वो। बहु रूपें नटली। आदिशक्ति नारायणीं वो अशा शब्दांत तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबा निर्देश करतात बहुरूपाने नटून विश्वात्मक प्रगटलेल्या आदिशक्तीकडे. इतकेच नाही तर, घटस्थापना केली। पंढरपुरमहानगरीं वो। अस्मानी मंडप दिला। तिन्ही ताळांवरी वो। आरंभिला गोंधळ इनें। चंद्रभागेतिरीं वो। आली भक्तकाजा। कृष्णाबाई योगेश्वरी वो अशा विलक्षण शैलीत विठाईच्या घटस्थापनेचे रम्य वर्णनही साकारतात आपल्या पुढ्यात कान्होबाराय. इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तीन तत्त्वांच्या संयोगाने योगसंपन्न असे हे शक्तितत्त्व असल्यामुळेच विवेकाचा जागर-गोंधळ उभा केला तिचे उपासक असणाऱ्या संतसात्त्विकांनी. नवरात्र हे तर प्रतीक त्याच जागराचे. – अभय टिळक

agtilak@gmail.com