विवेकसेतू

विवेक सेतू त्यांनीं बांधिला उतरून गेले शायीरे अशा शब्दांत नाथराय विशद करतात डाव जिंकण्यासाठी संतविभूतींनी अंगीकारलेल्या व्यूहरचनेचा. ‘आडवा होणारा’, ‘टेकणारा’ हे अर्थ होत ‘शायी’ या शब्दाचे.

या मराठी मुलखात संतमंडळाने आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित केली, हे विधान सर्वथैव सार्थ असले तरी संतचळवळीने साकारलेल्या अचाट उद्योगाचे सर्वंकष रूप-स्वरूप काही त्यांतून सूचित होत नाही, हेही तितकेच खरे. कारण, अध्यात्माच्या प्रांतात लोकशाहीची निव्वळ चौकट उभारून भागणारे नव्हते. आध्यात्मिक लोकशाहीचा व्यवहार जनसामान्यांना समजावून सांगणारी संकल्पनात्मक परिभाषा प्रचलित व्यवहारभाषेमध्ये मांडत जनमानसाची आध्यात्मिक प्रजासत्ताकात्मक साक्षरता सुदृढ बनविण्यासाठी साधनसामग्री निर्माण करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे होते. हे, त्या मानाने अवघड काम लीलया पार पाडले ते नाथरायांच्या रूपकांनी. कमालीची कल्पक आणि तितकीच अर्थवाही रूपके रचण्यामध्ये नाथांचा हात कोणीच धरणार नाही. लोकव्यवहारातील अक्षरश: अनंत चीजांना रूपकांचा साज चढवत एरवी क्लिष्ट भासणाऱ्या पारमार्थिक संज्ञा-संकल्पना सर्वसामान्यांच्या मनोविश्वात प्रतिष्ठित करण्याद्वारे आध्यात्मिक लोकशाहीच्या मूल्यतत्त्वांनी समाजमन सिंचित बनविण्याचे महत्कार्य पार पाडले ते नाथांच्या रूपकांनी. आपल्याला सर्वपरिचित असणाऱ्या हुतुतूच्या खेळाचे रूपक असेच एका ठिकाणी योजतात नाथराय. ज्ञान आणि अज्ञान, वैराग्य आणि विवेक, राम व रावण, हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद, कौरव-पांडव अशा भिडूंचा सहभाग आहे या हुतुतूच्या सामन्यांमध्ये. या विश्वाचे सर्वसत्ताधीश आदिकारण असणारे परतत्त्व या सामन्यांचे आयोजन करणारा खेळिया होय, ही नाथांच्या या रूपकातील मध्यवर्ती संकल्पना. खेळ अपरिमित रंगतो. आपल्या पित्यावर डाव फिरवत भगवद्भक्त प्रल्हाद पकडीमध्ये न गवसता अलगद बाजी मारून जातो. राम आणि रावण या दोन प्रतिस्पध्र्यांच्या रंगलेल्या डावात रावणबंधू कुंभकर्ण आणि रावणपुत्र अखया व इंद्रजीत बाद होत डाव हरतात… असे या खेळाचे मोठे हृद्य समालोचन नाथ रंगवून मांडतात. हे सगळे संघ बाद झाल्यानंतर, अंतिमत:, मैदानात उतरतात खुद्द संत-महंत आणि हुतुतूचा त्यांचा डाव रंगतो दस्तुरखुद्द परतत्त्वाबरोबरच. इथे मात्र डाव जिंकतात विदेही संत! एका जनार्दनीं हुतुतु खेळतां मन जडलें हरि पायी रे । विवेक सेतू त्यांनीं बांधिला उतरून गेले शायीरे अशा शब्दांत नाथराय विशद करतात डाव जिंकण्यासाठी संतविभूतींनी अंगीकारलेल्या व्यूहरचनेचा. ‘आडवा होणारा’, ‘टेकणारा’ हे अर्थ होत ‘शायी’ या शब्दाचे. थेट परतत्त्वानिकट टेकणारा विवेकरूपी सेतू सिद्ध करून संतमहंतांनी ‘श्रीहरी’नामक मोहराच अचूक टिपला, आपलासा केला हे आहे नाथांचे कथन. प्रतिस्पर्धी भिडूंचे कडे भेदून मध्यरेषेपर्यंत झेपावण्यासाठी पट्टीचा हुतुतूपटू ज्याप्रमाणे भुईला समांतर झेप घेत सूर मारतो अगदी तसाच नम्र पवित्रा धारण करत विरागी संतांनी डाव जिंकला. भक्तीच्या अवलंबनाने साधक लीन बनतो याचे सूचन भक्ति तें नमन वैराग्य तो त्याग। ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु अशा शब्दांत तुकोबाराय घडवतात त्यांतील मुख्य गमक हेच. किंबहुना, वैराग्याची परिणती ज्या विरक्तीमध्ये घडून येते त्या विरक्तीचे मूळही भक्तीच होय, असा दाखला बहेणि म्हणे भक्ति विरक्तीचे मूळ। चित्त हे निश्चळ करी का रे अशा शब्दांत बहेणाबाई का देतात त्याचा उलगडा आता येथे सहजच व्हावा. विरक्तीचे ठाण अंत:करणात पक्के झाले की असाराबाबतची आसक्ती सहजच गळून जाते. भक्ति ते विरक्ति सत्य खरी असे बहेणाई जे बजावतात त्यांमागील कार्यकारणसंबंध हा असा आहे. – अभय टिळक

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध ( Advayabodh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Spiritual democracy established by sant mandal in marathi origin akp

Next Story
मंत्री-मंत्रणा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी