जुंझार ते एक विष्णुदास जगीं। पापपुण्य अंगीं नातळे त्या… संघर्ष कोणालाच चुकत नसतो. मग तो मनुष्य संसारी असो अथवा संन्यस्त. संसारी माणसाची लढाई त्या मानाने फार सोपी. शत्रू कोण आणि मित्र कोण याचा निवाडा त्या मानाने झटदिशी करता येतो. मुख्य म्हणजे शत्रू प्रगट असतो आणि तो उघड उघड हल्ला करतो. संन्याशाचे युद्ध असते ते अंत:शत्रूंशी. मनबुद्धीमध्ये दबा धरून बसलेले ते अप्रगट, मायावी आणि सूक्ष्म शत्रू कमालीचे घातक. अशा अंत:शत्रूंवर विजय प्राप्त केला म्हणूनच तर ‘महावीर’ हे बिरूद लाभले वर्धमान महावीरांना. अहिंस हे सर्वोच्च मूल्य मानणारे महावीर त्या खालोखाल महत्त्व देतात ते अंत:विजयाला. बाह्य शत्रूंवर विजय मिळवल्याने शत्रू वाढतच राहतात तर, अंत:शत्रूंचा नि:पात केल्याने शत्रुत्वाच्या भावनेचाच अंत होतो, हाच सिद्धान्त मांडत राहिले वर्धमान महावीर जीवनभर. भागवतधर्मविचाराचा प्रचार-प्रसार या मराठी भूमीमध्ये १३व्या शतकापासून साकारत आला तोच मुळी संघर्षमय परिस्थितीच्या पाश्र्वपटावर. ज्ञानेश्वरादी भावंडे नामदेवरायांसह वैष्णवांचा मेळा सवे घेऊन १२९४ साली काशीयात्रेस प्रयाण करती झाली आणि त्याच काळात अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी देवगिरीवर धडकली. संघर्षमय पर्वाची ती ठरली नांदी. तर, इ. स. १२९७ मध्ये निवृत्तिदेव समाधिस्थ होण्याच्या दरम्यान अल्लाउद्दीन खिलजीची निर्विवाद सद्दी प्रस्थापित झालेली होती गुजरातवर. नामदेवरायांचा अवघा लोकसंग्रह साकारला तो इस्लामी सत्तेच्या सावटाखालीच. नाथांनी तर अनुभवला इस्लामच्या आधिपत्याखालील पारतंत्र्याचा ऐन माध्यान्हकाल. तुकोबांच्या रूपाने भागवतधर्मरूपी मंदिराचा कळस चढण्याच्या आगेमागे पुणे परगण्याच्या परिसरात स्वातंत्र्याची सोनपावले उमटायला सुरुवात झालेली होती शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या हिकमती पर्वाद्वारे. या रणधुमाळीचे थेट आणि स्पष्ट पडसाद भागवतधर्मी संतविभूतींच्या विचारविश्वात आणि अक्षरसाहित्यात उमटले ते ‘पाईक’ या रूपकात्मक अभंगांद्वारे. ज्ञानदेव, नाथराय आणि तुकोबा या तिघांनीही ‘पाइकी’च्या अभंगांची रचना करावी यांत निव्वळ योगायोग नाही तर, एक विलक्षण अंत:सूत्र आहे. या तीनही लोकोत्तर विभूतींच्या वाट्याला आला अपार संघर्ष. तोही  दुहेरी. अवघे जगणे जायबंदी करणारे आघात पदोपदी सोसायला भाग पाडणारा. जीवा ही आगोज पडती आघात । येऊ नियां नित्य नित्य करी ही तुकोक्ती त्याच वास्तवाचे शब्दरूप. ‘मोठे’, ‘भयंकर’ हे ‘आगोज’ या शब्दाचे अर्थ. वर्धमान महावीरांना अभिप्रेत असलेला अंत:विजय हस्तगत करण्यासाठी उघडावी लागणारी आघाडीदेखील तितकीच भरभक्कम हवी. प्रसंगी लावावे लागेल प्राणांचे मोलही. तुका म्हणे व्हावें देहासी उदार। रकुमादेवीवर जोडावया हे तुकोबांचे अनुभूतीपूर्ण शब्द निर्देश करतात त्याच वास्तवाकडे. भागवतधर्मप्रणीत भक्तितत्त्वाचे जणू अस्तरच शोभावे असे शक्तितत्त्व इथे साहाय्यभूत ठरले संतांच्या मांदियाळीला. सगळ्यांत अवघड लढाई शाबीत होते ती द्वंद्व-द्वैतावर विजय मिळविण्याची. ती जिंकतो तोच खरा शक्तिमान झुंझार म्हणावा. जुंझार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां अशा शक्तिभारित शब्दकळेने तुकोबा निर्देशित करतात नेमके तेच ‘महावीर’त्व. शैवागमोक्त शक्तितत्त्वाचे अध्यात्मव्यवहारातील उपयोजन हे असे होय.   – अभय टिळक

agtilak@gmail.com