‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होत असताना जाणवत राहतात ती, या चित्रपटातील मूल्ये! जागतिकीकरणानंतर आणि व्यक्तिवादी वातावरणात भारतीयता टिकवायची कशी, याचे या चित्रपटाने दिलेले सोप्पे उत्तर आजच्या तरुणांनाही हवेसे वाटते का?
यौवनात पदार्पण केलेले ते दोघेही भारतीय बनावटीचे. परदेशात त्यांची भेट होते, प्रेमात पडतात. मुलीचे लग्न भारतीय परंपरेनुसार तिच्या वडिलांनी मित्राच्या मुलाशी आधीच ठरवलेले. आता वडिलांचे ऐकायचे की प्रेमाच्या आतल्या आवाजाला साद घालायची, अशा संकटात सापडलेल्या या मुलीला तिचा प्रियकर सांगून-सवरून जाहीरपणे लग्नघरातून पळवून नेतो. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या एकविशीत आलेल्या चित्रपटाची ही कथा म्हणाल तर एवढीच. हिंदी चित्रपटाच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत चिकटलेला प्रेम हा विषयच याही चित्रपटाच्या केंद्रस्थानी. फरक एवढाच, की या कथेची पाश्र्वभूमी निराळी होती. परदेशाच्या वातावरणात ही प्रेमकथा फुलत जाते आणि अस्सल भारतीय परंपरेत तिचा शेवट होतो. चित्रपटातील ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ हे काही भारतीय प्रेक्षकांना नवे नव्हते, ना चित्रपटातून घडणारे परदेश दर्शन. ‘दिलवाले’मध्ये फरक होता तो असा की, त्यातील नायक-नायिका परदेशात असले, तरीही त्यांच्या भारतीय मनोवृत्तीतून ते बाहेर आलेले नाहीत. या चित्रपटाने भारतीय चित्रपटाच्या इतिहासात मैलाची खूण प्रस्थापित केली, याचे कारण त्यातील मूल्यसंघर्षांने प्रेक्षकांना पकडून ठेवले. त्याआधी ‘पूरब और पश्चिम’सारख्या चित्रपटातून परदेशाचे दर्शन घडवून मातृभूमीचे प्रेमच कसे महान असते, असे बटबटीतपणे सांगण्याचा प्रयत्न झाला होताच. पण ‘दिलवाले’ हा चित्रपट तयार होत असताना भारतातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलू लागली होती. जागतिकीकरणाच्या चाहुलीनंतर मूल्यांचे संघर्षही उभे राहू लागले होते. एका अर्थाने सांस्कृतिक वातावरणही ढवळून निघत होते आणि त्यामुळे चित्रपटाच्या कथेचा गाभा जरी तोच असला, तरी त्याची पाश्र्वभूमी मात्र बदलत चालली होती. प्रेम करणारे युगुल विरुद्ध कुटुंबव्यवस्था हा संघर्ष भारतीय चित्रपटांनी अनेकदा रंगवला. ‘बॉबी’, ‘एक दूजे के लिये’, ‘मैंने प्यार किया’, ‘प्रेमरोग’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत प्रेम विरुद्ध कुटुंब अशी स्थिती होती. ‘दिलवाले’मध्ये मात्र या प्रेमाच्या संघर्षांत कुटुंबालाही सामावून घेतले गेले.
जागतिकीकरणाच्या आधी भारतातील शहरांमध्ये परदेशी वस्तू चोरटय़ा मार्गाने मिळत असत. परदेशातून मायदेशी आलेल्यांच्या घरात अशा काही वस्तू दिसत आणि त्यांचे आकर्षणही असे. त्याच काळात परदेशी वस्तू मिळण्यासाठी ‘कस्टम शॉप’ सुरू झाली. तरीही तेथील वातावरण आणि नवी मूल्यव्यवस्था याबद्दलचे आकर्षण कायमच राहिले. जागतिकीकरणाची प्रक्रिया वेगवान होत असताना, या वस्तूंबद्दलचे आकर्षण हळूहळू ओसरणे स्वाभाविक असले, तरीही विकसित देशांमधील बदलती (बऱ्याच भारतीयांच्या मते ढासळत चाललेली!) मूल्ये परंपरा रुजलेल्या भारतात चाल करून येत होती. चित्रपटाच्या माध्यमाने हे बदल फार मोठा धक्का बसणार नाही, इतक्या हळुवारपणे मांडण्याचे कसब आत्मसात केल्यामुळे प्रेमाच्याच विषयाला नव्या पाश्र्वभूमीवर सादर करणे शक्य झाले. मुलीचे लग्न वडिलांनी ठरवायचे, की तिला त्याबद्दल पूर्ण अधिकार असावा? ज्या मातापित्यांनी वाढवले, त्यांच्या शब्दाबाहेर न जाण्याचे सौजन्य दाखवायचे, की बंड करून त्याविरुद्ध संघर्ष करायचा? आधुनिकीकरणाने बदलत चाललेली विचारपद्धती स्वीकारायची, की भारतीय परंपरेचा अभिमान बाळगत त्याला कवटाळून बसायचे? असे अनेक प्रश्न ‘दिलवाले’मध्ये हाताळले गेले. एका बाजूला, वडिलांनी ठरवलेले लग्न मोडायचे तर आहे, पण न सांगता पळूनही जायचे नाही तर दुसरीकडे आपले प्रेम जाहीर करून त्या कर्मठ वडिलांना विश्वासात घेऊन, त्यांचे मन जिंकून त्यांच्या मुलीचा हात मागायचा, अशा मानसिक द्वंद्वात नायक आणि नायिका सापडलेले आहेत. एरवी पळून जाणे हाही संघर्षांचाच प्रकार. पण सांगून-सवरून अधिकृतपणे विवाह करण्याचा हट्ट बाळगणे हाही नव्या आणि जुन्या मूल्यांची सांगड घालत केलेला संघर्षच की!
एरवी घराच्या चार भिंतींत राहून जुन्या परंपरांना घट्ट चिकटून राहणाऱ्या भारतीय आईनेच या कथेत अनपेक्षितपणे आधुनिकता कशी काय स्वीकारली, असा प्रश्न तेव्हाच्या प्रेक्षकांना पडला मात्र नाही. या चित्रपटात आपण ठरवलेल्या मुलाशीच मुलीचे लग्न होईल, असा वडिलांचा चंगच असला, तरीही आई मात्र प्रेमाच्या बाजूने उभी राहते आणि आपल्याच मुलीला पळून जाण्याचा सल्ला देते, हे भारतीय मानसिकतेत न बसणारे होते. पण या चित्रपटाने तेही प्रेक्षकांच्या गळी उतरवले. बदलत्या परिस्थितीचे हे एक छोटे पण तरीही प्रभावी वळण होते. खानदानाच्या इज्जतीवरच जगणारी प्रेक्षकांची मागील पिढी आणि त्याहीपेक्षा अंतर्मनाचा कौल अधिक मोलाचा मानणारी नवी पिढी या सामन्यात मध्यस्थी करणारी आहे ती ही मुलीची आई. हे वेगळेपण सहजपणे लक्षात येणारे नसले, तरीही महत्त्वाचे मात्र आहे. सांस्कृतिक धक्केतर त्याहीपूर्वीच्या गाजलेल्या चित्रपटांनी दिलेच होते. ऐंशीच्या दशकात आलेल्या ‘आराधना’ चित्रपटात नायक-नायिका एका रात्रीसाठी अनपेक्षितपणे आणि टाळता न येणाऱ्या स्थितीत एकत्र येतात आणि त्यातून जन्माला येणाऱ्या मुलाभोवतीच्या भावनिक गुंतागुंतीची कथा गुंफली होती. काळाच्या त्या टप्प्यात भारतीय प्रेक्षकांसाठी ते सहज पचनी पडणारे नव्हते, तरीही त्या चित्रपटाने अफाट लोकप्रियता मिळवली. त्याच काळात भारतीय विवाह पद्धतीत परदेशी म्हणता येईल अशी स्वागत समारंभ ऊर्फ ‘रिसेप्शन’ कल्पना रुजायला लागली होती. धार्मिक परंपरांचं अवडंबर न बाळगता सुटसुटीत विवाह समारंभ ही त्या काळातील नावीन्याची रीत होती. विवाहातील फापटपसाऱ्याला बगल देत आधुनिकतेचा वसा घेणाऱ्या त्या काळातील अनेकांना नोंदणी पद्धत अधिक जवळची वाटू लागली होती. हे सांस्कृतिक बदल घडत असतानाच चित्रपटांमध्ये ते टिपले जाणे अधिक महत्त्वाचे होते. एका अर्थाने त्या बदलांना मिळणारे ते विशाल परिमाणच होते.
केवळ तंग कपडय़ातील नायिका किंवा अल्पवस्त्रांकिता ही काही आधुनिकता नव्हे. चित्रपटांनी तेही करून पाहिले. प्रेक्षकांना असे नवे काही देण्याच्या नादात ते बरेचदा खपलेही. ‘अॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ या चित्रपटातील बिकिनी त्या काळात जशी प्रसिद्धीच्या शिखरावर गेली, तशीच ‘संगम’ या चित्रपटातील अल्पवस्त्रांकित नायिकाही. परदेशी वातावरणात सहज खपून जाईल असे ‘पौगंडावस्थेतील प्रेम’ राज कपूर यांच्याच ‘मेरा नाम जोकर’मध्ये चित्रित झाले. पण ते परदेशी नायिकेबाबत आहे, अशी पळवाटही मोकळी होती. वातावरणातील बदल सहजपणे एवढय़ा मोठय़ा माध्यमात रुजताना पहिल्यांदा कुणी तरी ते आव्हान पेलावेच लागते. ‘एक फूल दो माली’सारख्या कथांनी उच्छाद मांडला तरीही त्यामागे पुरुषी मानसिकतेचा दर्प होता. तो अगदी ‘सागर’ या चित्रपटापर्यंत टिकून राहिला. एका मुलीवर दोघांचे प्रेम आहे आणि ती कुणाला हवी आहे, यावरून वाद निर्माण झाला आहे. पण या वादात त्या मुलीलाही काही बाजू असते, याचे भानच नाही, असे हे चित्रपट. रसिकांनी त्यांनाही डोक्यावर घेतले, याचे कारण त्या काळातील पुरुषप्रधानतेत या सगळ्या प्रकारांची सोय करून ठेवलेली होती. प्रेम ही मानवी जीवनातील मूलभूत प्रेरणा असते. तिला स्थलकाल, संस्कृती, मानसिकता या सगळ्यांनी घेरलेले असते. हिंदी चित्रपटांनी आजवर या सगळ्याचा अतिशय कौशल्याने उपयोग करीत कथा निर्माण केल्या. त्यात नवेपणा आणण्याचा प्रयत्न केला. त्याचे टोक ‘दिलवाले’ने २० वर्षांपूर्वी गाठले.
‘ दिलवाले’चे वेगळेपण हे की, नव्वदच्या दशकात निर्माण झालेला हा चित्रपट आज वीस वर्षांनंतरही तेवढाच समर्पक वाटतो. आज तारुण्यात पदार्पण करणाऱ्यांनाही त्या चित्रपटाबद्दल आकर्षण आहे. याचा अर्थ भारतीय मानसिकतेमध्ये होत असलेले बदल फार संथगतीने होत आहेत, असा तर होत नाही? की, ‘जा सिमरन जा, जी ले अपनी ज्मिंदगी’ हा असा परवानगीवजा आशीर्वाद या पिढीलाही हवासाच वाटतो का?