संमेलनाध्यक्षाचे नावच जर साहित्यप्रेमींनी फारसे ऐकले नसेल तर अशा संमेलनाची फलनिष्पत्ती काय असणार हे वेगळे सांगायला नको..

अध्यक्षपदाच्या निवडीपासून या वेळी जे काही गोंधळ उडाले, त्याची चिरफाड रोजच्या रोज होऊनही कुणाला त्याचे काही न वाटण्याएवढा निबरपणा या संमेलनामुळे अनुभवायला मात्र मिळाला.

गेली सुमारे नऊ दशके या महाराष्ट्रात सुरू असलेल्या साहित्याच्या वार्षिक उत्सवाचा उरूस कधी झाला आणि त्याचा साहित्याशी असलेला संबंध कधी तुटला, याचे भान ना साहित्यिकांना राहिले, ना संयोजकांना. वर्षांकाठी काही हजार पुस्तके प्रकाशित होणाऱ्या या राज्यात साहित्याचा व्यवहार अधिक संघटित असायला हवा. जे वाचक गंभीर प्रकृतीची पुस्तके विकत घेऊन वाचतात, त्याबद्दल चर्चा करतात, त्यांना पूर्णपणे वगळून साहित्य संमेलन भरवणे हा अट्टहास साहित्य महामंडळ या संयोजक संस्थेचा आणि त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करणाऱ्या संयोजकांचाच असल्याशिवाय, या उत्सवाचा उरूस होणे शक्य नाही. त्याला कारणेही तशीच आहेत. महाराष्ट्रातील विविध साहित्यिक संस्थांची अग्रणी संस्था म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही संस्था स्थापन करण्यात आली. तेथे एके काळी साहित्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या साहित्यिकांना आदराने बोलावले जात असे. तेव्हा साहित्य संमेलन भरवणे ही जबाबदारीही या संस्थेकडे सोपवण्यात आली. संयोजक आणि महामंडळ यांनी एकत्रितपणे साहित्याच्या भल्यासाठी असे संमेलन भरवावे, एवढा उदात्त हेतू असलेल्या या संस्थेत आता साहित्य नावापुरते उरले आहे. औषधापुरते साहित्यिक आणि कोणी जाहिरात संस्थेचा मालक, कोणी हौशी ‘प्रतिष्ठान’चालक, कोणी राजकारणी अशांची वर्णी जेव्हा या संस्थेवर लागू लागली, तेव्हाच साहित्य संमेलने कशासाठी भरवायची, हा प्रश्नही निकाली निघाला. ‘कवि तो दिसतो कसा आननी’ ही स्थिती माध्यमातिरेकाच्या सध्याच्या काळात असण्याची शक्यता नाही. त्यामुळे साहित्यिकांना एखाद्या अभिनेत्याप्रमाणे पाहण्यास गर्दी करण्याचे आता कारणही उरलेले नाही. पुस्तकेच जर घरबसल्या मिळत असतील, तर त्याच्या लेखकास पाहण्यासाठी जिवाचा आटापिटा करण्याची आवश्यकता उरण्याचे कारण राहिले नाही. साहित्य संमेलन हा साहित्य, साहित्यिक आणि संस्कृतीच्या भल्याचा विचार करण्यासाठी आयोजित करण्याचा उत्सव असतो, या मूळ कल्पनेलाही त्यामुळे छेद गेला. त्यामुळे आजूबाजूच्या वातावरणात भरून राहिलेला उन्माद या संमेलनातही न उतरता, तरच नवल.

कोण्या एके काळी, ज्या लेखकांना एकत्र येऊन साहित्यगोष्टी करायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा मेळा उपकारक आणि हितकारकही असे. त्यांच्यापैकीच कुणी तेवढय़ा काळापुरते अध्यक्षस्थान भूषवीत असे. साहित्यविषयक जाणिवांचा उत्कट आविष्कार आणि उकल करण्याची संधी मिळत असे. हा सगळाच मामला साहित्याच्या परिघाबाहेर जाऊ द्यायचा नाही, असा दंडक या मेळ्यात सहभागी होणारे सगळेच जण स्वत:वर लादूनही घेत असत. पण साहित्याविषयी वाचकांमध्ये असलेली कमालीची गोडी आणि त्याबद्दल असलेले कमालीचे आकर्षण यामुळे या मेळ्यांना वाचक गर्दी करू लागले. संमेलनाच्या अध्यक्षाचे भाषण विचारांनी भरलेले, भारलेले, काही नवी दिशा दाखवणारे आणि मूलभूत चिंतन करणारे असण्याची गरज त्यातूनच निर्माण झाली. गेल्या नऊ दशकातील सुरुवातीच्या काळातील संमेलनाध्यक्षांची नुसती नावे वाचली, तरीही हे सहजपणे लक्षात येते. ज्यांच्या साहित्यगुणांबद्दल जराही किंतु नाही, अशी अनेक साहित्यिक मंडळी त्यात मनोभावे सहभागी होत. उत्तम साहित्यनिर्मिती करण्यातच दंग असणाऱ्या कलावंतांना आपापसात देवाणघेवाण करता यावी आणि त्यानिमित्ताने साहित्याचा हा जागर सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, एवढय़ाच उदात्त हेतूने सुरू झालेल्या या सारस्वतांच्या संमेलनात राजकारण घुसायला सुरुवात झाली, ती साहित्यबाह्य़ कारणांमुळे. जेथे साहित्याशिवाय अन्य कशाचीही चर्चा होणे अपेक्षित नाही, तेथे साहित्य सोडून अन्य सर्व व्यवहारांची उठाठेव करण्यातच धन्यता मानणाऱ्या अनेकांनी या संमेलनाच्या मंडपावर आपला अधिकार सांगायला सुरुवात केली, तेव्हा साहित्यिकांना मात्र गुदगुल्या होत होत्या. कारण अनपेक्षित असे सन्मान त्यांच्या पदरी पडू लागले होते. संमेलनाध्यक्ष ही व्यक्ती जिरेटोप लावून एखाद्या राजाप्रमाणे समाजात मिरवू लागण्याचा हाच तो काळ. प्रकाशकांनी अशा संमेलनाच्या निमित्ताने आपापल्या लेखकांचे मोहरे उतरवायचे आणि आपल्या खर्चाने त्या साहित्यिकास निवडणूक लढवायला भाग पाडायचे, असले उद्योग त्याच काळात सुरू झाले. त्यामुळे इंदिरा संत यांच्यासारख्या निर्मळ साहित्यिकास ही निवडणूक जिंकणे शक्य झाले नाही. तेव्हापासून या संमेलनांचा सारा बाजच बदलून गेला.

गावोगावच्या वाचकांनी या संमेलनाच्या निमित्ताने एखाद्या गावी तीन दिवसांचा मुक्काम करावा आणि साहित्यानंदात डुंबत राहावे, ही मूळ कल्पना अधिक व्यापक करता करता, त्याचे स्वरूप बदलत गेले. संमेलनातील भोजन व्यवस्था कशी होती, यावरच संमेलनांचे यशापयश जोखले जाऊ लागले. चारदोन सन्माननीय अपवाद वगळता कणाहीन आणि साहित्यबाह्य़ गोष्टींसाठी ख्यातनाम असणारे लेखकू संमेलनात मिरवू लागले. या सगळ्याचे सोयरसुतक साहित्य महामंडळास राहिले नाही. जी संस्था किंवा व्यक्ती प्रचंड खर्च करून या संमेलनास शाही स्वरूप देऊ शकेल, अशांचा शोघ घेता घेता संमेलनात नेमके काय व्हावे, यावरील महामंडळाचे नियंत्रणही सुटून गेले. त्यामुळे वर्षांनुवर्षे त्याच त्या नीरस विषयांवरील कंटाळवाणे परिसंवाद झडू लागले. ज्या मागण्या वर्षांनुवर्षे करूनही त्याची कोणीच दखल घेतली नाही, त्या मागण्या नित्यनेमाने दरवर्षी ठरावांच्या रूपाने पारित करणे हेही एक आन्हिक होऊन बसले. त्यातून ना साहित्याचे भले झाले ना साहित्यिकांचे. यंदाच्या ८९ व्या साहित्य संमेलनावर याच भूतकाळाची दाट छाया पसरली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीपासून या वेळी जे काही गोंधळ उडाले, त्याची चिरफाड रोजच्या रोज होऊनही कुणाला त्याचे काही न वाटण्याएवढा निबरपणा या संमेलनामुळे अनुभवायला मात्र मिळाला. संमेलनाध्यक्षांना आपल्या अध्यक्षीय भाषणाची पुनर्माडणी करण्याची आवश्यकता वाटू लागली, कारण त्यांच्या साहित्यिकपणालाच आव्हान दिले गेले. संमेलनास काही तास उरले असतानाही, त्यांचे भाषण मुद्रित होऊ शकले नाही. साहजिकच श्रीपाल सबनीस यांच्यासारख्या व्यक्तीला हे पद मिळू शकते, यामुळे विदीर्ण झालेल्या अनेकांना या संमेलनाकडे फिरकण्याचेही कारण उरले नाही. संमेलन भरवण्यासाठी प्रचंड पैसे खर्च करणाऱ्या स्वागताध्यक्षांना मिरवण्याची संधी मिळावी, एवढाच या आयोजनाचा हेतू आहे की काय, अशी शंका यावी, असे हे वातावरण. शिक्षणसम्राट डी. वाय. पाटील यांचे जावई पी. डी. पाटील या व्यक्तीने कुणा ज्योतिषाकडून खात्री करून घेतल्याशिवाय हे स्वागताध्यक्षपद मिळवले नसणार. त्यांना एवढा खर्च करून काय मिळणार आहे? असले प्रश्न विचारणारे महामंडळातच नाहीत, तर प्रेक्षकांमध्ये कोठून असणार? मागील स्वागताध्यक्षांनी नव्या स्वागताध्यक्षांना सूत्रे देण्याचा अभिनव कार्यक्रम पहिल्यांदाच यंदा होणार आहे. त्यामागील हेतूही हाच.

अध्यक्षांनी आपले भाषण किती पानांचे लिहिले आहे, यावर म्हणजे त्या पानांच्या वजनावर जर त्याचा दर्जा ठरणार असेल, तर यापुढील काळात असे अनेक लेखक अध्यक्ष होण्यासाठी गुडघ्याला बाशिंगे बांधून रांगेत उभे राहतील. सबनीस यांनी म्हणे सुमारे दीडशे पानांचे भाषण लिहिले आहे. त्यात काही नकाशांचाही समावेश आहे. हा एक ऐतिहासिक दस्तावेज होणार आहे, असा खुद्द त्यांचाच समज आहे. संमेलनाचा असा उरूस झाल्याने त्याचे गांभीर्य हरवले आणि तेथे करमणुकीच्या कार्यक्रमांचेच अवडंबर झाले. याच कारणांमुळे पुढील वर्षांसाठी फारशी  निमंत्रणेही  महामंडळाकडे आलेली नाहीत. संमेलनात साहित्य नसलेल्या, पिंपरी-चिंचवडमध्ये होत असलेल्या संमेलनाच्या निमित्ताने सर्वच घटकांनी पुन्हा एकदा अशा उपक्रमाची उपयुक्तता तपासून पाहण्याचीच खरे तर आवश्यकता आहे.