विकतच्या प्रबंधांच्या रद्दीच्या जोरावर स्वतची सद्दी प्रस्थापित करण्याच्या दुकानदारीमुळे शिक्षण क्षेत्र देशोधडीला लागेल..

एक काळ असा होता, जेव्हा तल्लख मेंदू हाच बुद्धिमत्तेचा निकष असल्यामुळे बुद्धिमंतांच्या मांदियाळीत फारच थोडक्यांना स्थान प्राप्त व्हायचे. त्यांचा प्रत्येक विचार हा सुविचारच ठरायचा. आणि तो सुविचार हा भविष्य घडविण्याचा राजमार्ग मानला जायचा. मेंदूवर विद्येची कितीही पुटे चढविली तरी त्याचे ओझे वाटत नाही असे मानले जायचे असा तो काळ. पण पुढे काळ बदलला. मेंदूला भार देणे हीच मुळात अनावश्यक संकल्पना आहे, असे विज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे वाटू लागले आणि मेंदूला शीण करून घेण्याच्या सवयीही हळूहळू संपुष्टात येऊ लागल्या. एका ‘क्लिक’वर सारे ज्ञान उपलब्ध होते हे लक्षात आले आणि या ज्ञानाच्या संचयासाठी मेंदूचा वापर करण्याऐवजी ‘पेन ड्राइव्ह’सारखी ‘बाह्य़ांगी’ उपकरणे उपलब्ध होऊ लागली. मग ज्ञानही विकतचे आणि ज्ञानसंचयाचे साधनही विकतचे अशी परिस्थिती निर्माण झाली, आणि ‘विकतच्या ज्ञानप्राप्ती’साठी मागणी वाढू लागली. कारण कशाही मार्गाने का होईना, आपण ज्ञानवंतांच्या नवमांदियाळीत तरी दाखल झालेच पाहिजे असे मानणाऱ्यांची संख्या वाढतच होती. ज्ञानवंत असणे ही कोणा एखाद्या घटकाची मक्तेदारी आहे, असे मानण्यामुळे निर्माण झालेला वर्गसंघर्ष या नव्या ज्ञानवितरण व्यवस्थेमुळे संपुष्टात आला, आणि ज्ञानाचे दरवाजे माऊसच्या क्लिकनिशी उघडता येतात हे सिद्धही झाले. याच ज्ञानभांडारामुळे, एके काळी भौगोलिक अंतराच्या हिशेबाने मोजले जाणारे जग घडय़ाळाच्या हिशेबाने मोजले जाऊ लागले आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्याशी ज्ञानभांडाराची देवाणघेवाण सोपी झाली.

अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा साहजिकच या उपलब्ध संधीचा लाभ घेण्याची इच्छा बळावते. चालून येणारी अशी एखादी संधी आयुष्याचे सोने करणारी असेल, तर त्या संधीच्या प्राप्तीसाठी रांगा लागतात. मग मागणी आणि पुरवठय़ाचा अर्थशास्त्रीय सिद्धान्त प्रभावी होऊ लागतो. मागणी वाढली आणि पुरवठय़ाचा तुटवडा असेल तर महागाई वाढते, आणि वाटेल ती किंमत देऊन खरेदी करण्याची क्षमता असलेल्यांनाच या परिस्थितीचा फायदा घेता येतो. अशा वेळी पुरवठा क्षेत्रातील व्यवसायाची नवी दालने उघडतात आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील पुरवठादार जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील ग्राहकांना हवी ती वस्तू पुरवण्यासाठी पुढे सरसावतात. सध्या भारतात अल्पावधीत फोफावलेल्या पीएच.डी. प्रबंधांच्या पुरवठादारांनी आपल्या या अनोख्या ‘स्टार्ट-अप’मधून या जागतिक संधींचा पुरेपूर लाभ उठविला आहे. हा एक रीतसर धंदा आहे. शिवाय कोणताही धंदा खरेदी-विक्री या तत्त्वावर चालतो हे याही धंद्यामागील साधे सूत्र असल्याने, आसपास राजरोसपणे सुरू असूनही त्याच्याभोवती कायद्याचे फास कसे आवळायचे, याच चिंतेपायी होणाऱ्या कालहरणाचा लाभ घेत अनेक लाभार्थीनी या धंद्याचे ग्राहक बनून आपले उखळ पांढरे करूनही घेतले आहे.

दान केल्याने विद्याधन कमी होत नाही- उलट वाढते, या समजुतीचा काळ या धंद्याने पुसून टाकला आणि विद्या ही पसा मोजून विकत घेण्याची वस्तू आहे, हे नव्या शिक्षणव्यवस्थेचे सूत्र त्याला साह्य़भूतही ठरले. जागोजागी शिक्षणाची दुकाने सुरू झाल्यावर, साहजिकच मागणी मोठी असल्याने या दुकानांमध्ये रोजगाराच्या संधीही वाढत गेल्या. पण कोणतीही वस्तू विकायची असेल, तर विपणनकला अवगत असणे ही विक्रेत्याची किमान पात्रता असते. शिक्षणाच्या दुकानात विक्रेत्याची भूमिका ‘शिक्षक’ नावाने आधी ओळखल्या जाणाऱ्या व्यवस्थेच्या शिरावर पडली आणि ही भूमिका निभावण्यासाठी त्याला पात्रतेचे निकष पार पाडणे अपरिहार्य ठरले. इथे, त्याला जागतिक शैक्षणिक व्यापारीकरण व्यवस्थेने हात दिला. आपल्याला आवश्यक असलेल्या पात्रतेचे दाखले विकत मिळू शकतात आणि ते हाती असल्यावर आपल्या पात्रतेला आव्हान मिळू शकत नाही, हे ज्यांना उमगले, त्या सर्वानी पैसे मोजून या व्यवस्थेचा लाभ घेतला. ही परिस्थिती एवढी फोफावली, की पुरवठादारांची एक साखळीच आज तयार झालेली दिसते. पीएच.डी. ही शैक्षणिक उंचीची सर्वोच्च पात्रता मानली जात असे. आजही मानली जाते. ही पदवी हाती असलेल्याच्या बौद्धिक क्षमतेस आव्हान नाही, असेच समजले जात असल्याने ज्ञानदानाचे क्षेत्र म्हणून पूर्वी मानल्या जात असलेल्या शिक्षण क्षेत्रात पीएच.डी.धारकांना मानाचे पान मिळत असे. तीच प्रथा आजही अस्तित्वात असल्याने, पीएच.डी.ची पदवी अशा एखाद्या दुकानातून विकत घेऊन आपापल्या मानाच्या पानावर बसून विद्यावंतांच्या पंक्तीत बसण्याचे भाग्य अनेकांनी हिसकावून मिळविले आहे. आणि या धंद्याचे वटवृक्ष राजरोस फोफावत असताना, कोणत्या कायद्याच्या कचाटय़ात त्यांना गुंतवायचे याची चिंता करत सर्वोच्च यंत्रणा मात्र हतबलपणे हातावर हात घेऊन बसलेल्या दिसत आहेत.

मोबदला घेऊन आपल्या बुद्धिसंपदेवरील कायदेशीर हक्क दुसऱ्या कोणास बहाल करण्यात काहीच गैर नाही आणि असे शोधनिबंध विकत घेण्यातही काहीच गैर नाही, असा एक युक्तिवाद अशा परिस्थितीत बहुधा या यंत्रणांच्या बचावासाठी पुढे येत असावा. मात्र, स्वतची बौद्धिक क्षमता सिद्ध करण्यासाठी ‘विकत घेतलेल्या’ या प्रबंधांचा वापर करणे आणि त्यास मान्यता देऊन त्या व्यक्तीस मानाच्या पानावर बसविणे ही या धंद्याची अनाकलनीय बाजू म्हणावी लागेल. विकणे आणि विकत घेणे या प्रक्रियेत अशा कृतीला स्थान असू नये, असा आग्रह धरणारे अजूनही शिक्षण क्षेत्रात आहेत; पण व्यवस्था किंवा यंत्रणांच्या गूढ हतबलतेपुढे त्या आग्रहाचा आवाज क्षीण होणे ही अधिक चिंताजनक बाब आहे. विकतच्या प्रबंधांच्या रद्दीच्या जोरावर स्वतची सद्दी प्रस्थापित करण्याच्या या धंद्यामुळे शिक्षण क्षेत्राचे बारा वाजतील. शाळा-महाविद्यालये चालवून किंवा शिक्षणासाठी आयुष्य खर्च करण्याचा विचारच नष्ट होऊन केवळ कागदावरच्या प्रमाणपत्रावर बुद्धीचे मोजमाप करून पात्रता ठरवली जाईल, अशी भीती संभवते.

अर्थशास्त्राच्या सिद्धान्ताचे एक सूत्र असते. अन्य परिस्थिती सामान्य आहे, या गृहीतावरच अर्थशास्त्राचे सिद्धान्त बेतलेले असतात. शिक्षणाच्या दुकानांनाही हेच गृहीतक लागू आहे. कागदी प्रमाणपत्रांची रद्दी विकत घेऊन आपली सद्दी प्रस्थापित करता येते हे स्पष्ट झाल्यावर शिक्षणासाठी उमेदीचा काळ शाळा-महाविद्यालयांत वाया घालविण्याची गरजच उरणार नाही, आणि साहजिकच शाळा-महाविद्यालयांकडून तथाकथित शिक्षकांची मागणीही संपुष्टात येईल. अशा वेळी रद्दीची सद्दी प्रस्थापित करण्यासाठी विकतची भेंडोळी कामाला येणार नाहीत, आणि विकतची रद्दी काखोटीला मारून वणवण फिरण्याची वेळ येईल. कालचक्राची दुसरी बाजू तेव्हा समोर आलेली असेल. ती अशी की, विकणारे आणि विकत घेणारे अशा दोन्ही वर्गावर बेकारीची वेळ ओढवेल. असे घडेल तेव्हा अवघ्या शिक्षण क्षेत्राची पुरती वाताहत झालेली असेल. हे केवळ भारतातच होईल असे नाही. जेथे जेथे पदवीच्या कागदावर बुद्धिमत्तेचे मोजमाप होत असेल, तेथे तेथे शिक्षण क्षेत्र देशोधडीला लागलेले दिसेल.

शिक्षणाच्या या दुकानदारीला आणखीही एक चिंताजनक कंगोरा आहे. तीव्र स्पर्धा आणि बौद्धिक क्षमता चाचणीच्या कठोर पद्धती यांमुळे अनेक विद्यार्थी ‘घोस्ट रायटर्स’ अर्थात बनावट लेखकांचा आसरा घेत असतात. तरीही हा बौद्धिक भ्रष्टाचारच आहे, यावर जगभरात एकमत आहे. हा धंदा केवळ विक्रेत्यापुरता मर्यादित नाही, हे स्पष्ट आहे. असे धंदे उघडकीस आल्यानंतर चौकशीची चक्रे फिरू लागली असे सांगितले जाते. पण विकतच्या रद्दीवर सद्दी प्रस्थापित केलेल्यांपैकी कोणाचाही शोध अंतिम टप्प्यात येऊन कारवाई होऊ नये, हे गूढ कायम आहे. या साखळीचे ‘दुसरे टोक’ उघडकीस आले पाहिजे. बौद्धिक भ्रष्टाचाराविरुद्धच्या संतापाचा उद्रेक झाल्याखेरीज हे अशक्य दिसते. शिक्षण क्षेत्र देशोधडीस लागण्याचे भय व्यक्त करणारी भविष्यवाणी खरी ठरण्याआधी तो दिवस उजाडायला हवा.