सुसंस्कृत समाजाची धारणा कायद्यांतूनच होते. व्हावयास हवी. पण हे कायदेच हिंसावृत्तीला थारा देणारे असतील, तर काय?

प्राचीन काळापासून आध्यात्मिक तत्त्ववेत्त्यांसमोरचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो हिंसावृत्तीच्या पलीकडे जाण्याचा. माणसाच्या मनातील हिंसा ही आदिम भावना. तिच्यावर मात कशी करायची, तिला लगाम कसा घालायचा आणि एक सुसंस्कृत मन कसे तयार करायचे हा तो सवाल आहे. याचे उत्तर शोधण्यात मानवी संस्कृतीची पाच-सात हजार वर्षे तर अशीच निघून गेली आहेत आणि आजही तो शोध पूर्ण झालेला नाही. स्वतला धार्मिक समजणारी माणसे प्रसंगी धर्मग्रंथ बाजूला सारून अनेकदा हिंसेच्या समर्थनार्थच नव्हे, तर हिंसेच्या मार्गावर का उतरतात? त्यात काही अधार्मिक आहे, असंस्कृतता आहे असे त्यांना का वाटत नसते? याचा अर्थ असा तर नाही ना, की मानवी मनाच्या आपल्या समजुतीतच काही तरी मोठा घोटाळा झालेला आहे? प्रश्न गहन आहेत. त्यांची उत्तरे शोधणे हे खचितच आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडचे असले, तरी असे प्रश्न आहेत हे तरी आपल्याला मान्यच करावे लागेल. किमान मानवी मनाच्या समजुतीतला हा घोटाळा तरी आपल्याला मान्यच करावा लागेल. कारण तो अमान्य केला, की मग अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्यांच्या वर्तनाचा काही हिशेबच लावता येणार नाही. येथे ट्रम्प यांचे उदाहरण घेण्याचे प्रयोजन म्हणजे त्यांचे अमेरिकेतील बंदूक संस्कृतीबाबतचे ताजे वक्तव्य.

अमेरिकेच्या समाजजीवनात बंदूक संस्कृतीचे पुरस्कर्ते आणि विरोधक असा एक उभा छेद असून, ट्रम्प हे पुरस्कर्त्यांच्या बाजूने पाय रोवून उभे आहेत. त्याबाबत अर्थात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. परंतु फ्लोरिडा राज्यातील एका शाळेतील गोळीबारात अलीकडेच १७ बळी गेल्याच्या घटनेनंतर त्यांनी जे काही तारे तोडले, ते त्यांच्या आजवरच्या अशा सर्व भंपक भूमिकांवर कडी करणारे असेच आहेत. शाळांमध्ये गोळीबार होतात, कारण विद्यार्थी बंदूक घेऊन येतात, कारण तेथील कायद्याने १८ वर्षांवरील कोणालाही बंदूक बाळगण्याची सूट आहे. यावर कोणाही विचारी माणसाने ही सूट काढून घ्यावी असेच म्हटले असते. परंतु ट्रम्प हे अशा पद्धतीने विचार करीत नसतात. त्यांचे म्हणणे असे, की विद्यार्थी बंदूक घेऊन येतात तेव्हा मग शिक्षकांच्या हातातही बंदूक द्यावी. म्हणजे त्यांना तातडीने तो हिंसाचार रोखता येईल. वरवर पाहता हे सारेच हास्यास्पद वाटेल. फ्लोरिडा-पार्कलॅण्ड येथील त्या शाळेत जेव्हा तो १९ वर्षांचा तरुण तेथील विद्यार्थ्यांचे हत्याकांड करीत होता, तेव्हा शाळेत नेमलेला बंदुकधारी सुरक्षारक्षक ती घटना केवळ पाहात बसला होता, हे उघडकीस आल्यानंतर ट्रम्प जेव्हा शिक्षकांच्या हातात बंदुका देण्याचा उपाय सुचवितात तेव्हा त्यातील फोलपणा सहजच उघडकीस येतो. परंतु मुद्दा ते शस्त्रसज्ज शिक्षक अशी घटना रोखू शकतील की नाही हाही नाही. कदाचित तसे होईलही. परंतु उद्या एखाद्या शिक्षकाचे माथे फिरले आणि त्यानेच गोळीबार केला तर? मग काय करणार आणि कोणाकोणाच्या हाती शस्त्रे देणार? आणि एकदा सगळ्यांच्याच हाती शस्त्रे आल्यानंतर मग कोण कोणास रोखणार? तेव्हा हा काही विद्यार्थ्यांची हत्याकांडे थांबविण्याचा उपाय असू शकत नाही. हा विचार अर्थातच अमेरिकी समाजाने करायचा आहे. त्यावर येथे बसून आपण उरस्फोड करण्याचे काय कारण, असे काहींना वाटू शकेल. परंतु घटना अमेरिकेतील असली, भंपकपणा खास ट्रम्पकृत असला, तरी त्यामागे असलेला िहसाविचार हा एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे सर्वत्र पसरलेला आहे आणि म्हणूनच त्याची दखल घेणे आवश्यक ठरते.

माणसाच्या मनातील िहसाभावना जशी आदिम, तसेच टिकून राहण्याची आणि केवळ टिकूनच नव्हे, तर भवतालावर वर्चस्व गाजविण्याची वृत्तीही आदिम आहे. माणसे हिंसक असतात आणि हिंसेच्या जोरावर इतरांवर सत्ता गाजविणे त्यांना आवडते. धार्मिक तत्त्वज्ञान आणि विचार यांतून या भावनांचे दमन करण्याचे धडे दिले जातात. ‘अहिंसा परमो धर्म:’ असे जेव्हा ‘महाभारत’ सांगते तेव्हा त्यातून हेच अपेक्षित असते. परंतु एकीकडे अहिंसेचे गुणगान गाणाऱ्या तमाम धर्मग्रंथांत – मग ते कोणत्याही धर्माचे असोत – दुसरीकडे हिंसेची भलामण करणारीही वचने आढळतात. त्या हिंसेलाही अर्थातच काही अटी आणि शर्ती लागू असतात. परंतु त्यातूनही आपल्या मतलबाचा तेवढाच अर्थ काढणे हे माणसाला दुसऱ्या कोणी शिकविण्याची आवश्यकता नाही. माणसाने त्या अटी-शर्ती नीट समजून घेतल्या असत्या आणि अहिंसेचा धर्मविचार अंगी बाणविला असता, तर या जगात धर्मयुद्धेच झाली नसती. तेव्हा समाजाची सुसंकृत पद्धतीने धारणा करायची असेल, तर तेथे हे अहिंसेचे आधिभौतिक तत्त्वज्ञान फोलच ठरते. अशा वेळी शासनाचे भौतिक कायदे उपयुक्त ठरतात. हे कायदे सांगतात, की समाजात दंडशक्ती म्हणजेच हिंसा करण्याची शक्ती ही केवळ शासनाकडेच राहील. तेथे शस्त्र बाळगण्याचे अधिकार प्रामुख्याने सैन्य आणि पोलीस या दोन यंत्रणांनाच असतील. परंतु त्यांनाही ती शस्त्रे मन मानेल त्याप्रमाणे चालविता येणार नाहीत. त्यांनाच काय, परंतु खुद्द शासनालाही मन मानेल तशी हिंसा करता येणार नाही. त्यांच्यावर कायद्याचा अंकुश असेल आणि ते कायदे सार्वभौम जनतेने बनविलेले असतील. आधुनिक राज्ययंत्रणेतील िहसेचा विचार हा असा आहे. कायद्याने सुसंस्कृत मन तयार करता येत नसले, तरी त्यायोगे सुव्यवस्था राखता येते ही त्यातील भूमिका आहे. अशा परिस्थितीत कोणाच्याही हाती शस्त्रे देणे, कोणालाही आपल्या सेना तयार करण्याची परवानगी देणे हे राष्ट्राला अव्यवस्थेकडे, अराजकाकडेच नेणारे ठरते. परंतु याचा विचार न करता सर्वत्र अशी एक भावना निर्माण करण्यात येत असते, की आपल्या संरक्षणासाठी आपणच शस्त्र हाती घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला वर्चस्व गाजविण्याची जशी ओढ असते, तशीच त्याच्या मनात आत्मसंरक्षणाचीही भावना प्रबळ असते. वैयक्तिक पातळीवर ती सच्चीही असते. परंतु त्या भावनेचा वापर करून जेव्हा सामाजिक हिंस्रता निर्माण केली जाते, तेव्हा ती अंतिमत: समाजालाच विनाशाकडे घेऊन जात असते. ही हिंस्रता निर्माण करण्याचा एक उपाय म्हणजे भयभावना तयार करणे. त्यासाठी फार काही वेगळे करण्याची आवश्यकता नसते. सर्वाहाती शस्त्रे दिली तर आपोआपच सगळे सगळ्यांना घाबरणार आणि ज्याच्या हाती हिंसा करण्याची सर्वाधिक क्षमता त्याच्या चरणी लीन होणार. हे हुकूमशाहीचे तंत्र. अहिंसेसाठी हिंसा असा एक समजुतीचा मोठाच घोटाळा निर्माण करून ही हिंसक हुकूमशाही लादली जात असते. तिला धर्मवचनांची जोड दिली जात असते. त्यात वर्चस्ववाद आणि आत्मसंरक्षण यांचे छान रसायन मिसळलेले असते. ट्रम्प यांच्या विधानाकडे पाहायचे तर ते या पाश्र्वभूमीवर.

त्यांचे हे बोल हास्यास्पद वा मूर्खपणाचे म्हणून सोडून देता येणार नाहीत. ते गांभीर्यानेच घ्यावे लागतील, कारण त्यामागील विचार आपल्याकडेही या ना त्या स्वरूपात, याच्या ना त्याच्या आवाहनातून प्रकट होताना दिसतो. याच विचाराच्या पायावर एक सशस्त्र आणि हिंसक समाज तयार करण्याच्या प्रयोगशाळा जगभरात ठिकठिकाणी सुरू आहेत. हिंसावृत्तीला वळसा घालून पलीकडे जाण्याचे आव्हान न पेलू शकणारा धार्मिक विचार आणि या आव्हानापुढे गुडघे टेकू लागलेली राज्ययंत्रणा अशा चित्ररेषा गडद होताना दिसत आहेत..