अमेरिकेसारख्या लोकशाही देशाच्या प्रमुखपदी डोनाल्ड ट्रम्प ही व्यक्ती निवडली गेली हे नुसतेच धक्कादायक नाही, ते त्यापेक्षा धोकादायक आहे.
ट्रम्प हे कमालीचे वंशवादी आहेत आणि गौरवर्णीयांकडेच अमेरिकेची सत्ता असायला हवी, असा त्यांचा आग्रह आहे. जगातील अनेक देशांत सध्या असा संकुचितवाद फोफावत असून जर्मनी, फ्रान्स, तुर्कस्तान, ग्रेट ब्रिटन अशा अनेक लोकशाही देशांत जे घडते वा घडत आहे, तेच अमेरिकेतही प्रत्ययास आले.
औद्योगिक क्रांतीनंतर जगात समाजवादाचा उदय झाला आणि माहिती तंत्रज्ञानाने आणलेल्या जागतिकीकरणानंतर पुन्हा एकदा आभासी समाजवाद लोकप्रिय होताना दिसतो. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हे त्याचे उदाहरण. कमालीची वादग्रस्त वक्तव्ये, त्याहूनही कमालीची वादग्रस्त वर्तणूक, स्त्रियांविषयीची हीन भावना, करचुकवेगिरी, छचोरपणा आणि या सगळ्याच्या जोडीला व्यवस्थेविषयी अक्षम्य अनादर आदी दुर्गुणांचा समुच्चय असूनही त्यापेक्षा त्यांच्या समाजवादी भासणाऱ्या भाषेवर भाळत अमेरिकी जनतेने आपला कौल डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनेच दिला आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या जगातल्या एकमेव आणि सर्वात सक्षम अशा लोकशाही देशाच्या प्रमुखपदी डोनाल्ड ट्रम्प ही व्यक्ती निवडली गेली. हे नुसतेच धक्कादायक नाही. ते त्यापेक्षा धोकादायक आहे.
जगभरात सध्या एककल्ली, एकारलेल्या नेतृत्वाच्या मागे जनतेने उभे राहण्याचा नवाच कल उदयाला आला असून अमेरिकेसारख्या मुक्त व्यवस्थेचा प्राण असलेल्या देशाने हे असे उफराटे वळण घेणे वेदनादायी आहे. ट्रम्प हे केवळ एक उमेदवार नव्हते. तसे ते असते तर निवडणुकीतील हारजितीच्या नैसर्गिक न्यायाने ते जिंकले असे म्हणून त्यांच्या विजयाकडे पाहता आले असते. पण तसे करणे लघुदृष्टीचे ठरेल. कारण ट्रम्प ही व्यक्ती नसून वृत्ती आहे. कोणतेही नीतीनियम मानू नयेत, आपण, आपले कुटुंब आणि नंतर आपला देश एवढय़ापुरताच विचार करून त्यानुसार आपली धोरणे आखणारा नवा राजकारणी वर्ग देशोदेशांत तयार होताना दिसतो. हे नवे राजकारणी विद्वेषी आहेत आणि आपल्या राजकारणाची सुरुवात तसेच शेवट फक्त आपल्याकडूनच होते असे त्यांना वाटते. परिणामी अशांचे राजकारण कमालीचे आत्मकेंद्री असते. अशा नवराजकीय विचारधारेच्या वाऱ्यांपासून अमेरिकेने इतके दिवस स्वत:ला सुरक्षित ठेवले होते. निवडणुकीच्या निमित्ताने अमेरिकेचा हा बचाव गळून पडला. ट्रम्प हे कोणतीही विचारधारा मानत नाहीत. त्यांचा आधुनिक ज्ञानविज्ञानाला विरोध आहे. इतकेच नव्हे तर स्त्रियांना गर्भपाताचा अधिकार देणे हेदेखील त्यांना अनावश्यक वाटते. उद्योगांना प्रचंड करसवलती द्यायला हव्यात, असे त्यांचे म्हणणे. स्वत: ते एक उद्योजक असल्याने या विचारामागील स्वार्थ न दिसणे अवघड आहे. एक उद्योजक या नात्याने या व्यक्तीने कित्येक वर्षे कर भरलेला नाही आणि तरीही आपण काही गैर केले असे त्यांना वाटत नाही. अमेरिका हे जागतिक अर्थकारणाचे इंजिन आहे. ट्रम्प यांना हे मान्य आहे. परंतु या इंजिनाने मागचे डबे ओढण्याची जबाबदारी किती काळ घ्यावी, असा त्यांचा प्रश्न आहे. किंबहुना त्यांना ती नकोच आहे. अमेरिकेच्या या इंजिनपणामुळे जगभरातील ज्ञानवंत आणि उद्यमी नेहमी अमेरिकेकडे आकृष्ट होतात. अमेरिकेचे हे मोकळेपण अनेकांना भावते. परंतु ट्रम्प यांचा या मोकळेपणालाच विरोध आहे. अमेरिका ही फक्त अमेरिकेत जन्मलेल्यांची असायला हवी, जगातील स्थलांतरितांना अमेरिकेने अजिबात आश्रय देऊ नये, असे त्यांचे म्हणणे. त्याचमुळे मुसलमान, आफ्रिकी आदी देशवासीयांना अमेरिकेत येण्यापासून बंदी घालायला हवी असे टोकाचे मत ते मांडतात. ते कमालीचे वंशवादी आहेत आणि गौरवर्णीयांकडेच अमेरिकेची सत्ता असायला हवी, असा त्यांचा आग्रह आहे. एक व्यक्ती म्हणून अशी मते बाळगण्याचा हक्क त्यांना निश्चितच आहे. परंतु प्रश्न येतो तो या अशा व्यक्तीला अध्यक्षपदी बसवण्याचा निर्णय अमेरिकावासीयांनी घेतला म्हणून. जगातील अनेक देशांत सध्या असा संकुचितवाद फोफावत असून जर्मनी, फ्रान्स, तुर्कस्तान, ग्रेट ब्रिटन अशा अनेक लोकशाही देशांत जे घडते वा घडत आहे, तेच अमेरिकेतही प्रत्ययास आले.
तेव्हा प्रश्न असा की इतके सारे प्रतिकूल असूनही ट्रम्प हे अमेरिकी जनतेला इतके आकर्षक का वाटले? याचे उत्तर ट्रम्प यांच्या मांडणीत आहे. जगभरातून येणाऱ्या स्थलांतरितांना यापुढे बंदी घातली जाईल आणि त्यामुळे स्थानिक अमेरिकनांच्या रोजगारांत वाढ होईल, हे एक त्यांचे आश्वासन. तसेच जागतिकीकरणाच्या रेटय़ामुळे अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी आर्थिक विचार करून आपापले उद्योग चीन, मेक्सिको अशा देशांत हलवले आहेत. त्या सर्वाना अमेरिकेत परत आणले जाईल ही त्यांची आणखी एक भूमिका. तसे न करणाऱ्या उद्योगांना दंडित केले जाईल, असेही ट्रम्प म्हणतात. इस्लामी दहशतवादाचा वाढता धोका सध्या जगास भेडसावत आहे. तेव्हा इस्लामधर्मीयांची जमेल तितकी नाकेबंदी केली जाईल, या त्यांच्या वक्तव्याने तर स्थानिक ख्रिस्तीधर्मीय पारंपरिक अमेरिकींना हर्षवायूच होणे काय ते बाकी राहिले होते. पारंपरिक रिपब्लिकन मतदार हा धार्मिक असतो. त्याच्या या धर्मप्रेमाचा पुरेपूर फायदा ट्रम्प यांनी उचलला. अलीकडे स्वत:चे धर्मप्रेम सिद्ध करणे म्हणजे अन्य धर्मीयांविरोधात द्वेष निर्माण करणे असे मानले जाते. देशोदेशींत असेच होताना दिसते. अमेरिकेतही तेच झाले आणि अज्ञ जनांनी परिणामांचा विचार न करताच ट्रम्प यांना मते दिली. त्याचमुळे भर रस्त्यात कोणालाही थांबवून सुरक्षेच्या कारणांसाठी त्यांची अंगझडती घेण्याचा अधिकार पोलिसांना दिला जावा या त्यांच्या मागणीचे अमेरिकेत स्वागत झाले. ही अंगझडती अर्थातच गौरवर्णीयांची होणार नाही. सावळे वा काळे यांची अशी अंगझडती घेतली जाणार, हे उघड आहे. म्हणजे एका अर्थी हा उपाय उघडपणे वर्णद्वेषी आहे. परंतु तरीही तो स्थानिक अमेरिकींना भावला. ते ट्रम्प यांच्या मागे उभे राहिले. याचा सरळ अर्थ असा की अमेरिकाही आता अन्य सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय मागास देशांप्रमाणे संकुचित होऊ शकेल.
ट्रम्प यांच्या विजयाचा दुसरा अर्थ असा की, हे सर्व रोखण्यात त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन या कमी पडल्या. हिलरी यांचे अपयश हे त्यांच्या स्थितीवादी दृष्टिकोनाचे निदर्शक आहे. या स्थितीवादी वृत्तीमुळे तरुण, पहिल्यांदाच मतदान करणारे यांचा पाठिंबा हिलरी यांना राहिला नाही. पहिल्यांदाच मतदान करणारा जवळपास १५ टक्केइतका तरुण मतदार एकगठ्ठा ट्रम्प यांची तळी उचलताना दिसला. हिलरी यांचे डुगडुगते आरोग्य जसे त्यांच्याविषयी मतदारांत उदासीनता निर्माण करणारे ठरले तसेच त्यांचे राजकारणदेखील मतदारांना कोरडे वाटले. हिलरी यांच्याविषयी आक्षेप असा की राजकारणी म्हणून त्या कोरडय़ा आहेत. त्यांचे पती बिल यांच्याप्रमाणे मतदारांशी संवाद साधण्याची कला त्यांना अवगत नाही. ती शिकून घेण्याचाही उत्साह त्यांच्याकडे नाही. याच्या जोडीला हिलरी या बडय़ा बँकर्स, उद्योगपतींचे प्रतिनिधित्व करतात असा आक्षेप होता आणि तो पूर्णपणे गैर म्हणता येणार नाही. अमेरिकेतील सामान्यांचे दैनंदिन जगणे कमालीचे खर्चीक आणि असह्य़ होत असताना अमेरिकेतील उद्योगपती आणि बँकर्स मात्र धनाढय़ होत गेले. हे उद्योगपती आणि बँकर्स हिलरी यांच्या पाठीशी होते हे पाहून ट्रम्प यांनी या दोघांतील संधान हे आपले निवडणूक सूत्र बनवले. क्लिंटन आणि हे अमेरिकेतील धनाढय़ एकमेकांच्या स्वार्थासाठीच काम करतात हा त्यांचा युक्तिवाद त्यामुळे अमेरिकनांना पटत गेला. त्यात त्यांचे उघड झालेले ईमेल्स प्रकरण. त्यातून क्लिंटन आणि बडे बँकर्स यांच्यातील साटेलोटे दिसून आले. ही बाबही त्यांच्या विरोधात गेली. क्लिंटन आल्या तर सामान्य अमेरिकनांचे नव्हे तर या बडय़ा धनिकांचेच भले होईल, ही ट्रम्प यांची टीका त्यामुळेच जनतेच्या मनात घर करत गेली. खेरीज, खुद्द हिलरी यांचे स्वपक्षीय प्रतिस्पर्धी बर्नी सॅण्डर्स हेदेखील ट्रम्प यांच्याच मताचे होते आणि त्यांचाही अमेरिकेतील धनदांडग्यांना विरोध होता. परंतु त्यांना हिलरी यांच्यासाठी माघार घ्यावी लागली. नंतर स्वत: सॅण्डर्स यांनी हिलरी यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्यासाठी प्रचारही केला. जनसामान्यांना हे आवडले नाही. त्याचमुळे सॅण्डर्स यांचा प्रभाव असलेल्या राज्यांत हिलरी यांना फारशी मते न पडल्याचे दिसते. प्रचारात हिलरी यांच्यासाठी बराक आणि मिशेल या ओबामा दाम्पत्यानेही मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न केले. परंतु त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आफ्रिकी अमेरिकींचे मतदान हिलरी यांना झाले नाही. हा वर्ग ओबामा यांच्या राजकारण आणि अर्थकारणावर नाराज आहे. तेव्हा हिलरी यांचा पराभव हा एका अर्थाने ओबामा यांचाही पराभव ठरतो.
अशा तऱ्हेने सर्व जगाला धक्का देत ट्रम्प विजयी झाले. जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात ब्रेग्झिटच्या बाजूने कौल देऊन ब्रिटनने जगाला असाच धक्का दिला होता. आता अमेरिकेतही तेच घडले. एकंदर जगात सध्या जे अविवेकींचे प्रस्थ वाढू लागले आहे, त्याचेच हे प्रतीक. गेल्या आठवडय़ात दिवाळीच्या दिवसांत एकमेकांना शुभेच्छा देताना ज्ञानेश्वरांची मी अविवेकाची काजळी। फेडुनी विवेकदीप उजळी। ही ओवी समाजमाध्यमांत फिरत होती. अमेरिकनांना ज्ञानेश्वर माहीत असावयाचे कारण नाही. परंतु त्यांनी या निवडणुकीत या अविवेकाच्या काजळीचे दर्शन घडवले हे नक्की. अशा परिस्थितीत विवेकदीपाची वाट पाहणे इतकेच आपल्या हाती राहते.