माणूसपणाचे मर्म टिपणारे सतीश गुजराल आणि निमाई घोष वयपरत्वे कालवश झाले. दोघांचीही कारकीर्द वेदना आणि आनंद यांच्याविषयी विचार करायला लावणारी ठरली..

क्षण कोणताही असो, त्यातील अद्भुतपणा टिपणे ही कला आणि त्यामागच्या मानवी प्रयत्नांचे मोल जाणणे ही कलेची दृष्टी..

छायाचित्रकार निमाई घोष गेले. कोलकात्याहून त्यांची निधनवार्ता येऊन दोन दिवस होत नाहीत तोच दिल्लीहून बातमी आली. चित्रकार, शिल्पकार, भित्तिशिल्पकार आणि वास्तुरचनाकार अशा विविध नात्यांनी दृश्यकलेला भिडणारे सतीश गुजराल गेले. गुजराल वयाने ९४, घोष ८५. गुजराल १९५०च्या दशकापासून चित्रांमधून छाप पाडत होते. घोष काहीसे उशिराच, १९६९ नंतर कार्यरत झाले. म्हणजे भारतीय आधुनिकतावादी कालखंडातल्या दोन टप्प्यांवरचे हे दोघे. दोघांनीही भारतीय दृश्यकला समृद्ध केली. साध्या शब्दांत सांगायचे तर, जे पाहावे आणि ज्याचा अभिमान भारतीय म्हणून वाटावा, असे खूप काही या दोघांनी दिले. ‘मी भारतीय आहे, माझ्या कलेतही भारतीय प्रतीके, चिन्हे आणि भारतीय विषय येणारच.. पण मी त्यातून नवे काही करतो आहे का?’ या प्रश्नांची सतीश गुजराल यांनी दिलेली अनेक उत्तरे आज आपल्यासमोर आहेत. ज्यांना माहीतच नसतील त्यांनाही महाजालावरील प्रतिमांमधून आणि चित्रफितींमधून गुजराल यांची महती कळू शकते. पण निमाई घोष आणि कलेतली भारतीयता यांचा संबंध काय, असा प्रश्न काहींना पडेल. याचे कारण हा संबंध घट्ट असला, तरी तो दूरचा होता. गुजराल आणि घोष दोघे एकाच वाटेचे प्रवासी असले, तरी निमाई घोष तुलनेने कमी प्रसिद्ध. तेव्हा प्रथम घोष यांच्याविषयी.

चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान स्थिर छायाचित्रण करणे हा निमाई घोष यांचा पेशा. आपल्या देशातील अनेक भाषांत अनेक चित्रपट बनविले जातातच, तेव्हा या पेशाचे अप्रूप फारसे नाही. जितेन्द्र आर्य यांच्यासारखे स्थिर छायाचित्रकार मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीत कित्येक दशके आणि शेकडो चित्रपटांसाठी काम करून प्रसिद्धीच्या झोतात आले. निमाई घोष त्यापेक्षा निराळे. ते बंगालचे. नाटकाबिटकांत कामे करताना अभिनय आणि कॅमेरा यांच्या आवडीपायी चित्रपटाच्या सेटपर्यंत पोहोचलेले. हा चित्रपट होता सत्यजित राय यांचा ‘गोपी गायें बाघा बायें’. तोवर राय यांचे नाव त्रिखंडात दुमदुमत होते आणि निमाई होते निव्वळ हौशी. निमाईदांना भूमिका नाही मिळाली, पण कॅमेऱ्याने टिपलेली छायाचित्रे राय यांना दाखवल्यावर स्थिर छायाचित्रणाची कारकीर्द सुरू झाली. पुढली २५ वर्षे- म्हणजे १९९२ साली राय कालवश होईपर्यंत, निमाई घोष सत्यजित राय यांच्यासाठी काम करत राहिले. मृणाल सेन, ऋ त्विक घटक यांच्याहीसाठी त्यांनी काम केले. पण या तिघांखेरीज कोणत्याही दिग्दर्शकासाठी काम करताना निमाईदांनी आधी पटकथा वाचून मगच निर्णय घेतले. ‘तू जे पाहातोस तसेच मीही पाहिले असते..’ अशी दाद सत्यजित राय यांच्याकडून मिळवणारे निमाईदा. सत्यजित राय यांची छायाचित्रमय चरित्रेच ठरतील अशी तीन पुस्तके निमाई यांच्या नावावर आहेत. या पुस्तकांत राय एकटे नाहीत. ‘राय यांचे छाया-चरित्रकार’ ही प्रसिद्धी त्यामुळे मिळाली खरी, पण निमाईंचे गुण त्यापलीकडचे होते. खुद्द राय यांनीही, ‘अठराव्या शतकात अनेकांची चरित्रे लिहिणाऱ्या जेम्स बॉसवेलप्रमाणेच पण लेखणीऐवजी कॅमेऱ्याने निमाईदा काम करतात’, अशी या गुणांची तारीफ केली होती. चित्रपट तयार होत असतानाची असोशी आणि अवधान घोष यांनी टिपले. अभिनेत्यांसह, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांचेही माणूसपण कॅमेराबद्ध केले. कोलकाता शहरही घोष यांनी ‘सहज’ टिपले. निबिड जनअरण्यासारखे शहर म्हणजे काय, हे समजण्यासाठी घोष यांचे हे कोलकाता- छायाचित्रांचे पुस्तक पाहावेच लागते. सत्यजित राय धूम्रपान करीत असतानाचे छायाचित्र निमाईंचे आवडते.. त्यामधील धुराच्या रेषेमुळे राय यांच्या चेहऱ्यासारखीच आकृती तयार झाली, तीही फोटोशॉप वगैरे दूर असतानाच्या काळात. ‘ही जादू केवळ क्षणाची’ हा त्या छायाचित्राबद्दलचा निमाईंचा उद्गार, त्यांच्या कलेचे सार सांगणारा!

गुजराल यांच्या कलेत केवळ क्षण नव्हते, क्षणांचे संगीत बालपणीच उत्तम उर्दू काव्याच्या वाचनातून त्यांना गवसले होते आणि या क्षणसंगीताला पुढे बेल्जियमच्या दिल्लीस्थित दूतावासाचे वास्तुशिल्प उभारून गुजराल यांनी जणू गोठवले होते. चित्र काढणे, शिल्प घडवणे या छायाचित्रणापेक्षा काहीशा वेळखाऊ कला. इतर मुलांप्रमाणे शिक्षण घेणे अशक्यच व्हावे, इतका मोठा धक्का सतीश गुजराल यांना वयाच्या आठव्या वर्षी पचवावा लागला. वाचा गेली, ऐकण्याची शक्तीही विझली. पण वेळ भरपूर मिळाला. सध्या पाकिस्तानात असलेल्या झेलम या नावाच्या गावात १९२५ साली जन्मलेल्या सतीश यांना काव्य-वाचनाची गोडी लागली ती याच काळात. मुलगा चित्रेही काढतो अधूनमधून, म्हणून वडिलांनी लाहोरच्या मेयो आर्ट स्कूलमध्ये पाठविले. तेथून पुढील शिक्षणासाठी सतीश मुंबईत- सर ज. जी. कला महाविद्यालयात- १९४४ साली आले. ‘प्रोग्रेसिव्ह ग्रुप’च्या स्थापनेपूर्वीच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले, पण १९४७ नंतर दिल्लीच्या घरी परतून सतीश गुजराल फाळणीशी संबंधित विषयांचीच चित्रे काढू लागले. अशातच, पुढे जन्मभर कान आणि वाणी होऊन साथ देणाऱ्या पत्नी किरणही भेटल्या. देश अनेक धक्क्यांतून सावरल्यावर, १९५२ साली या चित्रांनीच सतीश यांना मेक्सिकोची कला-शिष्यवृत्ती मिळवून दिली. कलेच्या इतिहासात मेक्सिकोची भित्तिचित्रे अजरामर होत असतानाचा तो काळ सतीश यांना अनुभवता आला. दिएगो रिव्हेरासारख्या दिग्गज चित्रकाराचे काम जवळून पाहता आले. ‘विक्रीयोग्य कले’बद्दल काहीशी अढी बाळगूनच सतीश गुजराल परतले. मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सारे प्रयत्न हरल्यानंतरचे दु:ख हे त्यांचे चित्रविषय ठरले. नेहरू कुटुंबाशी या गुजराल कुटुंबाची जवळीक. मोठा भाऊ इंदरकुमार त्या वेळच्या काँग्रेसचा कार्यकर्ता. पण धाकटा सतीश निराळा. ‘या सत्तेत जीव रमत नाही’ ही प्रवृत्ती आणि मूकपणाने चित्रांमधून दुसरी बाजू मांडण्याची ऊर्मी इतकी की, १९७४च्या घोषित आणीबाणीनंतर त्यांची चित्रेच बदलली. साखळदंड, जळकी लाकडे यांचा वापर ते शिल्पांमध्ये करू लागले. जखडलेपणाशी विद्रोह त्यांच्या या शिल्पांतून दिसू लागला. फाळणीच्या वेळी चित्रांमध्ये बऱ्याचदा येणारी काळी छटा आता शिल्पांमध्ये आली.

हे सतीश गुजराल यांचे मोठेपण. ते कसे हसरे होते, मित्रांचे त्यांना कसे अगत्य असायचे, १९९८ मध्ये झालेल्या शस्त्रक्रियेनंतरही कमीच बोलता येते हे माहीत असूनही बोलण्याची त्यांना किती हौस होती, याबद्दल विशेषत: त्यांच्या मृत्यूनंतर रकाने भरले जातील.. पण दखल घ्यायला हवी, ती त्यांच्या मूक विद्रोहाची. दैन्य-दु:खाची, अन्यायाची जाणीव पुरेशी सखोल नसेल तर विद्रोहाचा इव्हेन्टच होतो. तसा सतीश गुजराल यांच्या कलेत नव्हता. उत्तरायुष्यात त्यांनी आयपीएल क्रिकेटची, गणपतीची किंवा आनंदी विषयांचीही चित्रे केली; पण तोवर सतीश गुजराल हे ‘उरलो उपकारापुरता’ या अवस्थेस गेले होते. ‘ब्रश विथ लाइफ’ हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव. या कुंचल्यावरचे उरलेसुरले रंग त्यांना आनंदीच हवे होते बहुधा.

रुपेरी पडद्यामागचा मानवी ताण कृष्णधवल छायाचित्रांत नेमका उतरविणारे आणि तारे-तारका यांत न रमता गोरगरिबांचेही जीवन टिपणारे निमाई घोष काय किंवा उच्चभ्रू जीवनशैली हाताशी असूनही देशातील सामान्यजनांची तगमग दृश्यमान करणारे सतीश गुजराल काय. दोघांच्या प्रेरणा माणूसपणापासून सुरू झाल्या आणि वेदना जाणूनही आनंद, अद्भुतता यांना नकार न देता स्थिर होत गेल्या. कलावंताच्याच नव्हे, सजगपणे जगणाऱ्या कुणाच्याही प्रेरणांचा प्रवास असाच असतो बहुधा. त्यापैकी दोन सहप्रवासी हरपले.