स्वत:च्या राजकीय पीछेहाटीचा दोषारोप इतरांवर करताना खोटे कथानक नसते रचायचे… असत्यवचन आणि असत्य कृत्यातून तुम्ही कधीही राष्ट्रप्रेमी ठरू शकत नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅपिटॉल हिलवरील ट्रम्पसमर्थकांच्या धुडगुसाचा उल्लेख न करता, अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी राजकीय चारित्र्याचे स्मरण करून दिले… 

अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी ताकदीच्या प्रतीकांवर हल्ला होण्याची घटना म्हणजे अर्थातच ९/११. वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटॅगॉनवर ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या हल्ल्यांनी जग हादरले. काही महिन्यांपूर्वीच त्या घटनेला २० वर्षे पूर्ण झाली होती. त्या हल्ल्यांमागे अर्थातच इस्लामवादी दहशतवादी होते. परंतु गतवर्षी ६ जानेवारी रोजी अमेरिकी कायदेमंडळाच्या – काँग्रेसच्या इमारतीवर झालेला हल्ला १०० टक्के गोऱ्या, प्रतिगामी, लोकशाहीविरोधी अमेरिकनांनीच घडवून आणला. कॅपिटॉल हिलनामक त्या संकुलावर झालेल्या ‘उत्स्फूर्त’ हल्ल्यापूर्वी तेथे उपस्थित अनेक काँग्रेस सदस्य केवळ दैव बलवत्तर म्हणूनच बचावले. हा हल्ला अमेरिकी लोकशाहीच्या प्रतीकावर झाला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला स्वत:ची संसद इमारतही संरक्षित करता येऊ नये, ही नामुष्की कदाचित ९/११ पेक्षाही मोठी आणि गंभीर. ९/११ नंतर अमेरिका कधी नव्हे इतकी एकत्रित बनली. ६ जानेवारीनंतरची अमेरिका मात्र कधी नव्हे इतकी दुभंगली, विस्कटली. ती दरी नजीकच्या काळात तरी मिटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आणि २००हून अधिक- प्रामुख्याने पोलीस- जखमी झाले. या घटनेला नुकतेच वर्ष उलटले तरी अमेरिकी लोकशाही व्यवस्थेला झालेली जखम अजूनही ओलीच आहे. या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी करणारे न्यायाधीश सुलिवान यांनी काढलेले उद्गार या संदर्भात लक्षणीय ठरतात. ‘वरकरणी सद्वर्तनी वाटणारी आणि कायदा कधीही न मोडलेली माणसे इतक्या सहजपणे दहशतवाद्यांमध्ये परिवर्तित कशी होतात’ या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर सहज देता येण्यासारखे नाही. ६ जानेवारी रोजी कॅपिटॉल हिलवर जे चालून गेले, ते मुळात डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण ऐकण्यासाठी राजधानी वरॉंशग्टनमध्ये पोहोचले होते. छोटे व्यावसायिक, शिक्षक, निवृत्तिवेतनधारक, बेरोजगार अशा या मंडळींचा ट्रम्प यांनी निवडणूक निकाल जाहीर होत असतानाच रेटलेल्या एका असत्यवचनावर मात्र ठाम विश्वास होता – निवडणूक आपणच जिंकलो, तरी डेमोक्रॅट्सनी ती लुबाडली!

‘लुबाडणुकीचे कथानक’ ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच पेरायला आणि गर्जायला सुरुवात केली होती. त्यामुळेच निवडणुकीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी जेव्हा काँग्रेस सदस्य कॅपिटॉल हिलमध्ये जमले, त्याच्या काही तास आधी ट्रम्प यांनी सभा घेतली आणि सभेतच ‘लुबाडणुकीवर शिक्कामोर्तब करण्याचे पातक कॅपिटॉल इमारतीत सुरू’ असल्याचे जाहीर केले! मेंढरांसारख्या मानसिकतेपायी विचार आणि विवेक दाखवण्याची क्षमताच ओसरलेल्या त्या जमावापैकी अंदाजे २००० जण मग कॅपिटॉल इमारतीवर चालून गेले. हाच तो तथाकथित उठाव किंवा इन्सरेक्शन! त्यासाठी जवळपास ७०० लोकांवर खटले भरण्यात आले असून, त्यांतील २२५ जणांवर पोलिसांवर हल्ले केल्याचा गंभीर आरोप आहे. कॅपिटॉल इमारतीमध्ये खिडक्या-दारे तोडताना, पुतळे आणि प्रतीकांची विटंबना करताना बहुतेकांनी स्वत:ची ओळख लपवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि त्यांतील काहींनी तर आपल्या या कृत्याचे थेट प्रक्षेपणच समाजमाध्यमांद्वारे जगासमोर मांडले. सुरुवातीला अंदाज व्यक्त केला गेला त्याप्रमाणे यांतील बहुतेक कोणत्याही उजव्या विचारसरणीच्या गटांशी वा समूहांशी जोडले गेलेले नव्हते. कामगार, बेरोजगार किंवा व्यावसायिक यांच्यापलीकडे त्यांची कोणतीही ओळख नव्हती. ट्रम्प म्हणाले त्याप्रमाणे त्यांना निवडणूक लुबाडणुकीचे कथानक खरे वाटले आणि ही प्रक्रिया थांबवण्याचे राष्ट्रकार्य करण्यासाठी आपण हे कृत्य केले असा बहुतांचा आजही दावा आहे. विस्कॉन्सिन, मिशिगन, पेनसिल्वेनिया, अ‍ॅरिझोना आणि जॉर्जिया ही २०१६ मध्ये जिंकलेली राज्ये २०२० मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गमवावी लागल्याचा धक्का ट्रम्प यांना पचवता आला नाही. या पाच राज्यांतील निकालांनी निवडणूक जो बायडेन यांच्या दिशेने फिरली. पण निवडणुकीत चढ-उतार आणि हार-जीत होत असते हे तत्त्व ट्रम्प आणि त्यांच्यासारख्या कोणत्याच नेत्याला मान्य नसते. हा एकाच वेळी मूर्खपणा आणि उद्दामपणाही! निवडणुकांकडे सत्तासाधन म्हणूनच पाहणाऱ्या या मंडळींकडे निवडणुकीच्या लोकशाही गुणधर्माची फिकीर करण्यासाठी वेळ आणि पैस नसतो. निवडणूक आली, की जिंकायची. पराभव झाला, तर निवडणूकच विरोधकांनी लुबाडली असा शंख करायचा. ट्रम्प २०२०च्या निवडणुकीत पराभूत झाले, तरी त्यांना आठ कोटींहून अधिक मतदारांची पसंती होती हे दुर्लक्षिण्यासारखे नाही. त्यामुळे कॅपिटॉल इमारतीवर हल्ला होण्यात या मोठ्या वर्गाला विशेष काही वाटत नाही, ही अधिक गंभीर बाब.

यामुळेच ट्रम्प पराभूत झाले, तरी ट्रम्पवाद जिवंत आहे आणि त्याच्या जोरावर ट्रम्पही अमेरिकी राजकारणाच्या केंद्रस्थानी पुन्हा येऊ शकतात. ६ जानेवारीच्या त्या घटनेविषयी सुरुवातीला रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनी कडक शब्दांत निषेध केला. मात्र याबद्दल ट्रम्प यांना थेट दोषी ठरवण्यासाठीच्या प्रक्रियेत प्रतिनिधिगृह आणि सिनेट या काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये रिपब्लिकन सदस्य सातत्याने खोडा घालतात. त्यामुळे याविषयी चौकशी सध्या तरी न्यायालयांमध्येच सुरू आहे. लुबाडणुकीचे कथानक रिपब्लिकनांनीही जवळपास मान्य केल्यासारखे आहे. कारण या कथानकावर जनमत ढवळू शकेल, असे त्यांना वाटते. तसेही त्यांचा डोळा यंदाच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांकडे आहे. या निवडणुकांमध्ये अनेकदा सत्तारूढ अध्यक्षाच्या पक्षाविरोधात मतदान होत असते. त्या वेळी विशेषत: प्रतिनिधिगृहामध्ये बहुमत मिळवून ६ जानेवारीची काँग्रेस परिचालित चौकशीच बरखास्त करण्याचा त्यांचा विचार आहे. शिवाय ट्रम्प म्हणजे त्यांच्यासाठी निवडणुका जिंकून देणारा हुकमी एक्काच! ते महत्त्वाचे. त्यामुळे ट्रम्प यांच्या गतकृत्यांची चौकशी वगैरे सुरू करणे म्हणजे फारच झाले. शिवाय रिपब्लिकन सिनेटर आणि प्रतिनिधींपैकीही बहुतेक जण हिंसाचार झालाच नव्हता, थोडाफारच झाला, अन्यायग्रस्तांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती वगैरे लुबाडणूक कथानकाची उपकथानके आळवू लागले आहेतच. त्यांच्या मते ट्रम्प यांचा या संपूर्ण प्रकरणात काहीच दोष नव्हता. याचा अर्थ जे घडले त्यात विशेष काहीच नव्हते असेच जर त्यांना वाटते आहे, तर पुन्हा असे घडण्यातही त्यांना काहीच वावगे वाटणार नाही. अमेरिकेतील बहुसंख्य लोकशाही विश्लेषक, लोकशाहीवादी नेते या संभाव्य संकटाविषयी चिंतित आहेत. ६ जानेवारी रोजी कॅपिटॉल इमारतीवर चालून आलेल्यांवर गोळ्या चालवण्यात आल्या नाहीत, कारण त्या इमारतीचे सशस्त्र संरक्षण एतद्देशीयांपासूनच करावे लागेल, असे तेथील पोलीस यंत्रणेला कधी वाटलेच नाही. त्या भाबडेपणाला आता तिलांजली द्यावी लागेल.

जो बायडेन यांनी त्या घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त जे म्हटले त्याचा मथितार्थ असा – तुमचे देशप्रेम केवळ विजयातच सामावलेले नसते. कायद्याचे पालन केवळ तुम्हाला सोयीस्कर वाटते तसे आणि तेव्हाच करायचे नसते. असत्य वचन आणि असत्य कृत्यातून तुम्ही कधीही राष्ट्रप्रेमी ठरू शकत नाही! सध्या अनेक लोकशाही देशांमध्येही निवडणुकांकडे सत्तासाधन म्हणून पाहण्याची प्रवृत्ती बोकाळत असताना, बायडेन यांचे उद्गार त्या वास्तवाचे कटू भान आणि त्यानिमित्ताने नागरिकांच्या जबाबदारीची आठवणही  देतात.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Editorial page capitol hill patriotic u s president joe biden attack on symbols akp
First published on: 08-01-2022 at 00:20 IST