अग्रलेख : गुणवत्तेचा गुणाकार!

सिंधू-सायनामुळे या खेळात महिला विभागातच भारत उत्कृष्ट असल्याचा समज जोर धरत होता.

बेंगळूरुचे प्रकाश पडुकोण, हैदराबादचे गोपीचंद यांच्या मार्गदर्शनासाठी देशभरचे उदयोन्मुख बॅडिमटनपटू धडपडत असतात, आपण नंदू नाटेकरांच्या आठवणींत रमतो..

लक्ष्य सेन, किदंबी श्रीकांत, साईसात्त्विक रांकीरेड्डी, चिराग शेट्टी ही भारतीय क्रीडा क्षेत्रातली सुपरिचित अशी नावे अगदी परवाच्या रविवापर्यंत नव्हती. पण रविवारी दुपारी वामकुक्षी घेणाऱ्या किंवा टीव्हीवर आयपीएल पाहणाऱ्या लाखोंपर्यंत थॉमस चषक स्पर्धेतील भारतीय संघाच्या चमत्काराची बातमी संध्याकाळचा निवांत चहा घेत असताना येऊन आदळली, त्या वेळी आपण काही तरी अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार राहण्यापासून मुकलो, ही रुखरुख त्यांच्यासाठी चिरंतन राहील. त्या सामन्याच्या किंवा त्या क्षणाच्या चित्रफिती टीव्ही किंवा मोबाइलवर पाहून प्रत्यक्षानुभूतीचा आनंद खचितच मिळणार नाही. क्रिकेटेतर भारतीय खेळांमधील गुणसमृद्धीविषयी असे अज्ञात असणे हा या देशाचा गुणविशेष. बॅडिमटन म्हटल्यावर प्रकाश पडुकोण, पुलेला गोपीचंद, सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्याविषयी जुजबी माहितीपलीकडे आपली मजल जात नाही. चार वर्षांनी येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये एखादा अभिनव बिंद्रा किंवा एखादा नीरज चोप्रा ९० कोटी क्रिकेटवेडय़ांना कधी तरी जागे करून निघून जातो. त्यामुळेही थॉमस चषक स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच उपान्त्य फेरी गाठणे, अंतिम फेरी गाठणे आणि अजिंक्यपद पटकावणे; आणि हे करताना अनुक्रमे मलेशिया, डेन्मार्क आणि इंडोनेशिया या माजी विजेत्यांना हरवणे याचे कवित्व काय, ते कळायला काही अवधी जावा लागतो. इंडोनेशियाच्या बाबतीत तर हा सामना इतका एकतर्फी ठरला, की गतविजेत्यांना सावरण्याची संधीच भारताने दिली नाही.

एका अर्थाने या अजिंक्यपदाच्या निमित्ताने एक वर्तुळ पूर्ण झाले असे म्हणता येईल. कारण आजवर या खेळातील वैयक्तिक कामगिरीच बॅडिमटन परिघाबाहेरील बहुतांना ज्ञात होती. प्रकाश पडुकोण आणि गोपीचंद यांचे ऑल इंग्लंड अजिंक्यपद, सायना नेहवालचे पहिलेवहिले ऑलिम्पिक पदक, पी. व्ही. सिंधूचे जागतिक अजिंक्यपद आणि ऑलिम्पिक पदके यामुळे वैयक्तिक स्तरावरील भारतीय गुणवत्ता दिसून आली. परंतु यात सातत्य नव्हते. पडुकोण-गोपीचंद यांची कामगिरी गतशतकाच्या अखेरच्या टप्प्यातली. सिंधू-सायनामुळे या खेळात महिला विभागातच भारत उत्कृष्ट असल्याचा समज जोर धरत होता. खरे तर गतदशकात भारतीय पुरुषांनीही बॅडिमटनमध्ये महत्त्वाच्या स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली होती. तरी त्यांची महती बॅडिमटन वर्तुळापलीकडे फार पोहोचली नाही. ही परिस्थिती आता बदलायला हवी. पण बदलेल का हा प्रश्न.

भारतीय बॅडिमटनपटूंच्या देदीप्यमान कामगिरीविषयी सुगावा लागल्यानंतर सरकारपासून तृतीयपर्णीयांपर्यंत सारेच समाजमाध्यमांवर धो-धो व्यक्त होऊन कर्तव्यमुक्त झाले! त्यांच्यातील थोडय़ांनीही आपल्या बॅडिमटनपटूंचे किमान शेवटचे तीन सामने पाहिले असते, तरी या खेळातील आपल्या प्रगतीमुळे त्यांचे डोळे विस्फारले असते. शारीरिक तंदुरुस्ती आणि चिकाटीची कसोटी पाहणाऱ्या खेळांपैकी बॅडिमटन हा एक. एका आकडेवारीनुसार, भारतात क्रिकेटपाठोपाठ सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे बॅडिमटन. तो मध्यमवर्गीयांमध्ये पूर्वापार विशेष लोकप्रिय, कारण तंदुरुस्ती राखण्यासाठी काही (तरी) करायचे तर बॅडिमटनच योग्य हा समज घट्ट रुजलेला. क्रिकेटच्या जगड्व्याळात शीर्षस्थानी पोहोचण्याची टक्केवारी अत्यल्प. फुटबॉल आणि हॉकीची लोकप्रियता देशभर असली, तरी फुटबॉलच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी आवश्यक जिगीषा आणि व्यवस्था आपल्याकडे नाही. हॉकीच्या बाबतीत दिवस अलीकडे पालटू लागले असले, तरी व्यापक लोकप्रियतेच्या निकषावर हा खेळ मागे पडल्याचे स्पष्ट दिसते. त्यात पुन्हा हॉकीतील यशापयशाला जुन्या सुवर्णयुगाशी भावनिक नाते जोडण्याची खोड ज्या दिवशी जाईल तो सुदिन. बॅडिमटनबाबत मात्र तसे नाही. बुद्धिबळाप्रमाणेच याही खेळाची लोकप्रियता देशव्यापी असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा गेल्या तीनेक दशकांतच निर्माण झाला. प्रथम १९८० मध्ये प्रकाश पडुकोण यांचे ऑल इंग्लंड अजिंक्यपद लक्षवेधी ठरले. त्या घटनेच्या अलीकडे-पलीकडे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये बॅडिमटन अकादम्यांच्या माध्यमातून प्रशिक्षणाची आणि खेळाडू घडविण्याची प्रक्रिया काही प्रमाणात सुरू झाली होती. पुढे २००१ मध्ये पुलेला गोपीचंद यांनीही ऑल इंग्लंड अजिंक्यपद पटकावले. नवीन सहस्रकाच्या पहिल्या दशकाच्या अखेरीस सायना नेहवाल आंतरराष्ट्रीय बॅडिमटन विश्वात चमकू लागली. तिच्याकडून स्फूर्ती घेत पुढे सिंधू आणि अनेक बॅडिमटनपटू चीन, इंडोनेशिया, मलेशिया, जपान अशा जागतिक महासत्तांशी टक्कर घेऊ लागले. पण हा झाला वरवरचा तपशील. या नवक्रांतीचे खरे श्रेय द्यावे लागेल पडुकोण आणि गोपीचंद यांना. या दोघांनी खेळातून निवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षणाच्या माध्यमातून उत्तमोत्तम बॅडिमटनपटू घडवण्याचे कार्य सुरूच ठेवले. बेंगळूरु हे पडुकोण यांचे कार्यक्षेत्र, तर हैदराबाद हे गोपीचंद यांचे. अकादम्या घेण्यासाठी भूखंड मिळावेत म्हणून लाचारीचे खेटे नाहीत आणि भूखंड मिळाल्यानंतर त्याचा विनियोग योग्य प्रकारे करण्यास कोणतीही टाळाटाळ, विलंब वा सबबी नाहीत. त्या-त्या वेळच्या तेथील सरकारांचेही कौतुक. प्रशासकीय बाबींची तातडीने पूर्तता झाली. आज देशभरचे उदयोन्मुख बॅडिमटनपटू या दोघांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून धडपडत असतात. काही वेळा मतभेद झालेही. सायना नेहवाल हे याचे उत्तम उदाहरण. परंतु मतभेदांचा परिणाम गुणवत्तानिर्मितीवर झाला नाही. परस्परांशी सहकार्य होते अशातला भाग नाही. परंतु दोघांचेही उद्दिष्ट एक, परस्परांविषयी आदरभाव उच्च दर्जाचा आणि स्पर्धा गळेकापू नव्हे तर निकोप. त्यामुळे गुणवत्तेचा गुणाकार झाला, ज्याची फळे गेल्या दशकात केवळ सायना-सिंधूच्या रूपातच नव्हे, तर श्रीकांत, प्रणय, लक्ष्य, साई-सात्त्विक, चिराग यांच्या खेळातूनही दिसू लागली आहेत. मलेशियाविरुद्ध प्रणयने निर्णायक विजय मिळवल्यामुळे भारत उपान्त्य फेरीत पोहोचला. अंतिम सामन्यात बलाढय़ इंडोनेशियाविरुद्ध लक्ष्यने पहिला गेम गमावून आणि सात्त्विक-चिराग जोडीने तर चार मॅच पॉइंट्स वाचवत बाजी उलटवली. निव्वळ गुणवत्ता नव्हे, तर प्रतिकूल परिस्थितीत पराभव समोर दिसत असताना विजय खेचून आणणे हा चांगला खेळाडू आणि गुणवान खेळाडूंमधील फरक. हा विजय कायम राखण्यातील सातत्य असामान्यत्वाकडे नेते. आपले लक्ष्य ते असायला हवे.  त्यामुळेच ‘अहाहा. उपान्त्य फेरीत पोहोचलो, किमान एक कांस्य निश्चित’ किंवा ‘अंतिम फेरीत पोहोचलो आता रौप्य तरी नक्कीच’ अशा बावळट आणि भेकड टिप्पण्यांपासून आपले क्रीडाविश्व आणि आपण दूर जायला हवे. आपल्या खेळाडूंविषयी आपल्यालाच भरवसा वाटत नाही, हा आपला दृष्टिदोष. तो स्वीकारून आपले बहुतेक क्रिकेटेतर खेळाडू वाटचाल करतात आणि मोठय़ा स्पर्धामध्ये यशस्वी होतात ही या देशातील निम्न आणि मध्यमवर्गीयांची सुप्त ताकद. मऱ्हाटी भूमीत खाशाबा जाधव होऊन गेले, तरी आपण आज कुस्तीत कुठेच नाही. नंदू नाटेकरांमुळे किती तरी घरांमध्ये बॅडिमटनची प्रेरणा निर्माण झाली, पण त्याही खेळात आपला टक्का आता फार वरचा नाही. पुणे, ठाणे या शहरांना एके काळी बॅडिमटनची गुणवत्ता केंद्रे मानले जायचे. पण येथील कॉर्पोरेट आणि राजकीय नेतृत्वाला ते वैभव पुढे नेता आले नाही. उत्तरेतील काही राज्ये, दक्षिणेतील काही राज्ये प्रयत्नपूर्वक क्रिकेटेतर खेळ आणि खेळाडूंना पािठबा देण्याची मोहीम सातत्याने राबवत असताना, त्या आघाडीवर आमच्याकडे बारमाही दुष्काळ! एके काळी क्रिकेटसह विविध खेळांचे आगार म्हणवले जाणारे हे राज्य अशा सुवर्णक्षणांमध्ये पुन:पुन्हा दीनवाणे भासत राहते. गेल्या काही वर्षांतील मानसिक, राजकीय, धोरणात्मक दुभंगलेपण, गुजरातप्रमाणे राजकीय वरदहस्ताचा सातत्याने अभाव आणि मुळातच बदलत चाललेला प्राधान्यक्रम ही काही कारणे किंवा सबबी सांगता येतील. त्यामुळेच थॉमस चषक दिग्विजयातील बहुतेक आतापर्यंत अनाम, अज्ञात वीरांचे कौतुक करण्यापलीकडे आपल्या हाती काही उरत नाही. क्षेत्र कोणतेही असो. गुणवत्तेचा गुणाकार करायची सवय अंगी बाणली जात नाही, तोपर्यंत परिस्थितीत फार बदल संभवत नाही.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta editorial indian badminton team won thomas cup title indian badminton team players zws

Next Story
अग्रलेख : दात्याचे दारिद्रय!
फोटो गॅलरी