वाढती रुग्णसंख्या पाहता यापुढे तरी सरकारने निर्णयप्रक्रिया तज्ज्ञांहाती सोपवावी. नपेक्षा पुन्हा टाळेबंदी अटळ आहे. तसे होणे हा आर्थिक कडेलोट ठरेल..
दुर्दैव हे की, सत्याच्या जवळ जाणारे आणि म्हणून गांभीर्याने घ्यावे असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान हे भारतासंदर्भात आहे. आणि त्यात जखमेवरचे मीठ म्हणजे त्यांनी भारताची बरोबरी नको त्या मुद्दय़ावर चीनशी केली. भारत आणि चीन या देशांनी करोनाच्या चाचण्या कमी केल्या म्हणून त्या देशांतील बाधितांची संख्या कमी आहे, नपेक्षा त्या देशांत करोनाबाधितांचा प्रस्फोट असेल, असे ट्रम्प म्हणाले. हे विधान ते करीत असताना भारतातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या दहा हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे आणि भारताने सर्वाधिक करोनाबाधितांच्या संख्येत चार देशांना चार दिवसांत मागे टाकले आहे. त्यातही वेदनादायी भाग असा की, गेल्या दोन दिवसांत आपण दोन देशांपुढे गेलो. रविवारची आकडेवारी पाहता, भारतातील एकंदर करोनाबाधित २,४६,६२८ इतके झाले आहेत आणि त्यांच्या वाढीची गती कमी होण्याची शक्यता नाही. ही संख्या अधिक बोचणारी आहे, कारण गेल्या दोन दिवसांत देशातील चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. याचा अर्थ, चाचण्या वाढल्या असत्या तर रुग्णांची वाढदेखील अधिक दिसली असती. म्हणून ट्रम्प यांचे विधान बरोबर ठरते. सोमवारी, ८ जूनपासून देशातील सर्वाधिक करोना-रुग्ण असताना राज्यात टाळेबंदी शिथिलीकरणाचा महत्त्वाचा टप्पा सुरू होत असल्याने हे सत्य अधिक वेदनादायी ठरते. याचा अर्थ असा की, मान्य करा अथवा करू नका; करोना विषाणू हाताळणीत आपले बरेच काही चुकले. भावना बाजूस सारून केवळ संख्यांच्या आधारे या सर्वाचा विचार केल्यास या सत्याची जाणीव होईल.
राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्राने केलेल्या पाहणीतून ही बाब स्पष्ट होते. त्यातील आवर्जून लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे, टाळेबंदीच्या काळातच विषाणू प्रसार कमी होण्याऐवजी तो वाढला. ही बाब विशेषत: पहिल्या टाळेबंदीनंतर प्रामुख्याने दिसते. त्यासाठी बहुचर्चित असा R0 (याचा उच्चार ‘आर नॉट’) हा मुद्दा विचारात घ्यायला हवा. एका करोनाबाधित व्यक्तीपासून किती जणांकडे या आजाराचे संक्रमण- रिप्रोडक्शन- होते ते R0 (‘आर नॉट’) या संकल्पनेतून दिसते. केंद्रीय आरोग्य खात्याच्या अहवालाने दाखवून दिल्यानुसार पहिल्या आणि तिसऱ्या टाळेबंदीच्या काळात आपल्याकडे हा ‘आर’ घटक- पर्यायाने बाधितांचा प्रसार- अधिकाधिक वाढत गेला. भारतात १५ मार्च रोजी करोनाचे जेमतेम १०० रुग्ण होते. त्या वेळी त्याच्या प्रसाराचा वेग २.५ इतका होता. म्हणजे दोन करोनाग्रस्तांकडून पाच जणांकडे या रोगाचा प्रसार होत होता. तथापि या ‘आर’ मुद्दय़ाचे आपल्याकडे सरसकटीकरण झाले हे ‘द हिंदु’ दैनिकाचे विश्लेषण दर्शवते. याचा अर्थ, प्रत्येक करोनाग्रस्त काहीएक निश्चित गतीने या रोगाचे संक्रमण करीत गेला, असे आपल्याकडे मानले गेले. तो संपूर्ण सत्यापलाप होता. असे ठामपणे म्हणता येते याचे कारण यापैकी काही जणांकडून इतरांपेक्षा अधिक प्रसार झाला, तर काहींकडून कमी. यास ‘व्हायरल लोड’ असे म्हणतात. म्हणजे ज्यांच्या शरीरावर अधिक विषाणू होते किंवा जो कमी विषाणूबाधित होता पण अधिकांत मिसळत होता, त्यांच्याकडून अधिक प्रमाणात करोना संक्रमित झाला. याचाच अर्थ ‘R1’(आर-वन) म्हणजे एकाकडून एकाकडेच प्रसार- ही काल्पनिक आदर्श अवस्था आपल्याकडे प्रत्यक्षात येऊच शकली नाही.
ती येणारच नव्हती. याचे कारण ती तशी यावी यासाठी टाळेबंदीच्या बरोबरीने जितक्या प्रमाणात प्रत्यक्ष चाचण्या केल्या जाणे आवश्यक होते, तितकी गती आपण गाठू शकलो नाही. पहिल्या टाळेबंदीच्या आठवडय़ाभरात हा ‘आर’ घटक १.९१ इतका होता. तो पहिल्या टाळेबंदीच्या अखेरच्या दिवसापर्यंत १.२८ इतका आक्रसला. पण मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात तो २.०४ टक्के इतका वाढला. ही टाळेबंदीच्या तिसऱ्या आवृत्तीची सुरुवात होती. त्यानंतर करोनाबाधितांचा वेग झपाटय़ाने वाढला. याचा साधा अर्थ असा की, टाळेबंदी निष्प्रभ ठरत गेली. समाजातील एका घटकास टाळेबंदीच्या यशाविषयी शंका नाही. ‘हा मार्ग पत्करला नसता तर काय भयावह परिस्थिती झाली असती’, वगैरे शासकीय वदंता हा वर्ग शिरसावंद्य मानतो. पण तो त्यांच्या अंधश्रद्धेचा भाग झाला. वास्तव ते नाही.
ते दिवसागणिक वाढत जाणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आहे. जवळपास गेला आठवडाभर आपल्याकडे प्रतिदिन सरासरी ८,००० वा अधिक इतक्या गतीने करोनाबाधित वाढत असून ही संख्या आज साडेनऊ हजारांच्या पुढे जाताना दिसते. या १३० कोटींच्या देशात आजतागायत झालेल्या चाचण्यांची संख्या ४५,२४,३१७ इतकी आहे आणि ६,९५० च्या आसपास करोनाबळी गेले आहेत. अशा वातावरणात आपण समाधान मानतो ते करोनाबाधितांचा दुपटीचा वेग आता १५.९६ इतका झाला, यात. पण याच वास्तवाची दुसरी बाजू अशी की, हा वेग असाच राहिल्यास पुढील पंधरवडय़ाअखेरीस आपल्याकडची रुग्णसंख्या पाच लाखांपेक्षा अधिक होण्याचा धोका आहे. आणि तरीही भारतात अजूनही करोना-प्रस्फोट झालेला नाही, असे जागतिक आरोग्य संघटना बजावते. इतक्या भयावह वेगाने करोनाप्रसार होणार असेल तर त्यास सामोरे जाण्याचे दोनच पर्याय. इतक्या सगळ्यांच्या उपचारांची व्यवस्था करत राहणे अथवा समूहप्रतिकारशक्ती तयार होईल, याची वाट पाहणे. तशी ती होण्यासाठी आजच्या गतीने पाहू गेल्यास या आजाराची बाधा होऊन बरे झालेल्यांची संख्या किमान ६२ कोटी व्हायला हवी. म्हणजे एकूण लोकसंख्येतील साधारण निम्म्यांस करोना-होणे. यासाठी त्यांना काही प्रमाणात या आजाराची बाधा तरी व्हायला हवी अथवा त्यांच्या शरीरात लस टोचून ती तयार करता यायला हवी. यातील दुसरा पर्याय अद्याप उपलब्ध नाही. म्हणजे पहिल्यास सामोरे जाणे आले. हा अंदाज ‘इंडियन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ’च्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
अमेरिकेत ट्रम्प यांच्या राजवटीत जी काही अंदाधुंदी सुरू आहे, त्याबाबत ‘हाऊ डिड वी गेट देअर’ असा एक प्रश्न विचारला जातो. (या संदर्भात अलीकडेच एक ग्रंथ प्रकाशित झाला असून त्याविषयी लवकरच) म्हणजे आपली ही अवस्था नक्की कशामुळे झाली? ट्रम्प यांच्या राजवटीसंदर्भात विचारला जाणारा हा प्रश्न आपल्याकडे करोनाकाळाविषयी रास्त ठरेल. या प्रश्नास भिडण्याचे आणि त्याचे उत्तर देण्याचे धैर्य गेल्या आठवडय़ात आपल्याच काही सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील वैद्यकतज्ज्ञांनी दाखवले. इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अॅण्ड सोशल मेडिसिन आणि इंडियन असोसिएशन ऑफ एपिडेमिओलॉजिस्ट्स या तीन संघटनांनी प्रसृत केलेल्या संयुक्त पत्रात आपल्याकडील परिस्थितीचे रास्त विश्लेषण केले गेले. त्यावरील मतप्रदर्शन ‘टाळेबंदीची नि:स्पृह चिकित्सा’ या ‘अन्वयार्था’त ‘लोकसत्ता’ने गतसप्ताहात केले. त्या साऱ्याचा अर्थ इतकाच की, इतक्या मोठय़ा संकटास सामोरे जाताना संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे सौजन्य सरकारने दाखवले नाही.
टाळेबंदी प्रशासकीयपेक्षा आरोग्यविषयक होती, हे ध्यानातच न घेतल्याने आपली ही अवस्था आली. जे झाले ते झाले. त्याची चिकित्सा निर्थक आणि तितकेच यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने सुरुवातीपासून घेतलेली भूमिका किती रास्त होती हे नमूद करणे अनावश्यक. यापुढे तरी सरकारने निर्णयप्रक्रिया तज्ज्ञांहाती सोपवावी. नपेक्षा पुन्हा टाळेबंदी अटळ आहे. तसे होणे हा आर्थिक कडेलोट ठरेल. प्रगत ‘जी ७’ गटात आपला समावेश करून घेणे प्रतिष्ठित असेल/नसेल. पण करोनाबाधितांत पहिल्या पाचात असणे निश्चितच अशोभनीय.