‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्याना’चे नामांतर तूर्तास टळले आहे याचा आनंद न मानता, आपल्या अभयारण्यांचे अनिर्बंध टूरिस्टीकरण कसे टळेल याची चिंता करायला हवी..

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्रसंवर्धन प्रकल्पात हल्ली काय चालते, त्यात बहुतेकदा पर्यटक या बिरुदाखाली बहुधा उडाणटप्पूंनी भरलेल्या जिपांवर चाल करून येणारे अजस्र नर हत्तीच (टस्कर) दिसून येतात. जंगलातील खास वन्यजीवांसाठीच्या पायवाटांवरून आपल्याच मस्तीत झुलत चालणाऱ्या त्या अभिमानी आणि अपराजित जनावराचा दिनक्रम खरेतर ठरलेला. विशिष्ट वेळी चरणे, विशिष्ट वेळी फिरणे, विशिष्ट वेळी जलपान आणि मनसोक्त नदीस्नान.. या दिनक्रमात ही माणूस नामे ब्याद खोडा घालू लागल्यामुळे तिथले हत्ती वैतागलेलेच दिसतात. कॉर्बेटमध्ये कोणी कुठल्या जिपा वा मोटारी न्याव्यात याला काही धरबंध राहिलेला नाही. मध्यंतरी नदीच्या कोरडय़ा पात्रसदृश एके ठिकाणी एक छोटी मोटार अडकून पडली; तिला काही हत्तींनी चीत्कारत वेढा घातला. आणखी एकदा एका जीपच्या पुढील भागावर बिथरलेल्या गजराजाने नाकाडाने ढोसले. जीपमधील मंडळींचे दैव बलवत्तर म्हणून ती उलटली नाही आणि गजराजानेही नाद सोडून दिला. नाहीतर जीपसकट साऱ्यांना चेपण्याची ताकद त्याच्यात नक्कीच होती. सतवासतवीची तीच गोष्ट वाघांबाबत. जीपवर वाघाने हल्ला करावा हे ‘थ्रिल’ अनुभवण्यासाठी त्याच्या अधिकाधिक जवळ जीप नेली जाते. पिल्ले बाळगणारी दुभती वाघीण किंवा एकांडा नर असली सलगी सहन करू शकत नाहीत. त्यांनी निव्वळ दात विचकले किंवा चालण्याचा वेग वाढवला, की जीपमधले ‘एन्जॉय’ करणारे टूरिस्ट आणखी चेकाळतात. पण चुकून एखादी वाघीण किंवा वाघ जीपच्या दिशेने झेपावत येऊ लागल्यावर पृथ्वीवरील सर्वात शक्तिमान, तरीही जीपमध्ये सुरक्षित दडून बसलेल्या जनावराचे धैर्य गळते! मग चालकांची जीप दूर नेण्याची धडपड आणि जोडीला जीपमध्ये किंचाळ्या-चीत्कार! हे सारे, थोडाफार धांडोळा घेतल्यास यूटय़ूबवर पुराव्यांसारखे पाहाता येते. तरीही आजवर एकाही वाघाने वा हत्तीने कॉर्बेट उद्यानात एखाद्या पर्यटकाचा जीव घेतल्याचे उदाहरण नाही. असले आचरट चाळे राजरोस सुरू असलेल्या आणि तरीही भारताच्या सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या उद्यानाचे – जिम कॉर्बेट नॅशनल पार्क – नामांतर ‘रामगंगा राष्ट्रीय उद्यान’ करावे अशी इच्छा केंद्रीय वन राज्यमंत्र्यांनी प्रकट केली. ती फलद्रूप होण्याआधीच मागेही घेतली गेली. याचे सगळ्यात जास्त दु:ख ज्या व्यक्तीला – ती ज्या कोणत्या जीवनोत्तर अवस्थेत असेल तेथे – होईल, ती म्हणजे जिम कॉर्बेट! वने आणि वन्यजीव संवर्धनाचा श्रीगणेशा भारतात पहिल्यांदा गिरवलेल्या या आद्य संवर्धकाला आपल्याकडे तसेही बहुतेक मंडळी ओळखतात ते ‘शिकारी’ म्हणूनच ना! आज त्यांच्या नावे उभ्या असलेल्या उद्यानात शिकार नाही, तरी विकार मात्र सर्रास दिसून येतात. त्यामुळे जिम कॉर्बेट साहेबाचा महिमा सांगण्याची गरज निर्माण होते. 

Advocates Black Coat is Optional in Summer Marathi News
Too Much Heat: प्रचंड उकाड्यामुळे वकिलांना ड्रेसकोडमधून सवलत; काय आहेत नियम?
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील नव्हे, तर आशियातील सर्वात जुने अभयारण्य. १९३६ मध्ये हिमालयाच्या पायथ्याशी नैनीतालजवळ  त्याची जागा मुक्रर केली गेली, त्या वेळी त्या उद्यानाचे नामकरण तत्कालीन उत्तर प्रांताचे गव्हर्नर सर माल्कम हेली यांच्या नावावरून ‘हेली नॅशनल पार्क’ असे केले गेले. उद्यानाच्या मधून रामगंगा नदी वाहते. स्वातंत्र्यानंतर लगोलग या नदीचे नावच उद्यानाला दिले गेले. पण १९५६ मध्ये उद्यानाचे नामकरण जिम कॉर्बेट नॅशनल पार्क असे झाले. हे विलक्षण होते. कारण तोवर बहुतेक ब्रिटिश नावांचे भारतीयीकरण सुरू झाले होते. परंतु या उद्यानाच्या बाबतीत मात्र प्रवास उलटा झाला. वाघ या देशातील उमद्या जनावराविषयी कॉर्बेट यांनी फार पूर्वीच इशारा दिला होता – ‘वाघ हा अमर्याद धैर्य असलेला विशालहृदयी महाभाग आहे. पण जनतेचे पाठबळ मिळाले नाही, तर लवकरच भारतीय जंगलातील या अमूल्य धनाला आपण पारखे होऊ.’ ती वेळ नजीक येऊन ठेपली, १९७३ मध्ये. कारण तोवर वाघांची संख्या १६३वर आली होती. त्यामुळे भारताच्या पहिल्यावहिल्या व्याघ्रसंवर्धनाचा श्रीगणेशा कॉर्बेट उद्यानातूनच झाला. आज वाघांच्या चोरटय़ा शिकारी देशभर होतच असल्या, तरी वाघांची संख्या मात्र लक्षणीय वाढलेली आहे. यामागे व्याघ्रसंवर्धन प्रकल्पांचे यश असले, तरी व्याघ्रसंवर्धनाची शहाणीव या देशात पेरली ती कॉर्बेट यांनीच. त्याचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी जिम कॉर्बेट यांनी कधीही दाखवली नाही. पण त्यांच्या मते जंगलसंवर्धन आणि व्याघ्रसंवर्धन या स्वतंत्र बाबी नाहीतच. ही जाणीव व्यक्त न करताही, जंगलवासी आणि जंगलाभोवती वस्ती करून राहिलेल्या ग्रामस्थांमध्ये कशी उपजत होती याचा विस्मय कॉर्बेटसाहेबांना भारतात असताना आणि भारत सोडल्यानंतरही वाटत राहिला.

वन्यजीव आणि मानव यांच्यातील हा अव्यक्त सहयोगभाव (सिनर्जी) कॉर्बेट यांच्यासारख्या गोऱ्या साहेबासाठी विलक्षण होता. त्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे, हे त्याने नेटिव्हांपेक्षाही गोऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न हरप्रकारे केला. हातात मोडकी बंदूक घेऊन घनदाट जंगलातून फिरणाऱ्या आठ वर्षीय पोरासमोर वाघ प्रकटतो आणि तरी पहिले स्वत: वाट सोडून कसा देऊ शकतो, असे प्रश्न त्यांना तरुण वयापासून पडत होते. याचे उत्तर त्यांना सहयोगभावात सापडत गेले. कुमाऊँ भागातील अनेक नरभक्षक वाघ टिपल्यानंतर किंवा रुद्रप्रयाग, पानार येथील नरभक्षक बिबटय़ांचा वेध घेतल्यानंतर, नरभक्षणाकडे ही श्वापदे का वळतात, याचे उत्तर त्यांच्या कलेवरचिकित्सेतून शोधण्याचा प्रयत्न कॉर्बेट यांनी सातत्याने केला. बहुतेक वेळा जखमी वा वृद्ध झाल्यामुळे अशी जनावरे त्यांचे नैसर्गिक भक्ष्य पकडण्यात अपयशी ठरू लागतात आणि उपासमारीतून नरभक्षणाकडे वळतात, असे त्यांना आढळून आले. त्याहीपेक्षा थक्क करणारी बाब म्हणजे, ज्यांचे नातेवाईक वाघ-बिबटय़ांचा हल्ल्यांना बळी पडले त्यांतील बहुतेकांच्या मनात त्या मार्जारकुलीनांविषयी जराही कडवटपणा नव्हता. प्राक्तन आणि जंगलचा न्याय स्वीकारून त्यांचे जीवन सुरूच राहिले.

अलीकडेच ‘ओटीटी’वर गाजलेल्या ‘शेरनी’ चित्रपटात नायिकेच्या तोंडी विलक्षण वाक्य आहे – ‘वाघ नरभक्षक नसतो, भुकेला असतो’! जिम कॉर्बेट यांनी हे कितीतरी पूर्वी ओळखले होते. कॉर्बेट यांच्यासारख्यात गोऱ्या कांतीच्या कथित ‘साहेबां’कडून झालेल्या बेबंद शिकारीमुळेच भारताचे वनधन जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होते. याची सल त्यांच्या लिखाणातूनही जाणवायची. त्यामुळे विशेषत: उत्तरायुष्यात पापक्षालन करण्याची त्यांची धडपडही दिसून येते. मनुष्य-वन्यजीव संघर्षांचे प्रसंग आज जागोजागी निर्माण होत आहेत. विदर्भासारख्या महाराष्ट्राच्या व्याघ्रसमृद्ध प्रदेशात कधी वाघांची चोरटी शिकार, कधी वाघांकडून नरभक्षणाच्या बातम्या अलीकडे वरचेवर वाचायला-ऐकायला मिळतात. सहयोगभावाच्या अभावातूनच हे घडत असल्याचे उघड आहे. वाघांसाठीच्या अभयारण्यांमध्ये अतिक्रमण, त्यांना वनमार्ग (कॉरिडॉर) उपलब्ध करून देण्यात होत असलेली दिरंगाई, देशातील जवळपास प्रत्येक अभयारण्याचे सुरू असलेले अनिर्बंध ‘टूरिस्टीकरण’ या जंगलातील शांतता आणि समतोल बिघडवणाऱ्या बाबी आहेत. जंगलातून रस्ते, कालवे, विजेच्या तारा, खाणी उभ्या राहिल्यास भरभराटीची हमी मिळेलच असे नाही. पण वन व वन्यजीवनाशाचा तो मार्ग ठरतो हे निश्चित. भारताला ‘माय इंडिया’ अशी साद घालणाऱ्या जिम कॉर्बेट यांनी तो टाळण्याचे आणि तरीही प्रगतशील राहण्याचे उपाय सांगितले आहेत. त्यांचे नाव एखाद्या उद्यानाला दिले काय नि काढले काय, पण त्यांचा वारसा मात्र जिवंत राहिलाच पाहिजे.