scorecardresearch

अग्रलेख : सांग सांग भोलानाथ..

स्कायमेट या खासगी हवामान अभ्यासक आणि अंदाजक कंपनीने केंद्र सरकारच्या हवामान खात्यावर टीका केल्यामुळे एक नवेच वादळ भिरभिरू लागले आहे.

अग्रलेख : सांग सांग भोलानाथ..
(संग्रहित छायाचित्र)

हवामान खात्याचा अंदाज चुकला इतकाच आक्षेप असता तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरले असते; पण ‘हा ठरवून केलेला प्रमाद’ हा आक्षेप गंभीर..

स्कायमेट या खासगी हवामान अभ्यासक आणि अंदाजक कंपनीने केंद्र सरकारच्या हवामान खात्यावर टीका केल्यामुळे एक नवेच वादळ भिरभिरू लागले आहे. एके काळी आकाशवाणी आणि दूरदर्शनप्रमाणे हवामान खात्याचीही मक्तेदारी होती. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात आकाशवाणी आणि दूरदर्शनची मक्तेदारी संपली आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्याच दशकात हवामान खात्यास स्पर्धक मिळाला. खासगी वृत्तवाहिनीवर वार्तापत्राच्या अखेरीस हवामान अंदाज वर्तवण्याचे काम करणाऱ्या जतीन सिंग या तरुणाने १९ वर्षांपूर्वी ‘स्कायमेट’ ही कंपनी स्थापन केली आणि सरकारी हवामान खात्यावर आळस झटकण्याची वेळ आली. आज गोदरेजसारख्या कंपनीने केलेली सणसणीत गुंतवणूक आणि देशी-परदेशी वृत्तमाध्यमे, टाटा आदी ऊर्जा कंपन्यांसारखे ग्राहक यांमुळे स्कायमेट या क्षेत्रात चांगलीच स्थिरावली असून यामुळे सरकारी हवामान खात्यास आव्हान निर्माण झाले आहे. हवाई दलातील निवृत्त कर्मचारी, संगणकतज्ज्ञ अशा अनेकांस सेवेत सामावून घेण्याची व्यावसायिकता दाखवल्याने स्कायमेटच्या हवामान-भाकितांची अलीकडे अधिक चर्चा होताना दिसते. यातून निर्माण झालेल्या आत्मविश्वासामुळे असेल पण स्कायमेटने थेट सरकारी हवामान खात्याच्या ताज्या हवामान भाकितावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. या प्रश्नांत तथ्य आहे असे अनेकांस वाटते. या दोघांत खरे-खोटे वा चूक-बरोबर कोण हे अवघ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण यानिमित्ताने स्कायमेटने निर्माण केलेले प्रश्न दखलपात्र ठरतात.

कारण सरकारी हवामान खात्याने मोसमी पावसाच्या भाकितासाठी स्वत:च घालून दिलेल्या निकषांचे पालन केलेले नाही, असे स्कायमेटचे म्हणणे असून ते त्यांनी सप्रमाण मांडले आहे. मुद्दा आहे मोसमी पावसाचे आगमन केरळात झाले आहे किंवा नाही, हा. यंदा पावसाळा चांगला असेल, तो नेहमीपेक्षा लवकर येईल असे प्रतिपादन सरकारी हवामान खात्याने आधीच केले. त्यामुळे आपले प्रतिपादन रास्त आहे हे दाखवून देण्याच्या नादात यंदा मोसमी पाऊस तीन दिवस आधीच केरळात धडकल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. स्कायमेटचा नेमका आक्षेप याच मुद्दय़ावर आहे. असे पावसाचे आगमन जाहीर करण्यापूर्वी काही ठरावीक निकषांची पूर्तता झाल्याची खात्री करावी लागते. उदाहरणार्थ वाऱ्याचा वेग, पाऊस पडण्यापूर्वी सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेत होणारे बदल आणि मोसमीपूर्व पावसाचे प्रमाण यांचा विचार केला जातो. त्यासाठी केरळ आणि दक्षिण किनारा परिसरात १३ हवामान नोंदणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. दरवर्षी १० मेपासून या केंद्रांतील नोंदीचे विश्लेषण आगामी मोसमी पावसाच्या आगमनाच्या अनुषंगाने केले जाते आणि यापैकी किमान ६० टक्के नोंदी पाऊस आगमनासाठी योग्य असल्याखेरीज पावसाचे भाकीत वर्तवायचे नाही, असा संकेत पाळला जातो.

 तोच सरकारी हवामान खात्याने यंदा मोडल्याचे स्कायमेटचे म्हणणे. हवामान खात्याने पावसाच्या आगमनाची द्वाही फिरवण्यात घाई केली असा स्कायमेटचा आरोप. त्यांचे म्हणणे असे की सलग दोन दिवस सुयोग्य परिस्थिती अनुभवल्यानंतर पावसाचे भाकीत वर्तवण्याऐवजी केवळ एका दिवसातील २.५ मिमी भुरभुरीवर विश्वास ठेवून हवामान खात्याने पाऊस केरळात तीन दिवस आधीच आल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. पाऊस अद्याप हव्या तितक्या जोमाने आलेला नाही. म्हणूनच गेल्या आठवडय़ातही हवामान खात्यास आपल्याच भाकितात सुधारणा करावी लागली आणि मोसमी पावसाची प्रगती थांबली असे जाहीर करावे लागले. त्यानंतर साधारण दोन दिवसांनी मोसमी पावसाच्या वाऱ्यांनी आगेकूच सुरू केल्याचे हवामान खात्याने पुन्हा जाहीर केले आणि नंतर थेट पावसाच्या आगमनाची वर्दी दिली. सध्या परिस्थिती अशी की हवामान खात्याचे खरे मानायचे तर आलेला मोसमी पाऊस स्थिरावायला हवा आणि स्थिरावल्यानंतर तो पुढे सरकायला हवा. पण प्रत्यक्षात असे काहीच होताना दिसत नाही. म्हणूनच स्कायमेटने हवामान खात्याच्या भाकितावर घेतलेला आक्षेप रास्त असावा असे मानण्याकडे अनेकांचा कल दिसतो. यात हवामान खात्याचा अंदाज चुकला इतकाच आक्षेप असता तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरले असते. पण स्कायमेटचे म्हणणे ही केवळ चूक नाही, हवामान खात्याने ठरवून हा प्रमाद केला असून त्यामागे आपले आधीचे भाकीत योग्य होते हे दाखवण्याचा प्रयत्न आहे असा हा आरोप. याकडे दुर्लक्ष हा हवामान खात्याचा प्रतिसाद. पण त्यामुळे उलट हवामान खात्याच्या हेतूंविषयीच शंका निर्माण होते.

याचे कारण ‘चांगले, सकारात्मक’ भाकीत हवामान खात्याने वर्तवावे यासाठी त्यावर सरकारचा किती दबाव असतो हे आता लपून राहिलेले नाही. या विभागाच्या प्रमुखपदी असताना डॉ. वसंत गोवारीकर यांनीच त्या वेळी या दबावाबाबत वाच्यता करण्याचे धैर्य दाखवले होते. तथापि अशा धैर्यवानांची पैदास आता होत नाही की काय असा प्रश्न पडावा अशी आजची स्थिती. त्यामुळे सरकारी यंत्रणेत -आणि त्यातही केंद्रीय-  राहून सरकारी दबावाबाबत कोणी वाच्यता करण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे हुजुरांच्या मनास आल्हाददायक, मंजुळ वाटेल असेच भाकीत वर्तवण्याची सक्ती या खात्यावर होतच नसेल असे मानणे अवास्तव ठरावे. वास्तविक याआधी किमान दोन वेळा, २०१३ आणि २०१५ या वर्षी, स्कायमेटलाही टीकेचे धनी व्हावे लागले आहे. एकदा पाऊसमान चांगले असेल या भाकितासाठी आणि दुसऱ्या खेपेस ते कमी असेल असे सांगितले तेव्हा. या दोन्ही खेपेस वास्तव उलट ठरले. म्हणजे अंदाज, भाकीत चुकणे हा आक्षेपाचा मुद्दा नाही. तो आहे स्वत:च निश्चित केलेल्या निकषांकडे दुर्लक्ष करणे, हा. यंदा पावसाचे आनंदवर्तमान हवामान खात्याने प्रसृत केल्यानंतर हिंदी महासागरातील वाऱ्यांचे हवे तितके सहकार्य पर्जन्यढगांस राहिल्याचे दिसत नाही. तेव्हा ही वाऱ्यांची दिशा, त्यांची क्षमता यांची खात्री पटण्याआधीच हवामान खात्याने पावसाचे भाकीत वर्तवले असावे असे मानण्यास जागा आहे. तथापि या वादाकडे खासगी विरुद्ध सरकारी इतक्याच मर्यादित चौकटीतून पाहणे योग्य नाही. कारण अलीकडे जे जे खासगी ते ते मौलिक आणि पौष्टिक असे मानण्याचा प्रघात पडला आहे. संस्थेची मालकी खासगी हातात आहे की सरकारी यापेक्षा सदर संस्था किती विज्ञानवादी आहे या मुद्दय़ाचा विचार करणे अधिक महत्त्वाचे. खरा अभाव आढळतो तो या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा. ज्या देशात सकल राष्ट्रीय उत्पन्नातील एक टक्काही रक्कम विज्ञान आणि संशोधनासाठी राखली जात नसेल त्या देशाचे वैज्ञानिक भवितव्य ज्योतिर्विदच सांगू शकतील. ही अनास्था एरवी खपूनही गेली असती. पण शेती, पाटबंधारे, जलनियोजन, ऊर्जानिर्मिती आणि वितरण अशी एकापेक्षा अनेक क्षेत्रे ज्या देशात हवामान भाकितावर अवलंबून आहेत त्या देशात सरकारी पातळीवर तरी या खात्यातील गुंतवणुकीस प्राधान्य द्यायला हवे. ते न दिल्याने आज स्कायमेटसारख्या तुलनेने तरुण कंपनीकडे जाण्याचा अनेक उद्योगांचा कल दिसतो. हे; ‘सरकारी कंपन्या मरू द्यायच्या आणि खासगींची धन होऊ द्यायची’ या अलिखित धोरणाप्रमाणेच झाले म्हणायचे. अन्य विज्ञानाधारित क्षेत्रांप्रमाणे हवामान खात्याकडेही असेच दुर्लक्ष होत राहिले तर सरकारी हवामान खात्यापेक्षा ‘सांग सांग भोलानाथ..’ मार्ग बरा आणि स्वस्त असे वाटायचे. तोवर धनिकांस पैसे मोजून चोख माहिती देणाऱ्या स्कायमेटसारख्या कंपन्याची सेवा घेण्याचा मार्ग अधिक विस्तारला असेल.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2022 at 01:10 IST