scorecardresearch

बुडबुडे आवडती सर्वाना!

‘लोकसत्ता’चा प्रयत्न आहे तो बाजारसाक्षरतेचा. गुंतवणूकदारांनी डोळे उघडे ठेवून आणि डोके जागते ठेवून आपला पैसा गुंतवावा.

बुडबुडे आवडती सर्वाना!

‘लोकसत्ता’चा प्रयत्न आहे तो बाजारसाक्षरतेचा. गुंतवणूकदारांनी डोळे उघडे ठेवून आणि डोके जागते ठेवून आपला पैसा गुंतवावा.

राष्ट्रगीतातील ‘भारत भाग्यविधाता’ हे शब्द ऐकून ‘पेटीएम’चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्या डोळ्यांत पाणी आले. तसे होणे साहजिकच. प्रसंग होता त्यांच्या ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ या कंपनीच्या समभागांच्या भांडवली बाजारातील ‘लिस्टिंग’चा. त्याआधी या कंपनीच्या ‘सर्वात मोठय़ा आयपीओ’स सर्वसामान्य ग्राहक, विविध संस्थात्मक गुंतवणूकदार आदींचा उदंड प्रतिसाद लाभला. या ‘आयपीओ’तून १८,३०० कोटी रुपये इतके प्रचंड भांडवल उभा करण्याचा कंपनीचा मानस यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाला. शर्मा यांना देशातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याचा मान हवा होता. तो त्यांना मिळाला. त्यासाठी या कंपनीच्या अवघ्या १ रुपयाच्या समभागाचे मूल्य २१५० रुपये इतके असल्याचे मूल्यांकन कंपन्यांकडून निश्चित केले गेले. त्याबरोबरीने ही कंपनी देशातील डिजिटल व्यवहारांचे कशी आधारस्थान आहे, तिची कशी भरभराट सुरू आहे असे ‘या सम हा’ अशा पद्धतीचे चित्रण ग्राहकांसमोर केले गेले. ‘ओरडणाऱ्याची बोरे विकली जातात, पण मुखदुर्बळांचे आंबेही पडून राहतात’ या आपल्याकडील संस्कृतीप्रमाणे ‘पेटीएम’बाबत अनेकांचा सामुदायिक ओरडा झाल्याने या कंपनीच्या समभागात हां हां म्हणता लाखोंनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर गेल्या आठवडय़ात या समभागांचे समारंभपूर्वक लिस्टिंग झाले. अलीकडे सर्व व्यवहारांत राष्ट्रभावना चेतवण्याच्या नव्याच सवयीप्रमाणे या प्रसंगी राष्ट्रगीत गायन झाले. तेव्हा राष्ट्रगीतातील ‘भारत भाग्यविधाता’ हे ऐकून शर्मा भावनाविवश होऊन त्यांस रडू आले. त्यानंतर या समभागांच्या घसरणीने गुंतवणूकदारांच्या डोळ्यांतूनही अशाच अश्रुधारा वाहिल्या असणार.

शर्मा यांचा अश्रुपात साहजिक अशासाठी की हे भारतातच घडू शकते. जी कंपनी तोटय़ात आहे, ज्या कंपनीच्या ‘उत्पादन’मार्गाची आणि त्याद्वारे नफा आदी भविष्यातील उत्पन्नाची निश्चित शाश्वती नाही त्या कंपनीचा अवघा १ रुपयाचा समभाग तब्बल १९०० पट अधिक रकमेने विकला जातो आणि या मूल्यांकनाबाबत कोणासही काही वाटत नाही. या कंपनीच्या ज्या १ रुपयाच्या समभागासाठी गुंतवणूकदारांनी, यात बडय़ा वित्तसंस्थाही आल्या, प्रतिसमभाग २१५० रुपये मोजले तो समभाग त्या दिवशी तब्बल २७ टक्क्यांनी गडगडला. म्हणजे जे घेण्यासाठी २१५० रुपये मोजले त्याची किंमत त्या दिवशी १५६४ रुपये इतकीच झाली. ही घसरण इतकी मोठी होती की काही काळ त्यातील व्यवहार थांबवले (सर्किट ब्रेकर- जे किमतीत १० टक्के घसरण झाल्यास लागते) गेले. ‘भांडवली बाजारात हे असे होते’, असे स्पष्टीकरण यावर दिले जाईल, ते मान्यच. पण मुद्दा भांडवली बाजारात काय होते हा अजिबातच नाही. तर या बाजारात येण्याआधी समभाग काढणाऱ्या कंपनीच्या मूल्यांकनाबाबत आपल्याकडे काय होते (की होत नाही) हा आहे. याआधीही प्रत्यक्षात ‘त्या वेळी’ एक दमडीचेही उत्पन्न नसलेल्या ‘रिलायन्स पॉवर’ नामे कंपनीचीही अशीच विक्रीपूर्व हवा निर्माण केली गेली आणि बाजाराची फारशी काही समज नसलेल्या नागरिकांनी झुंडीने त्यात पैसे ओतले. पहिल्याच दिवशी हा समभाग दणकून आपटला आणि २८१ रुपयांच्या या समभागाची किंमत आज जेमतेम १४-१५ रु. असेल/नसेल. या समभागाचे मूळ किमतीच्या सुमारे ९५ टक्के इतके प्रचंड अवमूल्यन झालेले आहे. असाच मोठा गवगवा झाला तो ‘नायका’च्या समभागांबाबत. त्याचे मोठे धडाक्यात ‘लिस्टिंग’ झाले. पण नंतर या कंपनीचा ‘सुधारित ताळेबंद’ जाहीर होऊन कंपनीच्या तोटय़ाचे चित्र समोर आल्यावर गुंतवणूकदार गडबडले. या कंपनीच्या नफ्यात तिमाहीत तब्बल ९६ टक्क्यांची घट झाल्याचे यात समोर आले. समभागांचे ‘लिस्टिंग’ झाल्यानंतर कंपनीच्या बँकर्सकडून सुधारित ताळेबंद जाहीर होणे हा केवळ योगायोग समजावा की अन्य काही हे समजून घेण्यास शहाणे समर्थ आहेत. या कंपनीच्या समभागांचे मूल्य आणि कंपनीचे मूल्यांकन याबाबतही अनेक अभ्यासकांनी शंका उपस्थित केल्या होत्या. त्याआधी ‘झोमॅटो’चेही तेच. आज या कंपनीचा समभाग भले दराने कमी झाला नसेल पण अवाढव्य तोटा असताना हा सर्व डोलारा किती काळ असाच टिकणार हा प्रश्न उरतोच. यानिमित्ताने हे नवनवे नवउद्योग (स्टार्टअप) म्हणजे जणू भारतीय गुंतवणूकदारांचे अर्थोद्धारकर्ते हे जे चित्र निर्माण झाले आहे त्याबाबत विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

‘लोकसत्ता’ या नवउद्यमींचे मोल जाणत नाही वा त्यांच्या विरोधात आहे असे अजिबात नाही. पण त्यांच्या रिकाम्या ताळेबंदाचा फुगा ज्या पद्धतीने फुगवला जातो त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हे मात्र ‘लोकसत्ता’ आपले निश्चित कर्तव्य समजतो. याचे कारण असे की या नवउद्यमींतील गुंतवणूकदारांस, ती उभी राहावीत म्हणून भांडवल पुरवणाऱ्यांस आपली गुंतवणूक कशी सत्पात्री आहे हे सांगण्यात रस असतो. ते साहजिकच. त्यामुळे हे जोखीम भांडवलदार (व्हेंचर कॅपिटलिस्ट्स), या समभागांचे बँकर्स आणि अर्थातच या नवउद्योगांचे प्रवर्तक यांच्या एकमेकांतील हितसंबंधावर नजर ठेवून त्यांचे रास्त मूल्यांकन होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी भांडवली बाजाराची नियंत्रक असलेल्या ‘सेबी’ या यंत्रणेची. सांस्कृतिक, साहित्यिक वर्तुळात ज्याप्रमाणे एकमेकांत ‘तू महान, मी महान’ हा खेळ सुरू असतो त्याप्रमाणे अर्थविश्वातही घडत असते. दोहोंतील फरक इतकाच की अर्थविश्वात सामान्य गुंतवणूकदारांचा पैसा असतो. पण त्यातील खऱ्याखोटय़ाने होणारे नुकसान मात्र खरे असते. म्हणून अवाचे सवा मूल्यांकनाचा परिणाम लक्षात घ्यायला हवा. तो असा की त्यामुळे अशा जोखमीच्या उद्योगातील गुंतवणूक सोडवून घेण्याची संधी मूळ भांडवलदारांस मिळते. त्याच्या गुंतवणुकीचे दामदुप्पट होते. पण त्यास भुलून त्यात आपला घामाचा पैसा गुंतवणाऱ्या सामान्य माणसाचे मात्र लाखाचे फक्त बारा होऊन तो भिकेस लागतो. म्हणजेच या उद्योगांचा तोटा सामान्य गुंतवणूकदारांत विभागला जातो (डिस्ट्रिब्युटिंग लॉसेस) आणि प्रवर्तक, भांडवलदार आपल्या गुंतवणुकीवर नफा कमावतात.

जे झाले त्यावरून या कंपन्यांचे दीर्घकालीन मूल्यमापन केले जाऊ नये, असा एक युक्तिवाद यावर होतो. ‘पेटीएम’च्या शर्मा यांचे प्रतिपादनही त्याच धर्तीचे. पण दीर्घकालीन म्हणजे किती? आणि दीर्घकालीन फायदे हवे असतील तर सुरक्षित, सरकारी आदी गुंतवणूक योजना काय वाईट? भांडवली बाजारात सामान्य गुंतवणूकदार येतो तो अल्पकाळात अधिक परतावा मिळावा यासाठी. ‘आज’च्या गरजेचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यास ‘उद्याची’ वाट पाहा हे सांगण्यात काय शहाणपण? तेव्हा या कंपन्यांनी नफा जरूर कमवावा. तेच उद्योगाचे ध्येय असायला हवे. पण यात काही एक प्रामाणिकपणा असणे गरजेचे आहे. हा प्रामाणिकपणा निरोगी भांडवलशाहीचा कणा असतो. तो ताठ राहील हे पाहण्याची जबाबदारी ‘सेबी’सारख्या यंत्रणेची. त्या यंत्रणेवर दबाव असायला हवा तो जागरूक, अर्थ आणि बाजारसाक्षर गुंतवणूकदारांचा. खरी मेख आहे ती येथेच. या सामाजिक विवेकाची बोंब हेच तर आपले खरे दुखणे. त्यामुळे जन्माला आल्या आल्या ‘सत्यम’सारख्या कंपन्यांचे बाजारमूल्य (मार्केट कॅप) अनेक बडय़ा बडय़ा कंपन्यांपेक्षा किती तरी पट अधिक असल्याची हवा निर्माण केली जाते आणि तरीही त्यावर ‘ब्र’ही कोणी काढत नाही. या प्रसंगी नंतर ‘सत्यम’चे काय झाले याचे स्मरण करून देण्याची गरज नाही आणि या नव्या नवउद्यमींची, त्यांच्या उद्योगांची तुलना ‘सत्यम’ वा तिचा प्रवर्तक रामलिंगम राजू याच्याशी करण्याचा हेतू नाही. ‘लोकसत्ता’चा प्रयत्न आहे तो बाजारसाक्षरतेचा. गुंतवणूकदारांनी डोळे उघडे ठेवून आणि डोके जागते ठेवून आपला पैसा गुंतवावा. कारण सरकारी यंत्रणांच्या भरवशावर राहिले की काय होते याचे दाखले द्यावेत तितके कमीच. अनेक बुडबुडे आतापर्यंत आले. त्यात अनेकांचे हात पोळले. राजकीय असो वा सामाजिक वा आर्थिक. ‘बुडबुडे आवडती सर्वाना’ हेच आपले वास्तव. अन्य क्षेत्रांचे ठीक. पण आपल्या नेकीच्या गुंतवणुकीवर नेक नफा हवा असेल तर या क्षेत्रातील बुडबुडे निर्मितीआधीच रोखायला हवेत.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या