शेजारी देशात हुकूमशहा निर्माण होणे हे सर्वार्थाने भयंकर आणि चिंताजनकच..

पक्षाचा नेता हा स्वतस पक्षापेक्षा मोठा मानू लागला की त्यातून फक्त हुकूमशहा निर्माण होतो. असा नेता केवळ स्वतचीच प्रतिमा अधिकाधिक मोठी कशी होईल याचा विचार करतो असे नाही. तर इतर कोणा नेत्याची प्रतिमाच तयार होणार नाही, याची काळजी तो सातत्याने घेतो. अशा नेत्याच्या आसपास फक्त स्तुतिपाठक असतात आणि त्यास जराही टीका सहन होत नाही. अशा वृत्तीच्या नेत्याचे म्हणून काही साजिंदे असतात. ते अशा नेत्यास पक्षातून काही आव्हानच उभे राहणार नाही, याची काळजी सदोदित घेतात. अशा नेत्यास कोणा सल्लागाराची गरज नसते. कारण तो स्वतस सर्वज्ञ मानतो. अशा नेत्याच्या भोवती पारंपरिक पद्धतीचे नेतृत्वमंडळदेखील राहत नाही. कारण हा नेता स्वतची अशी कार्यपद्धती निर्माण करतो. या कार्यपद्धतीत सर्वोच्च पातळीवरील निर्णयप्रक्रियेत चर्चाविनिमय, सल्लामसलत आदींना काही स्थान नसते. असे वर्तन आणि कार्यशैली असणाऱ्या नेत्याच्या नजीकच्या वर्तुळात नक्की आहेत तरी कोण असा प्रश्न आसपासच्यांना नेहमी पडत असतो आणि त्याचे उत्तर काही त्यांना मिळत नाही. अधिकाराच्या विकेंद्रीकरणात अशा नेत्यास स्वारस्य नसते. त्यामुळे विषय कोणताही असो, त्याबाबतचे अंतिम निवडाधिकार या नेत्याहातीच असतात. अशा गुणांचा समुच्चय असलेला नेता वर्तमानात असेल तर भविष्यात त्यातून हुकूमशहा निर्माण होण्याची भीती असते.  किंबहुना तसा तो होतोच होतो. आपल्या शेजारील चीन या देशातील नागरिकांना सध्या या भीतीने ग्रासलेले आहे. कारण अध्यक्ष क्षी जिनिपग यांचा निर्णय.

तो पक्षाच्या घटनादुरुस्तीसंदर्भातील आहे. चिनी साम्यवादी पक्षाच्या सध्याच्या घटनेनुसार त्या पक्षाच्या सरचिटणीसपदी वा अध्यक्षपदी असलेली व्यक्ती देशाची सर्वोच्च सत्ताधीश, म्हणजे अध्यक्ष, बनते. असा अध्यक्ष दोन खेपेस या पदावर राहू शकतो. म्हणजे दहा वर्षे झाली की त्यास अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागते आणि त्याच्या हातातील सत्ता उत्तराधिकाऱ्याकडे दिली जाते. परंतु चीनमध्ये सत्ताधारी साम्यवादी पक्षाच्या घटनेत बदल केला जाणार असून त्यामुळे अध्यक्ष जिनिपग हे तहहयात देशाचे सर्वोच्च नेते राहू शकतील. हे सर्वार्थानेच भयंकर म्हणावे लागेल. याचे कारण आता चिनी सत्ताधारी पक्षात जिनिपग यांना कोणाचे आव्हानच राहणार नाही. हे असे होणार असल्याची अटकळ अनेकांनी बांधलेली होतीच. ती खरी ठरली. गतसाली ऑक्टोबर महिन्यात पक्षाच्या महाधिवेशनात जिनिपग यांनी उत्तराधिकारी सूचित करणे टाळले. तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. जिनिपग यांची दहा वर्षांची कारकीर्द संपत आली असून त्या महाधिवेशनात जिनिपग यांनी उत्तराधिकारी जाहीर केला असता तर ती सत्तांतराची नांदी ठरली असती. पण जिनिपग यांनी तसे न करून आपण कोणत्या दिशेने जाणार आहोत हे त्याच वेळी दाखवून दिले. ही दिशा आज खरी ठरली. ही घटना फारच दूरगामी आहे.

आधुनिक चीनचे उद्गाते, सांस्कृतिक क्रांतीचे प्रणेते माओ झेडाँग यांच्या निधनानंतर १९७६ साली तेथील सत्ताधारी पक्षाने ही दोन खेपेची अट पक्षघटनेत अंतर्भूत केली. त्या वेळी अध्यक्ष डेंग शियाओ पिंग यांनी राजकीय आणि आर्थिक आघाडीवर मोठय़ा प्रमाणावर सुधारणा हाती घेतल्या. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या कार्यकाळावर ही दोन खेपांची मर्यादा घालण्याचा निर्णय त्यांचाच. त्यामागचा हेतू हा की माओ यांच्याप्रमाणे कोणासही जन्मभर अध्यक्षपद उपभोगण्याचा मोह होऊ नये. माओ हे हुकूमशहा होते आणि त्यांच्या काळात सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली लाखोंचे शिरकाण झाले. ते होते तोपर्यंत त्यांना अडवू शकणारा कोणीच निपजला नाही. तसा तो निपजू नये अशीच ती पक्षाची व्यवस्था होती. त्यामुळे माओंच्या पश्चात साम्यवादी पक्षात झालेली घटनादुरुस्ती ही महत्त्वाची ठरली. त्यानंतरच्या दोन अध्यक्षांनी, जियांग झेमीन आणि हु जिंताव यांनी आपापल्या दोन खेपा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नव्याने अध्यक्षपदाचा विचार केला नाही. या दोघांच्या पाठीवर सत्ताधीश झाले क्षी जिनिपग. अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून जिनिपग यांनी आपला सत्तेचा खुंटा अधिकाधिक बळकट कसा होईल यासाठीच प्रयत्न केले. याची दृश्यफळे लगेचच दिसू लागली. दोन वर्षांपूर्वी पक्षाने त्यांना आपला मध्यवर्ती नेता असे जाहीर केले. तेव्हाच खरे तर आपणासमोर पुढे काय वाढून ठेवले आहे याची जाणीव चिनी जनतेस झाली असावी. कारण माओ यांच्यानंतर कोणालाही हे असे मध्यवर्ती नेता वगैरे जाहीर केले गेले नव्हते. त्याचमुळे जिनिपग आपला उर्वरित काळ हा आपली सत्ता टिकविण्यासाठीच अधिकाधिक घालवणार हे कळून चुकले. जिनिपग यांचे चातुर्य असे की आपल्या पहिल्या खेपेत त्यांनी सामान्य जनतेस चांगलेच आपल्या बाजूस वळवले. त्यासाठी त्यांनी मार्ग निवडला तो सामान्य नागरिकांना भावणाऱ्या विषयाचा.

तो म्हणजे भ्रष्टाचार. आपण सोडून पक्षाचे अन्य नेते हे भ्रष्टाचारी आहेत आणि हा भ्रष्टाचार मोडून काढणे हेच आपले अवतारकार्य आहे हे त्यांनी जनतेच्या मनावर इतक्या उत्तमपणे बिंबवले की त्यांना आपोआपाच जनाधार मिळाला. यातही महत्त्वाची बाब म्हणजे जिनिपग म्हणतील तेच भ्रष्ट. स्वतंत्र न्याययंत्रणा आणि शरणांकित माध्यमे यामुळे जिनिपग यांच्या विरोधात कोणी ब्रदेखील काढला नाही. या वातावरणाचा लाभ घेत जिनिपग यांनी आपल्या अनेक स्पर्धकांना थेट यमसदनास तरी पाठवले किंवा पार नेस्तनाबूत तरी केले. बो झिलाई यांचे जे काही झाले त्यातून जिनिपग यांची कार्यशैली दिसून येते. सत्ताधारी पक्षाचा उगवता तारा असलेले बो यांना भ्रष्टाचार आदी मुद्दय़ांवर कारवाईस तोंड द्यावे लागले. पुढे तर ते राजकीय व्यासपीठावरून दिसेनासे झाले. या काळात जिनिपग यांनी माध्यमांवरही चांगलेच नियंत्रण मिळवले. विशेषत समाजमाध्यमांत आपल्या विरोधी वातावरण तयार होऊ नये याविषयी जिनिपग कमालीचे दक्ष आहेत. आताही पक्षाच्या केंद्रीय समितीने जिनिपग यांच्याबाबत दोन वेळा अध्यक्षपदी राहण्याची मर्यादा शिथिल केल्यानंतर चिनी माध्यमांत प्रतिक्रिया प्रसृत होत आहेत त्या केवळ गौरवाच्या. जिनिपग किती थोर, किती द्रष्टे वगैरे प्रतिक्रियांनी चिनी माध्यमे ओसंडून वाहत असून जरा जरी विरोधी सूर लागलेला दिसला तर तशा भावना ताबडतोब काढून टाकल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर समाजमाध्यमांत ‘दुसरी खेप’, ‘घटनादुरुस्ती’, ‘हुकूमशहा’ वगैरे शब्द देऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल ही शक्यता गृहीत धरून असे काही होऊ नये याची काळजी आधीच सरकारकडून घेण्यात आली आहे. अशा तऱ्हेने आपण कोणत्याही अडथळ्याविना अध्यक्षपदी राहू याची पूर्ण तजवीज जिनिपग यांनी केल्याचे दिसते. परंतु त्यामुळे चीनमध्ये एकंदरच उदासीनता दाटून आली असून देश किमान ३० वर्षांनी तरी मागे गेल्याची भावना व्यक्त होते. या अशा घटनादुरुस्तीच्या प्रस्तावासमोर साम्यवादी नेत्यांनी माना तुकवायला नको होत्या, आज जिनिपग यांचा अपवाद झाला, उद्या अन्य अध्यक्षालाही असे वाटू शकेल, ही सर्वसाधारण प्रतिक्रिया.

परंतु या घटनादुरुस्तीमुळे नव्या अध्यक्षाचा उद्या मुळात उजाडेल काय हाच खरा प्रश्न आहे. तिकडे रशियात व्लादिमीर पुतिन यांनीही अशीच घटनादुरुस्ती करून तहहयात अध्यक्ष राहण्याची व्यवस्था केली आहे. आणि आता हे चीनचे जिनिपग. उद्याचा नवा हुकूमशहा.