सरसंघचालकांनी उजवीकडील संशोधक-अनुपस्थिती ज्या अर्थी इतक्या गांभीर्याने घेतली त्या अर्थी यामागील कारणांचा शोध घेण्यात संघास मदत केली पाहिजे..

आहे ते नाकारणे, आहे त्याची अपूर्णता ओळखून पूर्णत्वासाठी प्रयत्न करणे ही संशोधनाची प्रेरणा असते. आहे हे उत्तमच आहे आणि इतिहासात याहीपेक्षा आपले उत्तमच होते असाच जर ठाम समज करून दिला जात असेल तर या बाजूकडील व्यक्तींत संशोधनाची प्रेरणा निर्माण होणारच कशी?

सरसंघचालक मोहनराव भागवत यांचे अभिनंदन. उजव्या विचारधारेत संशोधक का नाहीत, असा प्रश्न सरसंघचालकांना पडला असून या निमित्ताने तो मांडून त्यास भिडण्याचा प्रामाणिकपणा त्यांनी दाखवला. निमित्त होते संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ज्ञानसंगम. नामसाधम्र्यामुळे सरसंघचालकांचे ज्ञानसंगम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी दोन वेळा आयोजित केलेल्या ग्यानसंगमाशी संबंधित असल्याचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. तो वेळीच दूर करावयास हवा. पंतप्रधानांनी दोन वेळा आयोजित केलेले ग्यानसंगम हे राष्ट्रीयीकृत बँकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांपुरतेच मर्यादित होते. संघ असल्या छोटय़ा, लघुदृष्टीने समस्येकडे पाहत नाही. संघाची दृष्टी व्यापक असते ही बाब लक्षात घेता सरसंघचालकांच्या ज्ञानसंगमाचा तितक्याच व्यापक दृष्टिकोनातून आढावा घ्यायला हवा. दिल्ली येथे गेले दोन दिवस हे संघसंयोजित ज्ञानसंगम पार पडले. देशभरातील विविध विद्यापीठे, शिक्षण संस्था अशांतील ७२१ कुलगुरू/ प्राचार्य/ प्राध्यापक या परिषदेत सहभागी होते. तर या वेळी सरसंघचालकांच्या उपस्थितीत सहभागींना विचारले गेले की, यातील कोणी कोणी संशोधनपर ग्रंथलेखन केले आहे? या ७२१ पैकी एकाही महाभागाचा हात या प्रश्नाच्या उत्तरात वर उचलला गेला नाही. याचा अर्थ यातील एकानेही ज्यास काही दर्जा असेल असे संशोधन साहित्य प्रसवण्याइतके बुद्धिवैभव प्राप्त केलेले नाही. ही बाब समोर आल्यावर खट्टू होत आयोजकांनी उजव्या विचारधारेतही जास्तीत जास्त संशोधक कसे निपजतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली आणि सरसंघचालकांनी त्यास दुजोरा दिला. ज्या अर्थी सरसंघचालकांनी उजवीकडील संशोधक अनुपस्थिती इतक्या गांभीर्याने घेतली त्या अर्थी यामागील कारणांचा शोध घेण्यात संघास मदत करणे आपले कर्तव्य ठरते.

ते पार पाडताना एका मूलभूत प्रश्नास हात घालावयास हवा. संशोधनामागची प्रेरणा काय असते?, हा तो प्रश्न. मग ते संशोधन प्राध्यापकाकडून झालेले असो वा प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांत. आहे त्या वास्तवास अधिक उत्तम करणे वा त्यातील त्रुटी दूर करणे हे आणि हेच कोणत्याही संशोधनामागील कारण असते. वर्तमानातील अपूर्णता दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे संशोधन. परंतु उजव्या विचारधारेत आहे हे उत्तमच आहे आणि इतिहासात याहीपेक्षा आपले उत्तमच होते असाच जर ठाम समज करून दिला जात असेल तर या बाजूकडील व्यक्तींत संशोधनाची प्रेरणा निर्माण होणारच कशी? उदाहरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा उजव्यांतील विद्यमान बृहस्पती प्रा. दीनानाथ बात्रा. यांच्या मते अवयवांचे कृत्रिम आरोपण ते औषधनिर्मितीशास्त्र ते दहशतवाद प्रतिबंधक यंत्रणा हे सगळे आपल्याकडे हजारो वर्षांपासूनच आहे. आता हेच जर सत्य असेल तर या क्षेत्रात कोणाला कशाला आपल्याकडे संशोधन करावे असे वाटेल? वास्तविक इतके जर आपण पुढारलेले होतो तर अगदी अलीकडेपर्यंत साध्या पटकी वा हगवणीने आपल्याकडे माणसे का मरत होती? आपल्याकडच्या एकाही आयुर्वेदाचार्यास औषधांच्या प्रमाणीकरणाची गरज का वाटली नाही? आणि पंतप्रधान मोदी म्हणतात त्याप्रमाणे रामायणातील जटायूने दहशतवादास कसे तोंड द्यायचे हे जर आपल्याला शिकवले असेल तर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली लष्करी तळांत एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीन-तीनदा दहशतवादी घुसून आपल्या जवानांची हत्या करतातच कसे? हे आणि असे प्रश्न आपणास पडावयास हवेत. परंतु इथेच तर खरी मेख आहे. प्रश्न न पडणे हे उजव्या बाजूच्या मंडळींचे व्यवच्छेदक लक्षण असते आणि प्रश्नच जर पडणार नसतील तर संशोधक वृत्ती बळावणारच कशी आणि संशोधक तयार होणारच कसे? कारण आहे ते नाकारणे, आहे त्याची अपूर्णता ओळखून पूर्णत्वासाठी प्रयत्न करणे ही संशोधनाची प्रेरणा असते. म्हणजेच उजव्या बाजूला विचारवंत, संशोधक तयार व्हावेत असे संघास वाटत असेल तर मग व्यवस्थेस प्रश्न विचारण्याची सवय आणि संस्कृती रुजवावी लागते. मग तो प्रश्न समतेचा दावा करणाऱ्या संघात महिलांना प्रवेश का नाही, हादेखील असू शकतो आणि त्यावर महिलांसाठी स्वतंत्र संघटना आहे हे पळवाटी उत्तर असू शकत नाही.

उजवे तत्त्वज्ञान मानणाऱ्यांत संशोधक व्हायला हवेत असे जर संघास प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्याची सुरुवात संघाने बडोदे येथील सयाजीराव विद्यापीठापासून करून दाखवावी. देशात सध्या संघविचारांची चलती आहे म्हणून या विद्यापीठातील कोणा दीडशहाण्याने विद्यापीठातर्फे भारतीय ‘संशोधक/वैज्ञानिक’ (?) ऋषिमुनींचे संकलन प्रकाशित केले आहे. त्याद्वारे, आचार्य कणाद हा जगातील पहिला अणुवैज्ञानिक, प्रक्षेपक/ विमाने तयार केली महर्षी भारद्वाजाने, अवयवारोपण विकसित करण्याचे श्रेय जाते सुश्रुतास, कॉस्मोलॉजीतला जगातला पहिला संशोधक आपले कपिल मुनी आदी जुन्याच कथांना या विद्यापीठाने राजमान्यता देण्याचा प्रयत्न केला. याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि विज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळवणारे वेंकटरमण रामकृष्णन ऊर्फ वेंकी यांनी या उचापतींस विरोध दर्शवला असून असल्या भाकडकथांना राजमान्यता दिल्याने बाहेर भारताचे हसेच होते, असे म्हटले आहे. ‘भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. शून्याचा शोध या भारतातच लागला आणि विसाव्या शतकात तर सीव्ही रमन, जगदीशचंद्र बोस ते मेघनाद साहा अशा अनेकांच्या संशोधनाने विज्ञान पुढे गेले. अशा वेळी उगाच पुराणातल्या वानग्यांच्या आधारे मोठेपणाचा आव आणण्याची काहीही गरज नाही,’ असे वेंकी यांनी विद्यापीठास सुनावले आहे. विद्यार्थ्यांसमोर आदर्शच ठेवावयाचा असेल तर वर उल्लेखलेल्या व्यक्ती वा तत्समांचा ठेवावयास हवा. ते सोडून ज्यांच्या दंतकथांना काहीही पुरावा नाही, अशांचे दाखले देण्याने आपलेच हसे होते, असे रामकृष्णन यांचे म्हणणे असून असे करण्यात काहीही देशभक्ती, राष्ट्राभिमान नाही, असे त्यांचे मत आहे. उजव्या विचारधारेत वैज्ञानिक संशोधकांची कमतरता आहे असे संघास खरोखरच वाटत असेल तर सरसंघचालकांनी रामकृष्णन यांच्या विधानांचे स्वागत करावयास हवे. आणि समजा ही विधाने संघास स्वागतयोग्य वाटत नसतील तर या भाकडकथा प्रयोगाने सिद्ध करून दाखवण्याची तरी व्यवस्था करावी. रामायणकालीन भारद्वाज ऋषींना विमानविद्या अवगत होती यावर जर संघ ठाम असेल तर आज एकविसाव्या शतकातही अद्याप एकही विमाननिर्मिती कंपनी भारतीय का नाही? इतकेच काय आपल्या वायुदलाने बनवलेले हेलिकॉप्टर अजूनही गुरुत्वीयबलाचा सामना करावयास का लाजते अशा काही प्रश्नांचे प्रामाणिक उत्तर घेण्याचे धाडस तरी संघाने दाखवावे.

परंतु यातील काहीही संघ करणार नाही आणि सरसंघचालकदेखील अशा काही कृत्यांस उत्तेजन देणार नाहीत. याचे कारण घाऊक पातळीवर नंदीबैल तयार करणे हे उजव्या विचारधारांचे वैशिष्टय़ असते. ही उजवीकडची मंडळी बौद्धिक आव्हानांना घाबरतात आणि त्यामुळे अधिकारांस आव्हान न देणे, व्यवस्थेस प्रश्न न विचारणे अशांचे उदात्तीकरण करतात. हे आताचे नाही. गॅलिलिओपासून हेच सुरू आहे आणि गाय या अन्य पशूसारख्या पशूस माता म्हणणारे आताही तेच करीत आहेत. असल्या अजागळ प्रथा दूर करून विज्ञानवादी दृष्टिकोन मांडण्याचे धैर्य उजवीकडच्या सावरकरांनी दाखवले. पण म्हणून तर संघास सावरकर पेलवत नाहीत. त्यांना बथ्थड बात्राच बरे वाटतात. तेव्हा डाव्यांच्या तुलनेत विचारवंत, संशोधक उजव्या विचारधारेतही तयार व्हावेत असे संघास मनोमन वाटत असेल तर प्रथम उजव्या मनांवरची संस्कृती नामक कालबाह्य पुटे पुसण्याचे धैर्य संघाने दाखवावे. विचारांचे स्वातंत्र्य नसेल तर विचारवंत, वैज्ञानिक तयार होत नाहीत. ते मिळणार नसेल तर नुसती इच्छा आहे म्हणून ज्ञानसंगमातल्या गोटय़ांना आकार मिळणारा नाही.