इस्लामी दहशतवाद्याकडून फ्रान्समध्ये झालेला नृशंस नरसंहार आणि त्यापाठोपाठ तुर्कस्तानातील बंड या दोन्ही घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत..
फ्रान्समधील निर्वासितांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी प्रचंड असंतोष खदखदत असून त्यातूनच तेथे दहशतवादी हल्ल्यांच्या घटना वाढू लागल्या आहेत. तर तुर्कस्तानमध्ये आजही जवळपास ५२ टक्के जनता एर्दोगान यांच्यामागे आहे. बळी आणि बलवान या दोन्ही भूमिका एकाच वेळी रंगवण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत मानले जाते. त्यांची अधिकारशाही तुर्कस्तानातील सुजाणांच्या डोळ्यावर येत आहे..
‘‘लोकशाही ही रेल्वेगाडीसारखी असते; आपले गंतव्यस्थान आले की ती सोडून द्यायची,’’ असे तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांचे मत आहे. त्यांचे वर्तन या वचनास साजेसे असून यातून त्यांची लोकशाही विचारसरणीवरील व्यभिचारी निष्ठा दिसून येते. दोन दिवसांपूर्वी तुर्कस्तानात लष्कराकडून जो थरारक उठावाचा प्रयत्न झाला तो याच व्यभिचाराचा निषेध होता. जवळपास ३०० जणांचा बळी गेल्यानंतर हे फसलेले बंड शांत झाले असले तरी तुर्कस्तानसारखा देश त्यातून मुळापासून हादरला आहे, हे नाकारता येणार नाही. तसेच अमेरिकाकेंद्रित नाटो संघटनेचा हा महत्त्वाचा सदस्य अशा हादरलेल्या अवस्थेत पाहून पाश्चात्त्य सत्तांनाही हुडहुडी भरू लागली असून युरोप आणि आशियाच्या सीमेवरील या देशाचे काय होणार असा प्रश्न यातून समोर ठाकला आहे. इस्लामी दहशतवाद्याकडून युरोपातील फ्रान्समधील नाइसमध्ये झालेला नृशंस नरसंहार आणि पाठोपाठ याच इस्लामी दहशतवाद्यांची फूस असलेल्या तुर्कस्तानातील हे बंड यामुळे लोकशाहीवादी शक्तींकडून जगास अधिक समंजस आणि सहनशील करण्याच्या प्रयत्नांस मोठाच तडा गेला आहे. तेव्हा हे परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे गरजेचे ठरते.
प्रथम फ्रान्सविषयी. सांस्कृतिक मोकळेपणा आणि उदारमतवाद यामुळे गेली काही वष्रे फ्रान्स हा अस्थिर देशांतील, त्यातही आशिया आणि आफ्रिका यांच्या सीमेवरील प्रदेशांतील नागरिकांसाठी पहिल्या पसंतीचे आश्रयस्थान राहिलेला आहे. अल्जीरिया, टय़ुनिशिया, सीरिया, लेबनॉन आदी देशांतून गेली कित्येक दशके फ्रान्समध्ये निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे आले. आता या निर्वासितांची तिसरी पिढी फ्रान्समध्ये नांदत आहे. परंतु तरीही ती फ्रेंच जनजीवनात रुळलेली नाही. हे निर्वासित आपापल्या कोंडाळ्यात राहतात आणि फ्रान्समधील कलासांस्कृतिक आदी विश्वाशी त्यांचा काहीही संबंध नाही. या निर्वासितांची आíथक स्थितीही बेतासबात असते आणि परिणामी त्यांच्या वसाहतीही किडके जगणेच जगत असतात. अशा वसाहतींच्या अंतरंगात एक अंगभूत अस्वस्थता नांदत असते आणि अन्यांच्या प्रगतीने ती अधिकच विखारी होत असते. त्यात अलीकडे, विशेषत: गेल्या वर्षभरात, शार्ली एब्दो साप्ताहिक आणि नंतर काही ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत निर्वासितांची भूमिका उघड झाल्यानंतर फ्रेंच सरकारने या निर्वासितांची जनुकीय नोंदणी सुरू केली. भर रस्त्यात, प्रवासात वा अन्य कोठेही या निर्वासितांना अडवून त्यांची चौकशी सुरू झाली. हे कमीपणाचे आहे. त्यात अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे निर्वासितांविषयी आगलावी भूमिका घेणाऱ्या मेरी ली पेन यांच्या भडक फ्रेंच राजकारणामुळे वातावरण अधिकच कलुषित होत गेले. सर्वसामान्य नागरिकांना या भडकपणाचे आकर्षण वाटू शकते आणि फ्रेंच जनता त्यास अपवाद नाही. या सर्व कारणांमुळे निर्वासितांत खदखद होतीच. फ्रान्सने सीरियातील बंडखोरांविरोधात केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे ती अधिकच िहस्र होत गेली. याचीच परिणती फ्रान्समध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्यांत होत असून नाइस या शहरात जे घडले त्यातून हेच दिसून आले. या हल्ल्यातून आणखी एक थरकाप उडवणारी गोष्ट समोर आली. ती म्हणजे मालमोटारीचाच अस्त्र म्हणून झालेला वापर. हे असे प्रकार आता अधिकाधिक होत जाणार हे नि:संशय. तेव्हा कोठेही गर्दीच्या ठिकाणी या मोटारास्त्राचा वापर टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना नवे मार्ग शोधावे लागतील.
या तुलनेत तुर्कस्तानात जे घडले ते जुनेच म्हणावे लागेल. कारण या देशास लष्करी उठाव नवे नाहीत. गेल्या चार दशकांत चार वेळा लष्कराने तुर्कस्तानात आपल्या हाती सरकारची सूत्रे घेतली. यातील शेवटचा लष्करी उठाव टर्कीने १९९० साली अनुभवला. १९२३ साली केमाल पाशा याने स्थापन केलेला आधुनिक तुर्कस्तान त्यानंतर स्थिरावल्याचे मानले जात होते. या ताज्या उठावाने या समजास चांगलाच तडा गेला. त्याचबरोबर अध्यक्ष एर्दोगान यांच्यासमोरील आव्हानही त्याने उघडे पाडले. हा गृहस्थ २००२ पासून एकही निवडणूक हरलेला नाही. सुरुवातीला जेव्हा ते पंतप्रधान झाले त्या वेळी त्यांच्याकडे इस्लामी जगतातील सर्वात मोठी.. आणि एकमेव.. लोकशाहीवादी आशा म्हणून पाहिले जात होते आणि त्या वेळी त्यात काही गर होते असे नाही. परंतु राजकारणातील आपला खुंटा जसजसा एर्दोगान बळकट करीत गेले तसतसे त्यांचे वर्तन बदलले आणि २०१४ साली अध्यक्ष बनल्यावर तर त्यांनी लोकशाही विचारास खुंटीवर टांगले. एर्दोगान यांची ही अधिकारशाही हा तुर्कस्तानी समाजातील सुजाणांच्या डोळ्यावर येणारा मुद्दा असून त्यांचे पुतिनीकरण झाल्याचे त्यामुळे मानले जाते. कारण त्यांचे हे वर्तन रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याप्रमाणे आहे. राजधानी अंकारा येथील एका टेकडीवर एर्दोगान यांनी स्वत:साठी शंभरभर खोल्यांचा प्रासाद उभारला असून हे निवासस्थान व्हाइट हाऊसला छोटेखानी ठरवेल इतके प्रचंड आहे. एर्दोगान तेथूनच देश हाकतात. त्यात त्यांना काहीही कमीपणा वाटत नाही कारण जनमतावर असलेली त्यांची पकड. आजही जवळपास ५२ टक्के तुर्कस्तानी जनता त्यांच्यामागे आहे. बळी आणि बलवान या दोन्ही भूमिका एकाच वेळी रंगवण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत मानले जाते. याचमुळे देशातील असंतोषातील हवा काढून टाकणे त्यांना इतके दिवस शक्य होते.
इतके दिवस म्हणायचे याचे कारण त्यांच्या इस्लामीकरणाच्या धोरणास आता लागत असलेली फळे. समाजमनावरील आपली पकड अधिकाधिक मजबूत राहावी यासाठी एर्दोगान यांनी राजकारणाचे इस्लामीकरण सुरू केले. तुर्कस्तानात इतके काळ असलेली सहिष्णुता पातळ करण्याचे पाप त्यांचे. या कामात त्यांनी सुरुवातीला फेतुल्ला गुलेन यांची मदत घेतली. गुलेन हे सुन्नी धर्मगुरू. सध्या अमेरिकेतील पेनसिल्वानियात विजनवासात असलेल्या गुलेन यांनी उभ्या केलेल्या पंथाचे जगभरात ४० लाखांहून अधिक समर्थक आहेत. अगदी शालेय वयातच गुलेनपंथीयांच्या नवसदस्यांना पंथात सामावून घेतले जाते. पुढे कोणत्याही क्षेत्रात गेली तरी ही व्यक्ती मग या पंथाशी निष्ठा सोडत नाही. २०१३ पर्यंत हे गुलेन हे एर्दोगान यांचे सत्ताधार होते. परंतु आपण फारच अधिकार या गुलेन यांना सोपवीत आहोत हे ध्यानात आल्यानंतर एर्दोगान यांनी त्यांना दूर करण्यास सुरुवात केली आणि आता दोघांत पूर्णच वितुष्ट आहे. इतके की ताज्या उठावामागे गुलेन यांचाच हात असल्याचा आरोप एर्दोगान यांनी केला असून गुलेन यांनी तो नाकारलेला नाही. आता या दोघांत संघर्ष असून त्यात तुर्कस्तानची जनता बळी पडताना दिसते.
तुर्कस्तानात जे आज सुरू आहे त्याची पुनरुक्ती अन्य देशांत झाल्यास नवल नाही. सत्ताकारणासाठी जे जे धर्माचा आधार घेतात त्यांच्या मार्गात पुढे धर्ममरतड हेच मोठा अडथळा ठरतात, हा इतिहास आहे. महंमद बिन इब्न सौद आणि महंमद इब्न अब्द अल वहाब यांच्यातील संघर्षांने जगाने अलीकडच्या काळात तो अनुभवला. आपल्याकडेही भिंद्रनवाले याचे भूत उभे राहिले ते याच धर्म आणि राजकारणाच्या अपवित्र संकरातून. जगभरात आततायी आणि कर्कश राजकारण्यांचे प्रस्थ वाढत असताना तुर्कस्तानात जे काही झाले वा होत आहे, त्यातून काही धडा शिकण्याची गरज आहे. परंतु तो शिकण्यास कोणी तयार नसल्याने सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी दिवंगत ह. ना. आपटे यांनी जे म्हणून ठेवले ते म्हणावयाची वेळ आपल्यावर आली आहे. काळ तर मोठा कठीण आला!