ट्रम्प यांनी प्रचारात व्यक्त केलेल्या व्यक्तिगत मतांप्रमाणेच त्यांची राजकीय भूमिका असेल, तर भारताशी त्यांच्या अमेरिकेचे संबंध कसे असतील?
भारत हे थोर राष्ट्र आहे, आपणांस हिंदूंबद्दल प्रेम आहे, अशी विधाने ट्रम्प यांनी केली आहेत, भारतास सहानुभूती असेल असे मानण्याकडे काहींचा कल दिसतो. परंतु प्रचारातली वानगी म्हणून ती सोडून देणेच योग्य. त्यांची महत्त्वाची विधाने वेगळीच आहेत..
एरवीही अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होते हा भारतीयांच्या औत्सुक्याचा, आकर्षणाचा विषय असतो. यंदा तो अधिकच होता. इतका की या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्या काही गाव-शहरांतून साखर वाटली गेली. कोणी फटाके फोडले. काही ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांच्या तसबिरीला लाडू-पेढे भरविण्यात आले. रामदेव बाबा या उद्योगी साधूला या भारतीयांचा प्रतिनिधी म्हणता येईल. निकालानंतरची त्यांची प्रतिक्रिया चांगलीच बोलकी होती. ते म्हणाले, ट्रम्प यांचा विजय भारतासाठी शुभदायक आहे. ते का, तर ट्रम्प हे दहशतवादाच्या विरोधात आहेत आणि ते अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे दहशतवादाचे वाईट दिवस सुरू झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यामुळे पाकिस्तान कोंडीत सापडणार आहे. रामदेव बाबा हे अर्थकारणाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचेही पंडित असल्यामुळे त्यांनी अशी प्रतिक्रिया देणे हे स्वाभाविकच आहे. भारतातील अनेकांचीही नेमकी हीच भावना आहे. त्या भावनेला अर्थातच मुस्लीमद्वेषाचे कोंदण आहे. ट्रम्प हे मुस्लीमद्वेष्टे असल्याचे मानले जाते. त्यामुळे यापुढे या धर्मीयांचे आणि त्यांच्या देशांचे काही खरे नाही असे अनेकांना मनोमन वाटत आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्या विजयानंतर अनेक अमेरिकी नागरिकांना देशाचे वाईट दिवस सुरू झाल्याचे वाटत असताना, ट्रम्प यांच्याविरोधात तेथे मोर्चे काढण्याची तयारी सुरू असताना, भारतात मात्र फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात येत होता. ट्रम्प हे अध्यक्ष झाल्यामुळे भारताच्या पाकिस्तान आणि चीन या दोन पारंपरिक शत्रूंची नांगी परस्पर ठेचली जाणार असेल, तर त्यात दुख मानावे असे मुळीच नाही. उलट ती तमाम भारतीयांसाठी आनंददायीच घटना असेल. परंतु येथे मुद्दा कोणाला काय वाटते यापेक्षा वस्तुस्थिती काय असणार आहे याचा आहे. तेव्हा ट्रम्प यांचे अमेरिकेच्या अध्यक्षपदी असणे हे खरोखरच भारताच्या फायद्याचे असेल का याचा भावनांच्या आहारी न जाता वेध घेणे आवश्यक आहे. त्याकरिता ट्रम्प यांचे राजकारण नीट समजून घेतले पाहिजे.
मिशिगन राज्यातील रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांनी केलेले भाषण या दृष्टीने पाहता येईल. मिशिगनमध्ये फोर्ड मोटर्सचे मुख्यालय असून, तेथील कारखाना बंद करून तो मेक्सिकोमध्ये हलविण्याची कंपनीची योजना असल्याची चर्चा आहे. त्याबाबत बोलताना ट्रम्प यांनी कंपनीला सरळ सरळ धमकीच दिली की, कारखाना मेक्सिकोत नेलात, तर मेक्सिकोत बनविलेल्या प्रत्येक गाडीवर ३५ टक्के कर लावीन. अॅपल कंपनीलाही त्यांनी असाच दम दिला होता. मिशिगनमधील कामगारवर्गासाठी ही म्हणजे अमृतवाणीच असल्याचे प्रसिद्ध माहितीपट निर्माते मायकेल मूर यांनी म्हटले आहे. हे आभासी समाजवाद आणि प्रांतीय अस्मिता यांची झणझणीत मिसळ असलेले राजकारण. ट्रम्प यांनी जिहादी दहशतवाद, स्थलांतरित यांच्याविरोधात भूमिका घेत त्याला आणखी एक जोड दिली. ती म्हणजे आर्थिक-राष्ट्रवादाची. अन्य देशांतील लष्करी कारवायांना, आर्थिक मदतीलाही ट्रम्प यांचा विरोध आहे तो यातूनच. या आर्थिक राष्ट्रवादाच्या, आभासी समाजवादाच्या आणि भूमिपुत्रांच्या अस्मितेआड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा द्वेष हीच ट्रम्प यांची प्रचार मोहीम, ज्याला ते चळवळ म्हणतात, होती. निम्मे अमेरिकी मतदार त्याला बळी पडले. आजवर डेमोक्रॅटिक पक्षाचे अभिजनवादी राजकारण पाहिले, आता ट्रम्प यांचे पाहू या. समजा नागनाथ जाऊन सापनाथ आले तरी त्यातून आपले होऊन होऊन असे काय नुकसान होईल, असाही विचार या निम्म्यांतील अभावग्रस्तांनी, बेरोजगारांनी केला असावा. त्यामुळे हिलरी यांना ट्रम्प यांच्याहून ०.२ टक्के लोकप्रिय मते जास्त पडूनही त्या हरल्या. ट्रम्प जिंकले. आता त्यांचे हे आर्थिक-राष्ट्रवादी राजकारण अमेरिकेसाठी किती फायद्याचे ठरते हे दिसेलच, परंतु ते जागतिकीकरणाच्या मूळ धोरणाशीच विसंगत असल्याने ते अन्य देशांसाठी तोटय़ाचेच ठरेल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच ट्रम्प यांचे मित्र बनून त्यांना ‘हाय डोनाल्ड’ अशी हाक मारणार असले, तरी या अन्य देशांच्या यादीत भारताचे नाव नसेल असे मानणे हा भाबडेपणा ठरेल. भारत हे थोर राष्ट्र आहे, आपणांस हिंदूंबद्दल प्रेम आहे अशी विधाने ट्रम्प यांनी केली आहेत, तेव्हा त्यांची भारतास सहानुभूती असेल असे मानण्याकडे काहींचा कल दिसतो. एक कसलेले अभिनेते कार्यक्रमासाठी ज्या-ज्या गावात जात, तेथे तेथे ते गाव किती चांगले, तेथील लोक कसे रसिक, असे भाषणाच्या सुरुवातीला सांगून हमखास टाळ्या घेत असत. ट्रम्प यांच्या या उद्गारांतून याहून जास्त अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. प्रचारातली वानगी म्हणून ती सोडून देणेच योग्य. त्यांची महत्त्वाची विधाने वेगळीच आहेत. भारत आणि चीन अमेरिकेचा गैरफायदा घेत आहेत, असे सांगत त्यांनी आऊटसोर्सिगवर टीका केली आहे. ‘एच-वन बी व्हिसा हे जे काही आहे ते मला आवडत नाही. मी ते रद्द करणार आहे,’ असे जाहीर भाषणात घोषित केले आहे. ही त्यांची वैयक्तिक मते आहेत आणि राजकीय भूमिकाही. याची अंमलबजावणी झाल्यास आज ट्रम्प यांच्या विजयाची साखर खाणाऱ्यांची तोंडे कडू पडतील की गोड? गेल्या आर्थिक वर्षांमध्ये भारतातून आठ हजार दोनशे कोटी डॉलर एवढय़ा किमतीची सॉफ्टरवेअर निर्यात झाली. त्यातील ६० टक्के वाटा उत्तर अमेरिकेचा आहे. यावर ट्रम्प यांच्या आर्थिक राष्ट्रवादाचा काय परिणाम होणार? आर्थिक बाबतीत अमेरिका ही चीनची दुभती गाय राहिलेली आहे. हे पाहता ट्रम्प यांच्या या भूमिकेचा फटका भारतापेक्षा चीनला बसणार यात शंका नाही. तो अनेकांच्या समाधानाचा भाग असू शकतो. परंतु त्याने भारताचा तोटा कमी होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. हीच बाब अमेरिकेच्या ट्रम्पोत्तर पाक धोरणाबाबतची. मुळात पाकबाबत अमेरिकी काँग्रेसमध्ये नाराजीची भावना आहेच. परंतु त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला पंखाखाली घेण्याचे थांबविलेले नाही. याची कारणे भारतीय उपखंडाच्या भू-राजकीय पर्यावरणात आहेत. ट्रम्प यांनी पर्यावरण बदल हे चीनचे षड्यंत्र असल्याचे कितीही म्हटले असले आणि पर्यावरणविषयक करारांचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन आपल्या मतदारांना दिले असले, तरी या भू-राजकीय पर्यावरणात बदल करण्याची त्यांची कितपत तयारी असेल याबद्दलही शंका घेतल्या जात आहेत. दक्षिण चिनी समुद्राबाबत चीनचे उघडे साम्राज्यवादी धोरण स्पष्ट दिसत असतानाही ट्रम्प यांनी जपान आणि दक्षिण कोरिया या देशांत तैनात असलेल्या अमेरिकी लष्कराबद्दल अधिक पैसे मोजावेत अशी भूमिका घेतलेली आहे. अमेरिका आपल्या जवळच्या मित्रराष्ट्रांबद्दलही असे राष्ट्रीय व्यक्तिवादी धोरण अवलंबणार असेल, तर त्या देशाची भारताबद्दलची भूमिका काय असेल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण ट्रम्प बोलले तसे चालतील का? हा पुढील काळातील कळीचा मुद्दा असेल. याचे कारण सत्ता.
सत्ता माणसाला सरळ करते. हा सार्वत्रिक अनुभव आहे. परंतु त्याआड येऊ शकते तो ट्रम्प यांचा भंगड स्वभाव. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा आर्थिक-राष्ट्रवादी भूमिका घेतल्यानंतर त्यापासून दूर जाण्याचे कोणतेही कारण ट्रम्प यांच्याकडे दिसत नाही. अमेरिकेची गेलेली थोरवी आपणच परत आणून देशास विश्वगुरू ठरवू शकतो असा आत्मविश्वास असलेला मनुष्य आपल्याच लोकांचा विश्वासघात कशासाठी करून स्वतस अ-लोकप्रिय कशासाठी करील हा प्रश्न आहेच. ट्रम्प यांच्यासारखा स्वतच्या इतक्या प्रेमात असलेला माणूस हे करील अशी शक्यता कमीच. अशा परिस्थितीत त्यांच्या विजयाने हुरळून जाऊन आपल्याच पैशाने आपलेच तोंड गोड करणे याला भाबडेपणा म्हणतात. शहाणी माणसे म्हैस पाण्यात असताना तिचा सौदा करीत नसतात..