तो नास्तिक होता.. खुलेपणाने मते मांडत होता.. एवढाच त्याचा गुन्हा होता. आधिभौतिकतावाद व तर्कशास्त्र यावर त्याचे ब्लॉगलेखन होते, पण तो एका कर्मठ मानसिकता असलेल्या देशात जन्माला आलेला होता, त्यामुळे मागच्या दोघांचे जे झाले तेच त्याचेही झाले. बांगलादेशातील सिल्हेट जिल्ह्य़ात तो सकाळी कार्यालयात निघाला असताना कोयत्याने वार करून अनंता बिजॉय दास या ब्लॉगरचा खून करण्यात आला.
त्याआधी तेथील कर्मठ मुस्लिमांनी अविजित रॉय या अमेरिकी ब्लॉगरची हत्या केली होती. त्यानंतर त्यांनी वशीकुर रेहमान या ब्लॉगरला याच पद्धतीने मारले होते, त्यांच्या हिट लिस्टवर निधर्मी असलेले ८४ ब्लॉगर आहेत व त्यातील एकेक मुक्त आवाज हळूहळू शांत होत आहे. ‘डिफेन्डर्स ऑफ इस्लाम’ या संघटनेने ही कृत्ये चालवली आहेत. अनंता बिजॉय दास हा ब्लॉगर अविजित रॉय यांनी सुरू केलेल्या मुक्तो मोना (मुक्त विचारवंत) या ब्लॉगमध्येच लेखन करीत होता. इस्लाम व इतर धर्मातील मूलतत्त्ववाद्यांवर तो टीका करीत असे. ‘ज्युक्ती’ या स्थानिक विज्ञान मासिकाचे संपादन तो करीत होता व त्याने चार्लस डार्वनिसह अनेक विषयांवर पुस्तके लिहिली होती. २००६ मध्ये त्याच्या ब्लॉग लेखनाला विवेकवादाचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्या ‘मुक्तो मोना’ या ब्लॉगवर त्याने बंडखोर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्यावर कविता लिहिली होती. अविजित रॉय यांच्या एका पुस्तकाला त्याने प्रस्तावनाही लिहिली होती. अनंता हा शाजालाल विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर एका खासगी बँकेत काम करीत होता. शाजालाल विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या एका शिक्षकाला जाहीर फटके मारले पाहिजेत असे एका सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने म्हटले होते, त्यावर अनंताची शेवटची पोस्ट होती.
मागील दोन ब्लॉगर्सच्या खुनाबाबत काय झाले, असा सवाल त्याने परवाच फेसबुकवर केला होता.. नास्तिक मुस्लिमांना समाजातच अशी वागणूक मिळते असे नाही तर कुटुंबापासूनही ते दूर जातात, ही मोठी शोकांतिका आहे. एकदा स्वीडिश सरकारने अनंता दासला स्वीडिश पेन कार्यक्रमासाठी बोलावले असतानाही तो परत बांगलादेशात जाऊ शकणार नाही म्हणून व्हिसा नाकारला होता. अनंताच्या हत्येनंतर त्याचे फेसबुक पेज निषेधांनी भरून गेले, पण तो जिवंत असतानाही नास्तिक म्हणून अनेक मरणे झेलत होता. अनंतासारख्यांच्या हत्या या बाकीच्या खुल्या आवाजांना इशारा असतो, तुमचीही वेळ भरत आलीय.. हे सांगणारा.