सौजन्य सावध हवे!

पाकिस्तानशी संबंध सुधारण्याची उबळ भारतात सातत्याने येते. अर्थात आंतरराष्ट्रीय राजकारणात कायमचा वैरभाव ठेवून चालत नाही. जगाला दाखविण्यासाठी का असेना, मित्रभाव ठेवावा लागतो. मात्र पाकिस्तानसारखा देश समोर असेल तर असा मित्रभाव ठेवतानाही फार सावध राहावे लागते. संवाद हाच संबंध सुधारणेचा एकमेव मार्ग असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार बुधवारी इस्लामाबादेत म्हणाले,

पाकिस्तानशी संबंध सुधारण्याची उबळ भारतात सातत्याने येते. अर्थात आंतरराष्ट्रीय राजकारणात कायमचा वैरभाव ठेवून चालत नाही. जगाला दाखविण्यासाठी का असेना, मित्रभाव ठेवावा लागतो. मात्र पाकिस्तानसारखा देश समोर असेल तर असा मित्रभाव ठेवतानाही फार सावध राहावे लागते. संवाद हाच संबंध सुधारणेचा एकमेव मार्ग असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार  बुधवारी इस्लामाबादेत म्हणाले, त्या सौजन्यशील व्यक्तव्यात चुकीचे काहीच नाही. किंबहुना हे विधान कोणत्याही काळात, कोणत्याही दोन देशांबद्दल खरेच मानायला हवे, तरीदेखील पाकिस्तानशी संवादाने काय होणार, असा प्रश्न महत्त्वाचा ठरतो, तो आपल्या सावधपणाच्या अभावामुळे. पाकिस्तानी क्रिकेट संघ आता भारतात खेळणार आहे. दोन्ही देशांत येजा करण्यासाठीचे नियम त्याआधी शिथिल करण्यात आले. व्यापारवृद्धीसाठी काही योजना आखण्यात आल्या. सध्या अजमेरच्या दग्र्याला भेट देण्यासाठी पाकिस्तानी नेते गर्दी करतात व त्यांची बडदास्त राखली जाते. कलाकारांचे दौरे सुरूच असतात. व्यापार, कला, धर्म, क्रीडाआदी क्षेत्रांतील अशा सौजन्याने दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यास मदत होत असली तरी त्यामुळे मूळचा गंभीर रोग हटेल याची खात्री नाही. दहशतवादाचा हा रोग हटविण्यासाठी सावधानतेची मात्राच कामी येते. चिदम्बरम यांना हे कळत होते. म्हणून पाकिस्तानच्या दौऱ्यात त्यांनी रोखठोक भाषा वापरली. पण परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहणारे कृष्णा यांना कणखर भाषेपेक्षा बोलघेवडेपणा पसंत असल्याने तीन महिन्यांपूर्वी झालेल्या चर्चेत, झाले गेले विसरून पुढे गेले पाहिजे, असली भाषा पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खर यांनी केली तेव्हा कृष्णांनी कणखर जबाब देण्याचे टाळले. दहशतवाद आणि मुंबईवरील हल्ला विसरा असे  पाकिस्तानला म्हणायचे असले तरी भारताला विसरता येणार नाही. असा विसराळूपणा सौजन्याच्या तुलनेत बराच महाग पडतो. ९९मध्ये लाहोर परिषद होताच कारगिल घडले. आग्रा परिषदेच्या मागोमाग संसदेवरील हल्ला झाला. भारताविरुद्धच्या कारवायांसाठी पाकिस्तानची भूमी वापरू देणार नाही असे आश्वासन दिल्यानंतरही मुंबईवर हल्ला झाला. आता तर असे आश्वासन देणेही पाकिस्तानने थांबविले. उलट सर्व दहशतवादामागचे एकमेव कारण काश्मीरचा न सुटलेला प्रश्न हे आहे, असे प्रत्येक पाकिस्तानी नेता जगाच्या व्यासपीठावर आवर्जून सांगतो व दहशतवाद थोपविण्याच्या जबाबदारीतून अंग काढून घेतो. अलीकडेच एका परिषदेत इम्रान खानने हीच भाषा वापरली. ‘संबंध सुधारत असताना अचानक ‘२६/११’सारखी घटना घडते.. कारण काश्मीर’ असे हे महाशय म्हणाले. पाकिस्तान सध्या गर्तेत सापडला असला तरी भारताला त्रास देण्याची खोड जिरलेली नाही. पाकचा विकासदर आज २.४ टक्क्यांवर घसरला असून लोकसंख्या २.७ टक्क्य़ांनी वाढते आहे. बचतीचे प्रमाण दहा टक्के, तर राष्ट्रीय उत्पन्नाशी कराचे प्रमाण ९.४ टक्के आहे. पाकिस्तान अतिशय मोठय़ा आर्थिक संकटाकडे वाटचाल करीत आहे आणि अमेरिका, चीन, सौदी अरेबिया आर्थिक मदतीला तयार नाहीत. भारताशी व्यापारी संबंध वाढविण्यास पाक उत्सुक आहे तो यामुळे.  आर्थिक, सामाजिक, धार्मिक अराजकाच्या जोडीला १०० अण्वस्त्रे असे जहाल रसायन पाकिस्तानात खदखदत असल्याने सौजन्याला सावधानतेचा भक्कम आधार देणे गरजेचे ठरते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anvayarth indias relation with pakistan

ताज्या बातम्या