हिंदी चित्रपटांतील आपल्या अभिनयाने गेली पाच दशके समस्त भारतीयांच्या मनात घर करून राहिलेल्या अमिताभ बच्चन यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होणे, ही आनंदाची बाब आहे. आजवर देशातील हा महत्त्वाचा पुरस्कार अनेकदा कारकीर्दीच्या अखेरीस देण्याचा प्रघात या वेळी पाळला गेला नाही, ही त्याहूनही अधिक कौतुकाची बाब. चित्रपटात अभिनय करण्याच्या हेतूने या भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या हजारोंना प्रारंभी जे अनुभव येतात, त्याच अनुभवांच्या मांडवाखालून गेलेल्या बच्चन यांना सुरुवातीला त्यांची उंची हाच अडथळा ठरला. त्यांचा आवाज जी आज सर्वात जमेची बाजू मानली जाते, त्या आवाजालाही त्या काळी नाके मुरडण्यात आली. केवळ अभिनय क्षमतेच्या विश्वासावर अमिताभ यांनी गेली ५० वर्षे आपली कारकीर्द सतत तळपत ठेवली. एक अतिशय सुजाण, सुसंस्कृत, अभ्यासू, प्रत्येक पातळीवर जीव ओतणारा अभिनेता म्हणून बच्चन जेव्हा रुपेरी पडद्यावर अवतरले, तेव्हाचा ‘सुपरस्टार’ राजेश खन्ना यांचा काळ सरत आलेला होता. समाजातील प्रस्थापितांविरुद्धचा संताप आणि क्षोभ यांना वाट करून देणाऱ्या बच्चन यांच्या भूमिकांचा इतका जबरदस्त परिणाम झाला, की त्यांचे पडद्यावरचे दर्शन हे अनेकांना आपलेच प्रतिबिंब वाटू लागले. बच्चन यांच्या आगमनानंतर भारतीय चित्रपटांच्या दुनियेतील विषयांमध्ये नवेपण आले आणि परिसरातील नव्या जाणिवा आणि समस्या यांचे चित्रण प्रेक्षकांना अधिक आकृष्ट करू लागले. कलावंताकडे जी व्यावसायिक शिस्त आवश्यक असते, त्याचा अभाव चित्रपटाच्या व्यवसायात दिसत असताना, बच्चन यांनी या व्यवसायातील कार्यपद्धतीच बदलून टाकली. प्रत्येक भूमिका समजून घेऊन, तंत्रावर स्वार होत, बच्चन यांनी त्यामध्ये सर्वस्व ओतले, त्यामुळेच ते इतकी वर्षे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत होऊ शकले. हरिवंशराय बच्चन यांच्यासारख्या हिंदीतील ख्यातनाम कवीचा मुलगा म्हणून अमिताभ यांच्याकडे वारसा हक्काने सुसंस्कृतता आली, ती निगुतीने जपून ठेवण्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला जो भारदस्तपणा प्राप्त झाला, तो प्रत्येकाला भिडणारा आहे. राजकारणात त्यांनी घेतलेली उडी असो किंवा त्यांच्या लोकप्रियतेला लागलेली ओहोटी, बच्चन अशा प्रत्येक प्रसंगांत तावून-सुलाखून बाहेर पडले, ते केवळ आत्मविश्वासाच्या बळावर. नव्याने उदयाला आलेल्या समाजमाध्यमातही अमिताभ यांना आज सर्वाधिक पसंती असते. त्यामुळे त्यांचे प्रत्येक वाक्य गांभीर्याने घेणाऱ्या त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना अनेकदा टीकाही सहन करावी लागली आहे. मग तो प्रश्न मेट्रोसाठी झाडे कापण्याचा असो की एखाद्या राज्याचे ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर’ होणे असो. सत्तेच्या जवळ राहण्याचे म्हणूनही काही फायदे असतातच. परंतु स्वत:च्या कर्तृत्वावर दृढ समाधान असतानाही सामाजिक जीवनात त्यांच्या अनेक कृतींबद्दल भुवया उंचावल्या जातात, तेव्हा असे लक्षात येते, की कलावंत म्हणून अमिताभ बच्चन यांना समाजाने जे प्रेम दिले, त्याने ते एक ‘रोल मॉडेल’ बनले. राजकीय पक्षांबद्दल किंवा सत्ताधाऱ्यांच्या कृतींबद्दल त्यांचे कौतुकाचे चार शब्द हे निव्वळ व्यावसायिकतेचा भाग आहेत, यावर विश्वास ठेवणे चाहत्यांसाठी कठीणच ठरते. देशातील मानाचे तीनही पद्म पुरस्कारांच्यापलीकडे जाऊन त्यांना मिळणारा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या आनंदात भर घालणारा आहे. अनेक व्याधींनी ग्रस्त असताना आजही ते कार्यरत असल्याबद्दल सगळ्यांना जे समाधान आहे, त्यात या पुरस्काराने भर पडली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Sep 2019 रोजी प्रकाशित
शहेनशहाचा सन्मान
केवळ अभिनय क्षमतेच्या विश्वासावर अमिताभ यांनी गेली ५० वर्षे आपली कारकीर्द सतत तळपत ठेवली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-09-2019 at 02:22 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan gets dadasaheb phalke award zws