तीन दशके काँग्रेस पक्षात सक्रिय राहिल्यानंतर, कपिल सिबल आता समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे खासदार होणार आहेत. पूर्वाश्रमीच्या पक्ष सहकाऱ्यांप्रमाणे सिबल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. राज्यसभेसाठी त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. हे पाहता त्यांची काँग्रेसशी वैचारिक बांधिलकी कायम असल्याचे दिसते. हीच कदाचित काँग्रेससाठी तुलनेने समाधानाची बाब म्हणावी लागेल! उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे फक्त दोन आमदार असल्याने तिथून राज्यसभेवर या पक्षाचा एकही खासदार निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे कपिल सिबल यांच्यासारखा भाजप-संघविरोधी, सज्जड युक्तिवाद (वकिली पेशामुळे!) करणारा नेता राज्यसभेत असणे, विरोधकांच्या विशेषत: काँग्रेसच्या पथ्यावरच पडणारे. आता गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, जयराम रमेश आदी अभ्यासपूर्ण भाषण करणारे काँग्रेसचे नेते संसदेच्या वरिष्ठ सभागृहात नसतील; तरी सिबल असतील. काँग्रेससाठी हा सोयीचा भाग वगळला तरी, उदयपूरमध्ये तीन दिवस चिंतन केल्यावर आणि संघटनात्मक बदलाला आत्ता कुठे सुरुवात होत असताना सिबल यांच्यासारखा ज्येष्ठ नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देतो, ही नामुष्कीच. चिंतन शिबिरामध्ये बंडखोर ‘जी-२३’ गटाला कात्रजचा घाट दाखवण्यात आला. या गटातील नेत्यांना चिंतनात सामावून घेतले गेले, पण त्यांची एकही मागणी गांधी निष्ठावानांनी मान्य होऊ दिली नाही. कपिल सिबल यांनी तर गांधी घराण्याच्या नेतृत्वाला नाकारले होते! कदाचित म्हणूनच सिबल यांच्याशी समन्वय साधण्याचे प्रयत्न सोनिया वा राहुल-प्रियंका यांच्याकडून झाले नसावेत. ‘जी-२३’ नेत्यांशी सोनिया गांधी यांच्या झालेल्या पाच तासांच्या पहिल्या चर्चेतही सिबल यांचा समावेश नव्हता. गेल्या महिन्यात झालेल्या कार्यसमितीच्या बैठकीमध्ये नेतृत्वाचा प्रश्न जाणीवपूर्वक भिजत ठेवल्यानंतर सिबल पक्षनेतृत्वाविरोधात अधिक आक्रमक झाले होते. एखादा अपवाद वगळता बंडखोरांपैकी कोणीही उघडपणे गांधी कुटुंबाच्या नेतृत्वाविरोधात भूमिका घेण्यास तयार नव्हते हेही खरे. ‘काँग्रेसमधील सर्वात कळीचा मुद्दा नेतृत्वाचा असताना त्यालाच पक्षांतर्गत चर्चामध्ये बगल दिली जात आहे. मग, संघटनात्मक बदलाला अर्थ काय उरला?’, असे सिबल यांचे म्हणणे होते. उदयपूरच्या चिंतन शिबिरात पक्षनेतृत्वाचा मुद्दा चर्चेतही न आल्यामुळे सिबल यांच्या युक्तिवादात तथ्य होते हे एक प्रकारे सिद्ध झाले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात पक्षात आलेल्या गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांच्यासारख्या तरुण नेत्यांमध्ये सिबल हेही होते. त्यांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद यशस्वीपणे दीर्घकाळ सांभाळले होते. ते वृत्तवाहिन्यांवर काँग्रेसची वैचारिक बाजू ठामपणे मांडत असत. भाजपकडून अरुण जेटली तर काँग्रेसकडून कपिल सिबल यांच्यात अनेकदा जोरदार वकिली युक्तिवाद पाहायला मिळत.  त्यांनी वेळोवेळी न्यायालयातही काँग्रेसची बाजू भक्कमपणे मांडली आहे. सिबल यांनी काँग्रेसचा त्याग करणे आणि ज्योतिरादित्य वा आरपीएन सिंह, जितीन प्रसाद यांनी पक्ष सोडणे यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे काँग्रेसने कितीही नाकारले तरी सिबल यांच्या जाण्याने झालेल्या नामुष्कीची टोचणी पक्षाला लागली आहेच. अन्यथा ‘जाणाऱ्यांना शुभेच्छा’ अशी सौम्य प्रतिक्रियासुद्धा न देता काँग्रेस ढिम्मच राहिली असती. ‘जाणाऱ्यांना अडवायचे नाही’, हे काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी व त्यांच्या निष्ठावानांचे धोरण असल्याने, ‘इतरांनी पक्षत्याग केला तसा सिबल यांनीही केला’, असा आविर्भाव काँग्रेसला आणता येईल. पण ‘भारत जोडो’ यात्रा करण्याआधी ‘काँग्रेस जोडो’ मोहीम राबवण्याच्या भाजपच्या उपहासात्मक सल्ल्याला प्रत्युत्तर काँग्रेस कसे देणार?