करोना विषाणूचा प्रादुर्भाव समूह संसर्गाच्या स्तरावर पोहोचला आहे किंवा नाही याबाबत सरकारकडून संदिग्ध विधाने केली जात आहेत. परदेशात जाऊन आलेली बाधित व्यक्ती, तिच्या संपर्कात येऊन एखादी व्यक्ती बाधित होणे हे पहिले दोन स्तर आपण अनुभवले आहेत. आता संपर्कबाधितांशी संपर्क आल्यामुळे करोनाचा संसर्ग होण्याचा टप्पा सुरू झाला आहे किंवा तसा संशय आहे. अशा वेळी त्या स्वरूपाची जनजागृती केवळ सरकारने करत राहण्यापेक्षा ती जनतेतूनच होणे गरजेचे आहे. तशी व्यापक जागृती होत नाही हे सरकारपेक्षाही आपल्यासाठी धोक्याचे आहे. नवी दिल्लीतील निझामुद्दीन येथे दीड आठवडय़ापूर्वी झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमाचा दाखला सध्या दिला जात आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले २४ जण दिल्लीत करोनाबाधित झाल्याचे आढळून आले. याशिवाय विविध राज्यांमध्ये जे बाधित आढळले आहेत, त्यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला होती. तेलंगणातील असे सहा भाविक करोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. त्यावरून या मुद्दय़ाला धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जे प्राप्त परिस्थितीत अनावश्यक ठरतात. धार्मिक वा कौटुंबिक कार्यक्रमासाठी माणसांनी कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नये, असे स्पष्ट आदेश केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी दिलेले आहेत. ते पायदळी तुडवण्याचे प्रकार केवळ दिल्लीत नव्हे, तर सर्वत्र घडताना दिसतात. डोंबिवलीत अलीकडेच एका हळदी समारंभाला करोनाबाधिताने हजेरी लावली. मुळात गर्दी टाळण्याविषयीचे स्पष्ट आदेश असतानाही हा समारंभ भरवला गेला याबद्दल संयोजकांवर गुन्हा नोंदवला गेला. निझामुद्दीन येथील संबंधित कार्यक्रम १६ ते १९ मार्चदरम्यान भरवण्यात आला होता. तोवर सरकारने टाळेबंदी वा संचारबंदी घोषितच केली नव्हती, असा दावा तिथल्या संयोजकांनी केला आहे. तरीही मुळात एका ठिकाणी मार्चच्या मध्यावर २५००च्या आसपास माणसे बोलावण्याचे कारण नक्कीच समर्थनीय नाही. हा सोहळा पुढे ढकलता आला असता. जगभर करोना रुग्णांमध्ये धार्मिक स्थळांना भेट दिलेल्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. सोहळा झाला, त्यानंतर लगेचच जनता संचारबंदी जाहीर झाली आणि दुसऱ्या दिवशीपासून तर दिल्ली सरकारने टाळेबंदीच जाहीर केली. त्यामुळे आमच्यापैकी अनेकांना प्रार्थनास्थळ सोडून माघारी परतता आले नाही, असे निवेदन निझामुद्दीन संयोजकांनी दिले आहे. दिल्ली सरकारच्या निर्णयामुळे तब्बल हजार जण मशीद परिसरात अडकून पडले, असेही सांगितले जाते. केंद्र सरकार किंवा दिल्ली सरकारने तात्काळ जाहीर केलेली आणि अमलात आणलेली टाळेबंदी किंवा संचारबंदी अनेक समाजघटकांच्या मुळावर उठली हे खरेच. तरीही संयोजकांना स्वत:वरील जबाबदारी झटकून देता येणार नाही. धार्मिक स्थळे असो, लग्न समारंभ असो वा भाजी मंडई असो, घबराट किंवा बेफिकिरीतून अशा ठिकाणी आजही गर्दी होत आहे. अशा गर्दीचे परिणाम इतर ठिकाणीही लवकरच दिसू शकतात. साथसोवळे (सोशल डिस्टन्सिंग) पाळण्याची मानसिकता किंवा निकड आपल्या समाजात अजून पुरेशी रुजू शकलेली नाही हा खरा धोका आहे. त्यातही नागरिक आणि सरकारातील मंडळी ‘कशी परिस्थिती आटोक्यात ठेवली’ या (गैर)समजुतीतून स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहेत. अद्यापही काळ कसोटीचा आहे. सरकारी आदेशांचे काटेकोर पालन करण्याचा आहे. गर्दी टाळण्याचा आहे. गर्दी सरकारी धोरणांमुळे होत असेल, तर त्याचा दोष समाजाइतकाच सरकारचाही आहे. सरकारला काय धोरणे ठरवायची आहेत ती ठरवू दे, तूर्त आपण गर्दीपासून चार हात दूर राहिलेलेच बरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on 24 people attended religious event at nizamuddin in new delhi corona positive abn
First published on: 01-04-2020 at 00:05 IST