इस्रायल आणि गाझापट्टीतील अतिरेकी गटांनी सोमवारी पहाटे शस्त्रसंधी जाहीर केल्यामुळे गेल्या ४८ तासांमध्ये उद्भवलेला तणाव कागदोपत्री तरी संपुष्टात आला आहे. गाझापट्टीत सक्रिय असलेल्या हमास व अल जिहाद या जहाल गटांकडून प्रक्षेपके (प्रोजेक्टाइल्स) डागण्यात आल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तरादाखल मारा करावा लागला, असा इस्रायलचा दावा आहे. इस्रायलमध्ये तीन-चार आठवडय़ांपूर्वी बिन्यामिन नेतान्याहू हे पाचव्यांदा पंतप्रधानपदी निवडून आले. इस्रायलच्या संसदेत त्यांच्या पक्षाला बहुमत नसले, तरी कडव्या पक्षांची मोट बांधून सत्ताग्रहण करणे त्यांना सहज शक्य होईल. निवडून येण्यासाठी राष्ट्रवाद चेतवण्याच्या उद्देशाने नेतान्याहू यांनी काही वादग्रस्त घोषणा केल्या होत्या. त्यांच्या प्रचारादरम्यान गोलन टेकडय़ांवरील इस्रायली नियंत्रणाला राजमान्यता देऊन अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिथावणीखोरीत नेतान्याहूंना साथच दिली. मग ‘पश्चिम किनारपट्टीही इस्रायलमध्ये सामील करून घेणार’ अशी धोकादायक घोषणा नेतान्याहू करते झाले. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे इस्रायल-पॅलेस्टाइन संबंध निवळण्याऐवजी चिघळत गेले. अशा परिस्थितीचा गैरफायदा उठवणारे जसे इस्रायलमध्ये आहेत, तसे पॅलेस्टाइनमध्येही आहेत. गेल्या शुक्रवारी हमासच्या अतिरेक्यांनी दोन इस्रायली सैनिकांना जखमी केल्यामुळे ताज्या संघर्षांला सुरुवात झाली, असे इस्रायलचे म्हणणे. तर गाझा सीमेजवळ नित्यनेमाने जमलेल्या निदर्शकांवर इस्रायलने हवाई हल्ले केल्यामुळे चार पॅलेस्टिनी ठार झाले याची प्रतिक्रिया म्हणजे हमासकडून झालेला प्रक्षेपकांचा मारा, असे पॅलेस्टाइनचे म्हणणे. हमास आणि अल जिहादकडून मोठय़ा प्रमाणात प्रक्षेपकांचा मारा झाल्यामुळे इस्रायलने गाझा भागातील हमास समर्थकांच्या निवासस्थानांवर हल्ले केले. या संघर्षांत दोन गर्भवती महिलांसह २५ पॅलेस्टिनी आणि चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षभरात गाझा आणि इस्रायलदरम्यान अशा प्रकारचे आठ कमी तीव्रतेचे हल्ले-प्रतिहल्ले झाले आहेत. रमादानचा पवित्र महिना सुरू होत असल्यामुळे पॅलेस्टाइनने शस्त्रसंधीसाठी हमास आणि अल जिहादवर दबाव आणला. तर इस्रायलचा स्वातंत्र्य दिन आणि स्मृतिवंदना दिवसही जवळ आल्यामुळे, त्यानिमित्त इस्रायलमध्ये मोठय़ा प्रमाणावर परदेशी पर्यटक, कलाकार येणे अपेक्षित असल्याकारणाने नेतान्याहू सरकारने शस्त्रसंधीला मान्यता दिली आहे. हे कार्यक्रम आटोपल्यानंतर गाझा सीमेवर पुन्हा तणाव निर्माण होणार नाही याची खात्री कुणालाच देता येत नाही. गेले वर्षभर सातत्याने इजिप्त आणि संयुक्त राष्ट्रांमार्फत इस्रायल-पॅलेस्टाइन मध्यस्थीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना मर्यादा आहेत. इस्रायलचा सर्वात मोठा सामरिक, राजनैतिक पाठीराखा असलेल्या अमेरिकेची या प्रश्नावर असलेली भूमिका थेट इस्रायलधार्जिणी आहे. पूर्व जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देणे किंवा गोलन टेकडय़ांवरील त्यांच्या ताब्याला मान्यता दिल्याने पॅलेस्टिनी जनमत दुखावले आहे. आधीचे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी पॅलेस्टिनींची बाजू सहानुभूतिपूर्वक ऐकून आणि प्रसंगी इस्रायलला चार खडे बोल सुनावून या टापूतली घडी बसवत आणली होती. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे ती पार विस्कटली आहे. इस्रायलमधील राजकारणीही कधी नव्हे इतके युद्धखोर बनले असून, ताज्या शस्त्रसंधीबद्दल सर्व इस्रायली नेत्यांनी पंतप्रधान नेतान्याहूंवर ‘त्यांनी हमाससमोर पडते घेतले’ अशी टीका केली. ही भाषा पाहता नजीकच्या भविष्यात इस्रायलकडून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव संघर्ष पेटवला जाण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. दुसरीकडे, इस्रायलला धडा शिकवण्यासाठी हमास वा अल जिहादसारख्या गटांवर अवलंबून राहण्याची सवय पॅलेस्टिनी नेतृत्वानेही सोडण्याची गरज आहे. तेही शक्य नसल्याने शस्त्रसंधीनंतरही परिस्थिती धुमसत राहणार हे नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on armaments israel and gaza increase strikes
First published on: 07-05-2019 at 00:09 IST