देवेंद्रभाऊ, तुम्हीसुद्धा?

निवडणुकीच्या प्रचारकाळात केलेल्या वारेमाप घोषणा आणि आश्वासने हा केवळ ‘चुनावी जुमला’ असतो

निवडणुकीच्या प्रचारकाळात केलेल्या वारेमाप घोषणा आणि आश्वासने हा केवळ ‘चुनावी जुमला’ असतो, हे लोकसभा आणि विधानसभेच्या अलीकडच्या निवडणुकीनंतर पुरते स्पष्ट झाले आहे. तरीही, अशा घोषणा जनता गांभीर्याने घेते अशा समजुतीचा पगडा राज्यकर्त्यांच्या मनावर कायम असावा, अशी शंका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताज्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ताजी झाली आहे. वीस वर्षांपूर्वी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी अशाच काही घोषणा करून निवडणुकीचे वारे भाजपच्या दिशेने वळविले होते. ज्या गोष्टी जनतेला आवडत नाहीत, त्या समूळ नष्ट करण्याचे केवळ स्वप्नरंजनदेखील जनतेला तात्पुरते पुरेसे असते, हे गोपीनाथ मुंडे यांनी ओळखले आणि ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण’ व ‘भ्रष्टाचाराविरोधात ट्रकभर पुरावे’ हे त्या निवडणुकीतील परवलीचे शब्द बनवून भाजप-सेनेच्या युती राजकारणासाठी अनुकूल हवा निर्माण केली. पुढे सत्ता आल्यानंतर हे चित्र फारसे बदलले नाहीच. गुन्हेगारी विश्वाचा ‘डॉन’ दाऊद इब्राहिम याला फरफटत आणण्याची मुंडे यांची तेव्हाची घोषणा गेल्या वीस वर्षांत केवळ आठवणीच्या कप्प्यात ठेवण्यापुरतीच उरली असताना, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुंडे यांच्याच आवेशात तीच घोषणा केल्याने, चुनावी जुमल्याचा आता सत्ताकारणातही प्रवेश झाल्याचे मानता येईल. दाऊद इब्राहिमला मुसक्या बांधून महाराष्ट्रात आणण्यासाठी आजवरच्या साऱ्या प्रयत्नांना पाकिस्तानकडून फारशी दाद दिली गेलेली नाही. तरी फडणवीस यांनी पुन्हा दाऊदला आणण्याची प्रतिज्ञा करणे याला केवळ राजकीय स्वप्नरंजनापलीकडे फारसे महत्त्व राहणार नाही. अशा प्रतिज्ञा करून तात्पुरत्या टाळ्या मिळविणे हे नाकर्त्यां राज्यकर्त्यांसाठी सोयीचे असते. ज्याला प्रत्यक्षात काहीच करावयाचे नसते, त्याने केवळ भीमदेवी थाटाच्या घोषणा कराव्यात आणि जनतेला स्वप्ने दाखवत त्यावर स्वत: स्वार होऊन कसा तरी राज्याचा गाडा हाकत सुटावे. पण राज्यासमोर समस्यांचे डोंगर उभे असताना केवळ त्याच जुन्या स्वप्नांना जिवंत करून त्यावर जनतेला झुलवत ठेवण्याचा नवा प्रयोग खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सुरू करावा हे काहीसे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. दाऊद इब्राहिम हा महाराष्ट्राचा कट्टर वैरी आहे. महाराष्ट्रातील शेकडो निरपराधांचे बळी घेणाऱ्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकांचा तो पहिला सूत्रधार आहे. दाऊदच्या गुन्हेगारी कारवाया रोखून महाराष्ट्र भयमुक्त करणे ही सरकारची जबाबदारीच आहे. दाऊदच्या सशर्त शरणागतीचा एक प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी फेटाळला होता. त्यानंतर दाऊदचा काटा काढण्यासाठी त्याच्याच विश्वातील काहींचा वापर करण्याची शक्कलही लढविली गेली. आता दाऊदला भारतात आणण्यासाठी सीबीआयनेही कंबर कसली आहे. सुषमा स्वराज यांच्या ताज्या पाकिस्तान भेटीमुळे फडणवीसांच्या आशा पालवलेल्या असल्या तरीही त्यांनी ही कामगिरी केंद्र सरकारवर सोपविलेलीच बरी. महाराष्ट्राच्या कपाळावर अनेक अन्य समस्यांचे जाळे विणलेले आहे. त्यात सामान्य माणूस गुरफटून गेला आहे. दाऊदला फरफटत आणण्याच्या शिळ्या घोषणेला नवा ऊत आणण्याने जनतेला आता नवा उत्साह वाटणार नाही. लहानमोठय़ा समस्यांपासून जनतेला मुक्ती हवी आहे. फडणवीसांचे त्याला प्राधान्य असायला हवे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article on cm devendra fadnavis