क्रिकेट  विश्वचषक २०१९ स्पर्धेसाठी भारतीय संघाची सोमवारी मुंबईत झालेली निवड बरीचशी अपेक्षित होती. या संघाच्या काही जमेच्या बाजूंविषयी सुरुवातीला सांगितले पाहिजे. आजवरच्या विश्वचषक स्पर्धासाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघांपैकी सर्वोत्तम गोलंदाजी फळी या संघात आहे हे निसंशय. इंग्लिश वातावरणाचा फायदा उठवू शकतील, असे जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे मध्यम तेज गोलंदाज आपल्याकडे आहेत. या तिघांनी आणि विशेषत बुमराने यंदाच्या हंगामात परदेशी मैदानांवर उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्याकडे वेग आणि स्विंग अशी दोन्ही अस्त्रे आहेत. भुवनेश्वरकडे स्विंग आहे, तर शमीचे चेंडूवरील नियंत्रण अफलातून आहे. त्यांच्या जोडीला हार्दिक पंडय़ा हा मध्यमगती गोलंदाजही उपयुक्त आहे. फिरकीच्या आघाडीवर रविचंद्रन अश्विनसारख्या मुरब्बी फिरकीपटूला स्थानही मिळू नये, इतकी गुणवत्ता आणि वैविध्य सध्या भारतीय संघात आहे. यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांची अनुक्रमे लेगस्पिन आणि चायनामन फिरकी जगातील भल्याभल्या फलंदाजांना चकवण्याची क्षमता बाळगून आहे. त्यांच्या जोडीला अनुभवी रवींद्र जडेजाची डावखुरी फिरकी आणि केदार जाधवची उपयुक्त ऑफस्पिन फिरकी आहे. हे सगळेच गोलंदाज मैदानात उतरू शकत नाहीत, तरी विश्वचषकासारख्या मोठय़ा आणि महत्त्वाच्या स्पर्धेत सशक्त पर्याय किंवा बेंच स्ट्रेंग्थ हा महत्त्वाचा घटक ठरतो. कारण सर्वच सामन्यांत कामगिरी आणि तंदुरुस्ती यांत सातत्य राखणे सोपे नसते. अशा वेळी चांगल्या आणि तयारीतल्या गोलंदाजांचा ताफा हाताशी असणे अत्यावश्यक असते. फलंदाजीच्या बाबतीत मात्र काही महत्त्वाचे प्रश्न होते, ज्यांची समाधानकारक उत्तरे कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीला देता आली असे म्हणता येणार नाही. रोहित शर्मा, शिखर धवन आणि स्वत: विराट कोहली या फलंदाजांची आघाडीची फळी दमदार आहे. कोहली गेले काही महिने विशेषत: एकदिवसीय क्रिकेटमध्ये विलक्षण सातत्याने खेळतो आहे. रोहित आणि शिखर हे आघाडीवीरही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगले खेळतात. पण मधल्या फळीत आणि विशेषत: चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी अनुभवी आणि आश्वासक फलंदाज भारताला निवडता आलेला नाही हे वास्तव आहे. २०१७पासून या क्रमांकावर जवळपास ११ फलंदाज खेळवले गेले आणि तरीही विश्वचषक तोंडावर आलेला असताना योग्य फलंदाज भारताला सापडलेला नाही. ५० षटकांच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजावर डावाला आकार देण्याची, दीर्घकाळ खेळपट्टीवर राहून प्रसंगी खालच्या फळीतील फलंदाजांच्या मदतीने लक्ष्य गाठण्याची किंवा समाधानकारक लक्ष्य उभे करण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. ही जबाबदारी पार पाडू शकेल असा विराट कोहली हाच एकमेव फलंदाज भारतीय संघात आहे. तो जर तिसऱ्या क्रमांकावर खेळला आणि लवकर बाद झाला, तर भारताची अवस्था बिकट होते. राहुलच्या समावेशाचा आग्रह कोहलीने धरला असावा, पण भारतीय मैदानांवर तुफान टोलेबाजी करणाऱ्या या फलंदाजाच्या मर्यादा स्विंगला पोषक वातावरणात आणि टणक खेळपट्टय़ांवर उघडय़ा पडतात. केदार जाधव, विजय शंकर आणि हार्दिक पंडय़ा हे गुणवान अष्टपैलू क्रिकेटपटू नक्कीच आहेत, तरी विश्वचषक स्पर्धेचा अनुभव त्यांच्या गाठीशी नाही. दिनेश कार्तिकचा गवगवा होत असला, तरी महेंद्रसिंग धोनी खेळला नाही, तरच तो खेळू शकतो. या स्थितीत कोहली आणि अनुभवी धोनी यांनाच फलंदाजीचा भार उचलावा लागणार आहे. या दोघांची कामगिरी भारतीय संघासाठी सर्वाधिक निर्णायक ठरू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on team india cricket world cup 2019 squad
First published on: 17-04-2019 at 00:14 IST