रुग्णालयात, त्यातही ज्या विभागात रुग्णांना मृत्यूच्या जबडय़ातून बाहेर काढले जाण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जाते, त्या अतिदक्षता विभागातच आगीचा कल्लोळ व्हावा आणि त्यात २० जणांना जीव गमवावा लागणे, ही शरमेची बाब म्हटली पाहिजे. भुवनेश्वरमधील या घटनेतील आग आटोक्यात येईपर्यंत मुंबईतील कफ परेड भागातील मेकर टॉवर या इमारतीतही आग लागून दोघांना जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनांमधील साम्य एकच आहे, ते म्हणजे वीज सुरक्षिततेच्या बाबतीत झालेली अक्षम्य दिरंगाई. रुग्णालयात सर्वाधिक महत्त्वाचा विभाग अतिदक्षता विभाग असतो. तेथे प्राणवायूचा सातत्याने पुरवठा आवश्यकच असतो. अशा ठिकाणी एखादी ठिणगीही किती महागात पडू शकते, याचे भान ठेवणे अधिक आवश्यक. तसे घडले नाही आणि त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. कोणत्याही इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा उभी करणे आवश्यक असते, याचे कारण ऐन वेळी आग विझवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. परंतु त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची असायला हवी, ती वीज यंत्रणेची सुरक्षितता आणि नेमक्या त्याच बाबतीत हलगर्जीपणा होताना अनेकदा दिसून येतो. आगीबाबत घ्यावयाच्या सुरक्षेबाबत अनेकदा नियम करण्यात आले. त्याच्या अंमलबजावणीची सक्तीही करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात त्याकडे काणाडोळा करण्याचीच प्रवृत्ती यातून दिसून येते. ओरिसा उच्च न्यायालयाने अलीकडेच या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सूचना केली होती. ज्या ‘सम रुग्णालया’तील अतिदक्षता विभागात ही आग लागली, तेथील अनेक रुग्णांना वेळेत बाहेर काढता आले नाही, अशी तक्रार पुढे आली आहे. याचा अर्थ अशा कठीण प्रसंगात नेमके काय करायला हवे, याची पुरेशी माहिती तेथील कर्मचाऱ्यांनाही नसली पाहिजे. त्यामुळे किमान १०० रुग्णांना घुसमटल्यासारखे झाले आणि तेथून त्वरेने बाहेर पडणे शक्य झाले नाही. खासगी रुग्णालयांमधील पंचतारांकित सुविधा या केवळ उपचाराचे दर वाढवण्यासाठी फायद्याच्या ठरतात. रंगरंगोटी आणि अंतर्गत सजावटीवर प्रचंड पैसे खर्च करून रुग्णालयाचे दर वाढवण्यापेक्षा अत्यावश्यक असलेल्या गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते, हे लक्षात न घेतल्याने असे घडते. कोणत्याही इमारतीचे ‘फायर ऑडिट’ ही कायद्याने सक्तीची बाब असली, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कारण कोणालाच शिक्षा होत नाही. सर्वच इमारतींमध्ये ‘संकटकाळी बाहेर पडण्याचे मार्ग’ अडगळीचे सामान ठेवण्यासाठीच का वापरले जातात, या प्रश्नाचे उत्तर कुणीही देऊ शकत नाही. जो प्राणवायू अग्नी प्रज्वलित करण्यास सर्वात उपकारक, तो मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या अतिदक्षता विभागात एखाद्या ठिणगीने रौद्र रूप धारणे करणे स्वाभाविकच. किमान, अशा वेळी मृत्युशय्येवरील रुग्णांना तातडीने सुरक्षित ठिकाणी नेण्यापासून ते आग आटोक्यात आणण्यापर्यंतच्या व्यवस्था कार्यरत असणे ही अतिशय अत्यावश्यक बाब. भुवनेश्वरमधील आगीच्या घटनेत नेमक्या याच बाबीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. आता या प्रकरणाची चौकशी होईल. मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत मिळेल, जे जगले वाचले आहेत, त्यांच्या औषधोपचाराचा खर्चही उचलला जाईल. संबंधित रुग्णालयाला तंबी दिली जाईल. पुन्हा एकदा नव्याने जुन्याच सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश निघतील. परंतु भारतीय मानसिकतेमध्ये दुर्घटना घडेपर्यंत दुर्लक्ष करण्याची जी ‘शून्यदक्षते’ची दुष्प्रवृत्ती आहे, तिचे उच्चाटन मात्र होईल की नाही, हे सांगता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhubaneswar hospital and cuffe parade fire issue
First published on: 19-10-2016 at 04:29 IST