बेरजेचे एखादे गणित चुटकीसरशी सोडविता आले म्हणजे कुणी गणितज्ज्ञ होत नसतो. राजकारणातील बेरजेची गणिते तर व्यवहारातील बेरजेच्या गणिताहूनही क्लिष्ट असतात. ‘दोन अधिक दोन बरोबर चार’ हे व्यवहारातील बेरजेचे गणित झाले. पण राजकारणातील याच गणिताचे उत्तर ‘पाच’ असेच असले पाहिजे, शिवाय, ‘द्यायचे की घ्यायचे’, यावरही हे उत्तर अवलंबून असते. पुण्यात भाजपने आयारामांसाठी पक्षाची कवाडे खुली केल्यानंतर गळ्यात कमळाचा गमछा घालून जो कुणी पक्षाच्या दारी येईल त्याला प्रवेश देण्याच्या बेरजेच्या राजकारणावर अलीकडेच माजलेला वाद अजून शमलेला नाही. भाजपच्या भविष्यकालीन प्रतिमानिर्मितीत या नव्या आयारामांचा मोठा वाटा राहणार असल्याने संख्याबळाचे हिशेब थोडेसे जरी इकडेतिकडे झाले, तरी बेरजेच्या गणितात घोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे भाजपच्या धुरीणांना पक्के ठाऊक असतानाही, राजकीय अपरिहार्यतेपोटी बेरजेची गणिते पक्षात सुरूच आहेत. भाजपची महाराष्ट्रातील सत्तेत पूर्ण बहुमताची भक्कम स्थिती नाही. त्यामुळेच, विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ भूमिका घेऊन शिवसेनेला डावलणाऱ्या भाजपने सत्तास्थापनेसाठी मात्र शिवसेनेच्या कुबडय़ा सोबत घेतल्याच होत्या. भविष्यात कधी तरी या कुबडय़ा फेकावयाच्या आहेत, हे गणित आखतच भाजप सरकारची वाटचाल सुरू आहे, हे लपलेले नाही. येत्या काही महिन्यांत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच कुबडय़ा झुगारण्याचा प्रयोग करून पाहण्याचे भाजपने ठरविलेले असल्याने, बेरजेची नवी गणिते मांडणे या पक्षाला गरजेचे झाले आहे. म्हणूनच, महायुतीचा विस्तार करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या भाजपमध्ये दिसतो. तरीही एका बाजूने पक्षाला फुगवटा येत असला, तरी एका बेरजेतूनच काही वजाबाक्याही सुरू होणार असे संकेतही लगेचच मिळू लागले आहेत. वारणेच्या खोऱ्यात बऱ्यापकी वजन असलेल्या विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला भाजपने महायुतीत सामावून घेतले आणि बेरजेच्या राजकारणातून शक्तिवर्धनाचा प्रयत्नही केला. महायुतीच्या परिवारात एक नवा पक्ष सामील झाला असला, तरी त्यामुळे महायुतीची ताकद वाढेल अशी मात्र शक्यता दिसत नाही. कारण वारणा खोऱ्याच्या राजकारणावरच भिस्त असलेले खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानाला मात्र भाजपच्या या बेरजेच्या राजकारणाने चांगलाच धक्का दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सारी भिस्त स्थानिक प्रश्नांना कवेत घेण्याची शक्ती असलेल्यांवरच अवलंबून असते. जनसुराज्य पक्षाचा वारणा खोऱ्यातील  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल असे भाजपच्या बेरजेच्या राजकारणाचे सूत्र असले, तरी राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र या युतीमुळे दुखावली असल्याने, या बेरजेतून एक वजाबाकीही भाजपला अनुभवावी लागण्याची चिन्हे आहेत. विनय कोरे यांच्या पक्षाला मोठा जनाधार गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मिळाला नव्हता. मात्र, स्थानिक राजकारणावरील त्यांचा प्रभाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या कामास येऊ शकतो. जनसुराज्य पक्षाला महायुतीत सामील करून घेण्यामागे हेच बेरजेचे गणित असले, तरी राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष मात्र वजाबाकीच्या पवित्र्यात उभा ठाकल्याने, एका बेरजेनंतरच्या वजाबाकीचा हिशेबही भाजपला पुन्हा एकदा करावा लागणार आहे. ‘दोन अधिक दोन उणे तीन’ अशा गणिताचे उत्तर राजकारणात बेरजेच्या गणिताहून अवघड असते. भाजपने महायुतीच्या विस्तार योजनेत याचा विचारही केला असेलच. अखेर, महायुती करूनही प्रत्येक पक्ष ‘एकला चलो रे’ भूमिकेतच वावरत असेल, तर बेरजेच्या राजकारणातून काय साधणार, हा मुद्दा आहेच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp shiv sena alliance in local bodies election
First published on: 28-10-2016 at 02:56 IST