‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशी एक म्हण आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे भंडाऱ्यातले वक्तव्य तर या उथळपणाचा अर्कच. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे मूल्य आहे व किमान राजकारणात तरी त्याचा वापर जपून व सभ्यतेची मर्यादा पाळून करावा लागतो याचा लवलेशही अंगी नसलेले नाना त्यांच्या सततच्या बेताल वक्तव्याने स्वत:च्याच नाही तर पक्षाच्या अब्रूचे धिंडवडे काढताहेत. तेही राज्यात पक्षाची सत्ता असताना. विरोधकांचा तोल ढळणे एकदाचे समजून घेता येईल पण सत्ताधाऱ्यांनीच अशी भाषा वापरावी हे अतिच झाले. मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे मतदारांसमोर बोलणाऱ्या नानांनी नंतर प्रकरण अंगलट येते असे दिसताच स्थानिक गावगुंडाचा संदर्भ दिला तरी नाचक्की व्हायची तेवढी झालीच. नसलेल्या गावगुंडाचा उल्लेख करताना आपणही त्याच पातळीवर उतरलो याचेही भान त्यांना राहिले नाही. याआधीही नानांनी अनेकदा असेच अकलेचे तारे तोडलेले आहेत. मग ती स्वबळाची भाषा असो वा पवारांसारख्या जाणत्या नेत्यावर राजकीय आरोप असो. त्यावरून अनेकांनी कधी उल्लेख तर कधी अनुल्लेखाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पण पटोलेंचा मूळ स्वभाव काही जात नाही हेच या ताज्या घटनेने दाखवून दिले. राजकारण ही गांभीर्याने करण्याची गोष्ट व ते करताना बोलण्यात शिस्त हवी याचा विसर नानांना सतत पडतो. मोदींशी पंगा घेतला म्हणजे काहीही बोलायला मोकळे या समजात ते असतील तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरण्या-सारखेच. आज राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष अशी काँग्रेसची अवस्था. त्यातून पक्षाला सुगीचे दिवस मिळवून द्यायचे असतील तर गांभीर्याने राजकारण करून समोर जाणे हाच एकमेव उपाय. ते करायचे सोडून प्रदेशाध्यक्षच जर वाचाळवीराची भूमिका वठवत असतील तर रसातळ गाठायला फार वेळ लागणार नाही. राजकारणात बोलणे कमी व कृती जास्त या उक्तीचा विसर नानांना पडलेला दिसतो. अशा वक्तव्यामुळे माध्यमातली जागा काही काळ व्यापते पण पक्षाला काहीच फायदा होत नाही याचे भान या नेत्याला अजून आलेले दिसत नाही. पुरोगामी विचाराचा वारसा सांगणारे हे राज्य मध्यममार्गी म्हणून ओळखले जाते. येथे अतिरेकी विचारांना थारा नाही. हे वास्तव शतकी परंपरा जोपासणाऱ्या पक्षाच्या राज्यप्रमुखाला अजून कळू नये हे आणखीच वाईट. सध्या द्वेषाच्या राजकारणाला कमालीचे महत्त्व आले आहे. ते कमी करायचे असेल तर द्वेषमूलक वक्तव्ये हे त्याचे प्रत्युत्तर असू शकत नाही. आम्ही प्रेमानेच साऱ्यांना जिंकू असे नानांच्याच पक्षाचे केंद्रीय नेते राहुल गांधी म्हणत असताना नानांच्या तोंडी ही द्वेषाची भाषा अजिबात शोभून दिसणारी नाही. मोदींविषयी स्वत:च्या मनात असलेल्या रागाला वक्तव्यातून मोकळी वाट करून दिली म्हणजे तो जनतेच्या मनातही उत्पन्न होईल असे जर नानांना वाटत असेल तर ते पोरकटपणाचे लक्षणच. विरोधक या नात्याने देशपातळीवर सरकारवर लक्ष ठेवण्याचे काम काँग्रेसचे. पर्यायाने नानाही त्यात आले. ते करायचे सोडून अशा वक्तव्यांनी सत्ताधाऱ्यांच्या हाती कोलीत देण्याचे प्रकार त्यांच्याकडून होत असतील तर हे पक्षाचे तारू भरकटल्याचेच लक्षण. आपले काम किती, आपण बोलतो किती यावर साकल्याने विचार करण्याची वेळ नानांसारख्या अनेकांच्या या उतावीळपणामुळे पक्षावर आली हेच खरे!