जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन वंशीय अमेरिकन नागरिकाच्या गळ्यावर त्याचा जीव जाईपर्यंत गुडघा रोवून धरणाऱ्या डेरेक शाउविन या पोलीस अधिकाऱ्याला मिनेसोटा राज्यातील एका न्यायाधीशाने साडेबावीस वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. अमेरिकेत गेल्या वर्षी २० एप्रिल रोजी ही घटना घडली. डेरेक शाउविन हा गोरा पोलीस अधिकारी. त्याने हातकडय़ा घातलेल्या जॉर्ज फ्लॉइडला गुडघ्याखाली दाबून धरण्याची काहीही गरज नव्हती. तरीही त्याने हा अघोरी प्रकार केला, कारण त्याच्यात गोरा वर्णवर्चस्ववाद (व्हाइट सुप्रीमॅसिझम) मुरलेला होता. म्हणूनच फ्लॉइडला जीव गमवावा लागला, कारण तो काळा होता असा या घटनेचा अर्थ लावला गेला. या घटनेतून उफाळलेली तीव्र सार्वत्रिक प्रतिक्रिया, त्यानिमित्ताने जगभर सुरू असलेली ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ अमेरिकेतच नव्हे, तर जगभरातील एक ऐतिहासिक महत्त्वाची वर्णवर्चस्ववादविरोधी चळवळ मानली जाऊ लागली आहे. मात्र, जॉर्ज फ्लॉइड हा वर्णद्वेषविरोधी चळवळीचा कार्यकर्ता नव्हता आणि डेरेक शाउविनला गौरेतरांविरुद्ध आकसाने कारवाया केल्याचा इतिहासही नाही. तरीही या घटनेचे पडसाद उमटले, याचे कारण त्यावेळची अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांची राजवट! ट्रम्प यांच्या सरकारने वंश, वर्ण, धर्म, पंथ या मुद्दय़ांच्या आधारे भेदभाव करण्याचे आणि फूट पाडण्याचे किंवा ध्रुवीकरणाचे धोरण निगरगट्टपणे राबवले. त्यांची मानसिक घडण श्वेत वर्णवर्चस्ववादाची; तशात २०२० पडले निवडणूक वर्ष. त्यामुळे ध्रुवीकरणाचा खेळ अधिक प्रच्छन्नपणे राबवला जाण्याचा तो काळ. त्या परिप्रेक्ष्यात शाउविन हा समतेची मूल्ये उघडपणे आणि निवडणूक-यशासाठी पायदळी तुडवणाऱ्या सरकारचा प्रतिनिधी ठरला आणि फ्लॉइड हा अघोषित ध्रुवीकरणाची झळ सर्वाधिक बसलेल्या कृष्णवर्णीय वंचितांचा प्रतिनिधी ठरला. अमेरिकेच्या सुदैवाने तिची लोकशाही मूल्ये अधिक प्रामाणिकपणे जपणाऱ्या पक्षातील व्यक्तीची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. परंतु त्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना १ कोटींहून अधिक मतदारांनी ‘आपला’ मानले हेही दुर्लक्षिण्यासारखे नाहीच. तेव्हा जो सत्तापालट आणि जनप्रक्षोभाचा रेटा या दोन्ही घटकांमुळे जॉर्ज फ्लॉइड खटला तातडीने सुरू झाला आणि त्यातील दोषी पोलीस अधिकाऱ्याला अभूतपूर्व दीर्घ मुदतीची शिक्षा झालेली असली, तरी दुभंगलेपणाचे वर्तुळ पूर्ण झाले असे मानण्याचे कारण नाही. ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ ही पृष्ठभागावर खदखदत असलेल्या असंतोषाचा स्फोट होती. तिची प्रतीकात्मक सुरुवात फ्लॉइड याच्या पोलिसी खुनामुळे झाली इतकेच. पण ती असंतोषाची सुरुवात नव्हे आणि फ्लॉइड खटल्याची समाप्ती म्हणजे त्या असंतोषाचा अंतही नव्हे. तसा तो आहे हे दाखवण्याचा भोळसटपणा आणि चलाखी या दोन्हींपासून सावध राहिलेलेच बरे! समाजात असे अंतर्विरोध, असंतोष असतातच. त्यांचे निराकरण करून समतेची पेरणी करणे हे लोकशाही व्यवस्थेचे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. हल्ली मात्र जगभर विषमतेचे विष कालवूनच जेथे निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या जातात, तेथे असे मूलभूत प्रश्न अनुत्तरितच राहतात. ‘ब्लॅक लाइव्ह्ज..’सारखे हुंकार उमटतात ते अशा अनुत्तरित प्रश्नांच्या चिखलातून. ते हुंकार जिवंत आहेत म्हणून समाधान मानून घेतले आणि खेळाच्या मैदानावर एका गुडघ्यावर बसून किंवा ‘ब्लॅक-लाइव्ह्ज’सारखे हॅशटॅग स्पर्शून आणि ढकलून आपण जबाबदारीतून मोकळे होण्याचे समाधान मानून घेतो! त्याच्याइतकी आत्मवंचना दुसरी नाही. कारण ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’सारख्या चळवळी व्यवस्थेतील विषमता आणि अन्याय यांची नेमकी जाण असल्यावरच निर्माण होतात आणि त्यांच्या उद्भवाला समाजाइतकेच सरकारही जबाबदार असते. फ्लॉइड प्रकरणातून तेवढा बोध घेतला तरी तूर्त पुरेसे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Derek chauvin gets 22 5 years in prison for george floyd s death zws
First published on: 29-06-2021 at 02:52 IST