आपण सत्ताधारी आहोत, विरोधात नाही, तेव्हा आता भाषणे करायची ती प्रचारसभेतल्याप्रमाणे नव्हे, तर जबाबदार राज्यनेत्याप्रमाणे हे भान असणे हा एक राजकीय सद्गुणच. हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या चाळीसेक दिवसांत ओळखले की त्यांची कन्या इव्हान्का यांनी ते त्यांच्या लक्षात आणून दिले हे नक्की समजण्यास मार्ग नाही. एक मात्र खरे की ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात मंगळवारी रात्री केलेले भाषण हे ट्रम्प यांचा बदललेला सूर दर्शविणारे होते. अमेरिकेतील अनेक माध्यमांच्या – आणि त्यात ट्रम्प समर्थक ‘फॉक्स न्यूज’ ही वृत्तवाहिनीही आली – मते निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षासारखे बोलले. हे अमेरिकी काँग्रेससमोरील त्यांचे अध्यक्ष म्हणून पहिलेच भाषण म्हणून नव्हे, तर त्यांच्या भाषणाची पट्टी ही नेहमीपेक्षा खालचीच होती. याचा अर्थ असा, की नेहमीचा चिरका सूर त्यांनी लावला नाही की त्यांच्या दृष्टीने अमेरिकेचे खरे ‘दुश्मन’ असलेल्या ‘असत्यवृत्तकर्त्यां’ माध्यमांवर आगपाखडही केली नाही. याचे श्रेय ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने थेटच इव्हान्का यांना दिले आहे. त्यांच्या मते ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्यात केलेल्या आक्रस्ताळ्या भाषणाच्या तुलनेत हे भाषण फारच मवाळ होते. इव्हान्का यांनी त्यांच्या पिताश्रींना काही कानपिचक्या दिल्या आणि त्यांनी त्या ऐकल्या त्यामुळे असे घडले असे ‘रॉयटर्स’चे म्हणणे आहे. त्यात बऱ्याच अंशी तथ्य दिसते. याचे कारण या भाषणामध्ये ट्रम्प यांनी लावलेला किंचितसा सामंजस्याचा सूर. सत्तेवर आल्यानंतर कोणत्याही लोकशाहीवादी राज्यकर्त्यांची पहिली प्राथमिकता ही सर्वाना बरोबर घेऊन चालण्याची असली पाहिजे. याचे कारण आपण निवडून आलो असलो, तरी शेवटी ते बहुमतानेच असते. पण म्हणून बाकीच्या ज्यांनी आपल्या विचारांना पाठिंबा दिलेला नसतो ते काही शत्रू नसतात. तेही देशाचे नागरिक असतात. त्या सर्वासाठीच आपल्याला काम करायचे असते. असे करताना आपण तेवढे साव आणि बाकीचे सगळे चोर अशी भावना असेल तर ती देशहिताची नसते. ट्रम्प यांना मिळालेल्या सत्तेने थोडय़ाच दिवसांत हे भान आले. पूर्वीचे किरकोळ वादविवाद आता मागे सोडून द्यावे लागतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली, ही स्वागतार्ह बाब आहे. काँग्रेससमोर काही विधेयके आहेत. ती मंजूर करण्यासाठी साह्य़ करावे असेही ते म्हणाले. याशिवाय आपल्याच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला एक मुद्दा म्हणजे स्थलांतरितांचा. यापुढे अमेरिकेत गुणवत्तेवर आधारित स्थलांतर पद्धत स्वीकारण्यात येईल असे जाहीर करून त्यांनी या वादग्रस्त प्रश्नाबाबतही नरमाईचा सूर आळवला. याचा किमान भारतीयांना तरी फायदा होईल असे मानण्यास जागा आहे. अर्थात सुंभ काही प्रमाणात जळाला असला, तरी पीळ जळाला असे म्हणता येणार नाही. भाषणाचा सूर मवाळ असला, तरी चुकीची विधाने, खोटेपणा, अतिशयोक्ती या गुणांनी त्यांची अन्य भाषणे जशी संपृक्त असतात, तसेच हेही होते. उदाहरणार्थ, अमेरिकेतील पायाभूत सुविधा कोसळत असताना आपण तिकडे मध्य पूर्वेत सुमारे सहा ट्रिलियन डॉलर खर्च केले, हे त्यांचे विधान. मध्य पूर्वेत आतापर्यंत अमेरिकेचा खर्च झाला आहे १.६ ट्रिलियन डॉलर. मग हा आकडा कोठून आला, तर ट्रम्प यांनी त्यात भविष्यातील खर्चही धरला. अंकभ्रम निर्माण करून सामान्य नागरिकांना मूर्ख बनविण्याचाच हा प्रकार. तो त्यांनी जागोजागी केला. तरीही या भाषणामुळे – त्यात त्यांची नेहमीची सर्व ‘वैशिष्टय़े’, म्हणजे डिंगा मारणे, अतिशयोक्ती करणे, प्रत्येक गोष्टीला उच्चकोटी निदर्शक विशेषणे लावणे हे सर्व असले, तरी याच भाषणातून ते निवडणूक प्रचाराच्या स्थितीतून सत्ताधाऱ्याच्या अवस्थेत आले हे दिसले, हेही काही कमी नाही.