जनरल एंटरटेन्मेंट किंवा करमणूकप्रधान मालिका वा कार्यक्रम टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत घेऊन येणाऱ्या देशातील बहुतेक वाहिन्यांसमोर काही वर्षांपूर्वीपासूनच स्ट्रीमिंग व्हिडीयो किंवा ओटीटी या नवीन प्रकाराने कडवे आव्हान उभे राहिले होते. महाजाल जोडणी मिळालेल्या कोणालाही कोणत्याही स्थळी चित्रपट, मालिका पाहण्याची सोय करून देणाऱ्या ओटीटी रेट्यासमोर पारंपरिक टीव्ही मालिका दाखवणाऱ्या वाहिन्या कालबाह्य ठरू लागल्या होत्या. यात करोनाच्या उद्रेकाने अनेक वाहिन्यांचे कंबरडे मोडले. झी वाहिनी अशा जर्जर वाहिन्यांपैकी एक. शिथिलीकरणानंतर चित्रीकरणाची परवानगी मिळाल्यामुळे बहुतेक वाहिन्या पूर्वपदाकडे आस्तेकदम वाटचाल करू लागल्या असल्या, तरी घटलेल्या उत्पन्नाच्या परिप्रेक्ष्यात रोजचा गाडा हाकणे अधिकच आव्हानात्मक बनले आहे. भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर सुरू झालेली झी ही पहिली मुख्य प्रवाहातली खासगी वाहिनी. हिंदीव्यतिरिक्त इतर भाषांतही वाहिन्या सुरू करण्याचा धडाका झी समूहाचे प्रणेते सुभाष चंद्रा यांनी लावला. या क्षेत्रात त्यांच्यापाठोपाठ स्टार व नंतर सोनी अशा परदेशी कंपन्याही उतरल्या. याच दोनपैकी सोनी कंपनीने आता झी एन्टरटेन्मेंट एंटरप्रायझेसमध्ये अर्ध्याहून अधिक भागभांडवल खरीदले असून, झीवर जवळपास नियंत्रण मिळवले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कर्जाचा डोंगर वाढत गेल्यामुळे, तसेच एकाच कुटुंबाचे वर्चस्व असल्याचे काही ठरावीक दुष्परिणाम भोगावे लागल्यामुळे एखाद्या सहकाऱ्याच्या शोधात या वाहिनीचे इतर प्रवर्तक होतेच. आपल्या देशात बहुतेक कुटुंबांनी वाजतगाजत सुरू केलेल्या कंपन्यांची ‘सेंद्रिय वाढ’ होताना दिसत नाही हे देशातील कॉर्पोरेट आणि त्यांच्या मागावर कायम असलेल्या राजकीय संस्कृतीचेही अपयश. कारभारवृद्धीच्या नादात भलत्याच क्षेत्रांच्या वाटेला जाऊन, तेथील अपयशाने जर्जर होण्याची उदाहरणे देशात अनेक आढळतील. झी हे यापैकीच एक उदाहरण. कंपनीच्या मूळ प्रवर्तकांना बांधकाम उद्योगाकडे वळण्याची बुद्धी झाली. इतरही काही भारतीय कंपन्यांनी असे करून पाहिले. यामागे सरकारदरबारी वाढलेला प्रभाव हे मोठे कारण असल्याचे दिसून येते. एखाद्या पक्षाकडून राज्यसभेत खासदारकी मिळाली की व्यवसायवृद्धीसाठी स्वतंत्र प्रयत्न करावे लागत नाहीत ही भावना रुजल्यावर आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी आणि भविष्याचा वेध घेण्याची गरजच उरत नाही. आज टीव्ही वाहिन्यांच्या युगात देशात स्टार-डिस्ने आणि सोनी या सर्वांत अग्रणी कंपन्या परदेशी आहेत हा योगायोग नाही. करमणूकप्रधान मालिका, रिअ‍ॅलिटी शो आणि क्रिकेट या तीन क्षेत्रांभोवतीच याहीपुढे या वाहिन्यांचा खेळ सुरू राहणार आहे. झी आणि सोनी हे काही वर्षांपूर्वी कट्टर प्रतिस्पर्धी होते. नंतर मात्र विशेषत: झीला कर्जाच्या बोजापायी सहकारी आणि सहगुंतवणूकदार शोधणे भाग पडले. दुसरीकडे, सोनी वाहिनी केवळ भारतातच टीव्ही मालिका निर्मितीच्या उद्योगात आहे. इतरत्र क्रीडा, ओटीटी, चित्रपटनिर्मिती ही या वाहिनीची बलस्थाने आहेत. या दोन नाममुद्रांची एकत्रित कंपनी स्टार-डिस्नेपेक्षा मोठी असेल. ओटीटीच्या क्षेत्रात झी वाहिनीचा प्रवेश जरासा उशिरानेच झाला. पण त्यांच्या झी-५ या व्हीडिओ प्लॅटफॉर्मला अद्याप जम बसवता आलेला नाही. डिस्ने-हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन यांच्याकडे आढळणाऱ्या मालिका वा चित्रपटांच्या तुलनेत ‘झी-५’चा दर्जा सुमार आहे. या सगळ्या कॉर्पोरेट घडामोडींमध्ये लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, ओटीटी आणि करमणूक या दोन्ही क्षेत्रांमध्ये परदेशी कंपन्यांची मक्तेदारी सिद्ध झाली आहे. भारतीय कंपन्यांनी संधी गमावली असेच झी वाहिनीच्या विलीनीकरणात्मक विलयाच्या निमित्ताने म्हणावेसे वाटते. निखळ, निकोप स्पर्धा, कॉर्पोरेट मूल्ये यांच्या अभावामुळे असे घडल्याचे हे एकमेव उदाहरण मात्र नाही!