मासिक पाळीमुळे महिला अपवित्र होतात आणि म्हणून त्या काळात त्यांनी मंदिरात वा मशिदीत जाऊ  नये या केरळातील काँग्रेसचे नेते एम. एम. हसन यांच्या विधानाने खरे तर फार धक्का बसण्याचे कारण नाही. वर्षांनुवर्षे येथील कोटय़वधी लोक हाच समज बाळगून आहेत. अनेकांना हा भारतीय संस्कृतीचा आविष्कार वाटत आहे. काही सनातन्यांनी तर ही बाब वैज्ञानिकदृष्टय़ाही किती योग्य आहे हे सांगण्यात त्यांच्या पुस्तकांची आणि संकेतस्थळांची पानेच्या पाने खर्चिली आहेत. हे छद्म्विज्ञानच; परंतु त्याचा वापर करून येथील सर्वसामान्य, समाजमाध्यमांतून येणारे असे सारेच संदेश खरे असे मानणाऱ्या भोळ्याभाबडय़ांना उल्लू बनविण्याचे धंदे हल्ली जोरात सुरू आहेत. जुन्या परंपरा आणि रूढी यांना अशा प्रकारे विज्ञानाचा आधार आहे, असे सांगून त्या अधिक पक्क्या करता येतात, शिवाय त्याचबरोबर आपल्या पूर्वजांनी सारेच शोध कसे आधीच लावून ठेवले होते हेही सांगता येते. प्राचीन सामाजिक व्यवस्थांमध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात अशा लोकांसाठी हे सारे फायद्याचेच असते. या ज्या प्राचीन व्यवस्थेचे गोडवे हे सनातनी लोक गात असतात, त्या व्यवस्थेत महिला हा घटक नेहमीच पायी तुडवावा या पातळीवर राहिलेला आहे. गुरेढोरे असतात, तशी घरातील स्त्री. तिला पडद्यात ठेवावे किंवा बुरख्यात. तिच्या खाण्यापिण्यापासून लेण्यापर्यंत सर्व बाबतीत बंधने घालावीत आणि त्या सगळ्यावर पावित्र्याची छाप मारून ठेवावी. गुलामांना गुलामी पवित्र वाटू लागली की ते त्याविरोधात आवाज उठवीत नसतात. अशा गुलामांना मग मोठय़ा उत्साहाने शोभायात्रांमध्ये सामील करून घेतले जाते आणि त्यांच्याकरवीच मागासलेल्या विचारव्यवस्थेचे झेंडे नाचविले जातात. धार्मिक व्यवस्थेने अत्यंत खुबीने हे राजकारण केलेले आहे. त्यामुळे आजच्या आधुनिक काळात, आधुनिकतेचे सगळे फायदे घेणाऱ्या अनेक सुशिक्षित महिलांनाही मासिक पाळी म्हणजे काही तरी अपवित्र असेच वाटताना दिसते. योनिशुचितेच्या बुरसट कल्पनांना त्यांचीही मान्यता दिसते; किंबहुना स्त्री जन्म हाच वाईट अशी एक भावना त्यांच्या मनात घर करून असते. त्यामुळे केवळ मासिक पाळीच्या काळातच नव्हे, तर एरवीही शनिशिंगणापूरचा चौथरा असो वा हाजी अली दग्र्याचा अंतर्भाग असो, तेथे महिलांना प्रवेश नाकारला जातो. तेथे प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या काही महिलांना बदनाम केले जाते आणि त्यात महिलांचाच पुढाकार असतो. हे चित्र महाराष्ट्राने अनेकदा पाहिले आहे. तेव्हा हसन यांच्यासारखा नेता असे संतापजनक विधान करतो तेव्हा ते अजिबात धक्कादायक नसते. हा कोणत्या पक्षाचा वा धर्माचा याने काहीही फरक पडत नसतो. कारण तो असतो तो पुरुषप्रधान संस्कृतीचा पाईकच. वस्तुत: आपल्याकडील काही प्राचीन आणि अस्सल भारतीय विचारवंतांनीही स्त्रीभोवती विणलेल्या या तथाकथित पावित्र्याच्या कल्पनांना सुरुंग लावलेला आहे. ‘सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा विटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए :’ हे स्वामी चक्रधरांचे बोल. आठशे वर्षांपूर्वीचे. अशा महात्म्यांचे देव बनवायचे आणि त्यांचे सुविचार मात्र पायदळी तुडवायचे हा आपल्या सनातनी व्यवस्थेचा हातखंडा प्रयोग. तो किती यशस्वी ठरला आहे हेच हसन यांच्यासारख्यांच्या विधानांतून कधी कधी समोर येते. बाकी मग सारे सुशेगात सुरूच असते.. आणि तरीही आपण म्हणे आधुनिक असतो!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala congress chief mm hassan women are impure during menstruation marathi articles
First published on: 30-03-2017 at 02:57 IST