ब्रिटनमधील मँचेस्टर येथे झालेल्या स्फोटाची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असली, तरीही हा स्फोट ब्रिटनचाच रहिवासी असलेल्या सलमान अबेदी या युवकाने घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. २२ जण या घटनेत मृत्यू पावले आणि ५९ जण जखमी झाले. ही घटना लोकप्रिय पॉप गायिका अरियाना ग्रांदे हिच्या जाहीर कार्यक्रमात घडली.जागतिक पातळीवर निर्माण होत असलेल्या दहशतवादाची पाळेमुळे खणून काढून त्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी साऱ्या जगाने एकत्र येण्याच्या आणाभाका गेली किमान दोन दशके सुरू आहेत. अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यापूर्वी जगाच्या अनेक भागांत हा दहशतवाद आपल्या खुणा निर्माण करीत होता. मात्र या शतकाच्या प्रारंभीच झालेल्या त्या हल्ल्याने सारे जग हादरून गेले आणि तेव्हापासून हा विषय सातत्याने चर्चिला जात आहे. मुस्लीम दहशतवादाने साऱ्या जगाला पछाडले असताना, त्याला ठोस प्रत्युत्तर देणे हाच उपाय असल्याचे तेव्हा जागतिक नेत्यांचे मत होते. त्यातून अनेक देशांत या कडव्या अतिरेकास मिटवण्याची भाषा करणारे नवे नेतेही सत्तारूढ झाले. बाहेरून आयात होणारा हा दहशतवाद याच काळात जगातल्या सगळ्या देशांत फोफावत होता, तेव्हा त्याची मुळे स्थानिक पातळीवरही रुजत होतीच. ब्रिटनमधील स्फोट घडवून आणणारा अबेदी हा बाहेरून या देशात आलेला नव्हता. त्याला तेथेच राहून हा हल्ला करता आला. याचा अर्थ अशा कारवायांना स्थानिक पातळीवरच रसद पुरवली गेली होती असा होतो. केवळ  प्रत्येकाची कसून तपासणी करण्याने दहशतवादाला आळा घालता येत नाही, हे यापूर्वीही अनेकदा सिद्ध झाले आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये दहशतवादी विचारसरणीची मुळे पसरत असताना सहजपणे लक्षात येऊ शकत नाही, हे खरे असले, तरीही त्याचे उत्तर फक्त कडक सुरक्षेतच नाही, याचे भान आता जगाला यायला लागले आहे. म्हणूनच हा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याबरोबरच देशांतर्गत संवादाची प्रक्रिया सुरू ठेवणे अत्यंत आवश्यक ठरणारे आहे. अंतर्गत दहशतवादाचा प्रश्न सोडवण्याचे मार्ग दीर्घकालीनच असणार हे लक्षात घेऊन त्यासाठी उपाययोजना करण्याशिवाय आता पर्याय नाही. गेली काही वर्षे आयसिस आणि अल् कायदासारख्या संघटनांमध्ये अंतर्गत वर्चस्वाचे वाद सुरू आहेत. आयसिसने अल् कायदासारख्या संघटनेला जवळजवळ संपवत आणले आहे. सीरियापासून ते पाकिस्तानपर्यंत या संघटनेने आपले जाळे दिवसेंदिवस बळकट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिक रहिवाशांमध्ये शिरून त्यांना आपल्या विचारप्रणालीमध्ये गुंतवण्याचे काम करणाऱ्या या संघटनांनी गेल्या दीड दशकात जागतिक दहशतवादाचे स्वरूपच बदलून टाकले आहे. मँचेस्टरचा हल्ला आपणच केल्याचा दावा करून आयसिसला आपले वर्चस्व जाहीर करण्यातच अधिक रस आहे, हे तर उघडच आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर अशा संघटनांचे प्रादेशिक स्वरूप पालटणे अपरिहार्य होते. त्यामध्ये माहिती क्षेत्रातील क्रांतीने घातलेली भरही तेवढीच महत्त्वाची ठरली आणि संपर्क माध्यमांच्या जाळ्याने दहशतवादाने प्रेरित झालेल्या सगळ्यांना क्षणार्धात एकत्र आणणेही सोपे झाले.  या सगळ्या कारवायांसाठी लागणारा प्रचंड पैसा आणि शस्त्रास्त्रे पुरवणारे देशही जगात असल्याने, ते केवळ धार्मिक युद्ध राहिले नाही. अनेक प्रकारचे हिशेब चुकते करण्यासाठी या संघटनांना वापरणाऱ्या देशांना त्याची झळ जोवर बसत नाही, तोवर हा प्रश्न अक्राळविक्राळ रूप धारण करीत राहणार आहे. जगातल्या सगळ्या नागरिकांना, अशा दहशतवादाने घाबरवून टाकण्याचे कारस्थान उलथून टाकण्यासाठी जनतेमध्ये विश्वास  निर्माण करण्याचे वातावरण तयार करणे हेही आता सगळ्यांसमोर मोठे आव्हान आहे. त्यासाठी विकासाची फळे सामान्यांपर्यंत पोहोचण्याबरोबरच सर्व पातळ्यांवरील संवादातून विश्वास निर्माण करणे हा मार्ग असू शकतो. ब्रिटनमधील स्फोटाने पुन्हा एकदा साऱ्या जगाला भीतीच्या छायेत ढकलले असताना, दीर्घकालीन उपाययोजनांवर लक्ष ठेवणे म्हणूनच आवश्यक ठरणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manchester terror attack marathi articles
First published on: 25-05-2017 at 03:47 IST