टी-२० विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय संघातील एकमेव मुस्लीम क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या निष्ठेविषयी देशातील काही धर्माध जल्पकांनी शंका घेणे, यात नावीन्य नाही. कारण उजाडमती, उनाडनीती रिकामटेकडय़ांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा करणे हे आपल्याच अपरिपक्वतेचे लक्षण ठरू शकते. प्रश्न त्यांनी काय केले, हा नाही. शमीच्या बाजूने त्या सामन्यानंतरच्या दिवशी सचिन तेंडुलकर, वीरेंदर सेहवागसारखे माजी क्रिकेटपटू आणि यजुवेंद्र चहलसारखे मोजके विद्यमान क्रिकेटपटू उभे राहिले आणि व्यक्त झाले. परंतु भारतीय संघातील एकाही क्रिकेटपटूला या मुद्दय़ावर व्यक्त व्हावेसे वाटले नाही. भूमिका घेण्यात काही अडचण असेल असेही दिसत नाही. कारण प्रस्तुत सामन्याच्या सुरुवातीला ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या (अमेरिकेत उगम पावलेल्या) वर्णद्वेषविरोधी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आठवणीने आपले क्रिकेटपटू एका गुडघ्यावर बसून व्यक्त झालेच. त्या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानी नाबाद फलंदाजांना खिलाडू वृत्तीने आलिंगन दिले याचीही चर्चा झाली. या मंडळींकडून मोहम्मद शमीवर होत असलेल्या विषारी टीकेबाबत ठाम भूमिका घेण्याविषयी अपेक्षा बाळगणे अजिबात चुकीचे नाही. मोहम्मद शमी हा अत्यंत गुणी आणि मेहनती गोलंदाज. जसप्रीत बुमराप्रमाणेच त्यानेही अनेक महत्त्वाचे सामने एकहाती जिंकून दिलेले आहेत, असे त्याच्याविषयी सहानुभूती व्यक्त करणाऱ्या काहींनी म्हटले आहे. त्यात थोडी चलाखी दिसते. म्हणजे शमीचा हा पहिलाच सामना असता, तरी त्याच्यावरील टीका अजिबात समर्थनीय ठरत नाही. अशा प्रकारे धर्म उपस्थित करणारी प्रवृत्ती आणि  ती फोफावणे याला अलीकडे निष्कारण राजकीय अधिष्ठानही लाभत आहे हा खरा चिंतेचा विषय ठरतो. तो हेरून याबाबत भूमिका घेण्याची अपेक्षा विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून होती. ती त्यांनी घेतली नाही हा इच्छाशक्तीचा अभाव म्हणावा की धैर्याचा? काही दिवसांपूर्वी भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने त्याच्या पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्यावर होणाऱ्या टीकेविषयी  आचरट जल्पकांना सुनावले होते. विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या क्रिकेटपटूंचे समाजमाध्यमांवर असंख्य चाहते आणि अनुगामी (फॉलोअर) आहेत. त्यांनी खणखणीत भूमिका घेतल्यास, योग्य तो संदेश पोहोचू शकतो. पण या मंडळींनी समाजमाध्यमांवर अशी भूमिका घेण्याचे नेहमीच टाळलेले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात ‘बीसीसीआय’ने शमीचे छायाचित्र प्रसृत करून जुजबी सहानुभूती व्यक्त केली, तेही मंगळवारी म्हणजे दोन दिवसांनी! शमीविषयी पाठिंब्याची ट्वीट्स प्रसृत होत असताना सोमवारी बीसीसीआयने आयपीएलमधील दोन नव्या फ्रँचायझींच्या लिलावाविषयी माहिती देण्यात धन्यता मानली! मध्यंतरी युरो-२०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इटलीविरुद्ध पेनल्टीवर गोल करण्यात अपयशी ठरल्यानंतर इंग्लंडच्या गौरेतर फुटबॉलपटूंना समाजमाध्यमावरून अश्लाघ्य वर्णद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे लागले. त्या वेळी इंग्लिश फुटबॉल संघटना या फुटबॉलपटूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि याविषयी नि:संदिग्ध शब्दांत समाजमाध्यमांवर व्यक्तही झाली. भूमिका घेण्यासाठी अशी संवेदनशीलता आणि हिंमत असावी लागते. अन्यथा उरते निव्वळ प्रतीकात्मकता आणि संवेदनहीनता. आता शमीला खरोखरच भारतातून लक्ष्य केले गेले होते का वगैरे फालतू शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. धर्माचा मुद्दा पाकिस्तानी खेळाडू, राजकारण्यांनीही कसा उपस्थित केला वगैरे युक्तिवाद सुरू आहेत. मूळ समस्या ज्यांना मान्य करायचीच नाही किंवा तिच्याविषयी आक्षेपार्ह ज्यांना काही वाटत नाही, अशी मंडळीच या प्रकारच्या पळवाटा काढत असतात. हे चित्र बदलण्याची संधी आपल्या क्रिकेटपटूंना होती, जी त्यांनी दवडली. यात जल्पकांपेक्षाही त्यांची शोभा अधिक झाली.