(१) रात्री गुन्हेगारी कारवाया करणारे दिवसा गोरक्षकाचा मुखवटा ओढून घेतात. त्यांनी गोरक्षणाची दुकाने थाटली आहेत. हे पाहून संताप येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(२) राज्य सरकारांनी अशा गोरक्षकांचे अहवाल बनवावेत, त्यामध्ये ८० टक्के गोरक्षक हे समाजकंटक असल्याचे आढळेल.. ही दोन्ही विधाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ ऑगस्ट रोजी  काही हजार श्रोत्यांपुढे  केली असल्याची आठवण गोरक्षकांनी पुन्हा एकदा मनुष्यहत्या केल्यामुळे काढली जाते आहे. मोदींचा तो कार्यक्रम महाजालावरून तसेच काही चित्रवाणी वाहिन्यांमार्फत थेट प्रसारित झाला असल्याने आणखीही लाखो जणांनी पाहिला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, ७ ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेशातील मेडक येथे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या एका प्रकल्पाचे उद्घाटन करताना ‘गोरक्षक’ आणि ‘गोसेवक’ असा फरक सांगितला. ‘गोसेवक’ चांगले काम करतात आणि देशाचे नाव खराब करणाऱ्या तथाकथित ‘गोरक्षकां’चे पितळ ‘गोसेवकां’नी उघडे पाडावे, असे आवाहनही मोदी यांनी केले. सलग दोन दिवस आपल्या देशाचे पंतप्रधान गोरक्षकांना धुत्कारत होते. याचे कारण घडले होते २०१६ सालच्या ११ जुलै रोजी- म्हणजे २५ दिवसांपूर्वी; परंतु परिणाम दिसला दहाच दिवसांत : १७ ऑगस्ट रोजी. हे कारण म्हणजे गुजरातेत मेलेल्या गाईंचे कातडे कमावणाऱ्या दलितांना गोरक्षकांनी उन्मादात केलेली मारहाण. मात्र पंतप्रधानांच्या वक्तव्यांनंतर दहाच दिवसांत, भारतीय जनता पक्षाचे केंजूर (जि. उडिपी, कर्नाटक) येथील ग्राम स्थायी समिती प्रमुख प्रवीण पुजारी यांना प्राण जाईपर्यंत मारहाण करण्याचे काम ‘हिंदू जागरण वेदिके’चे कार्यकर्ते म्हणवणाऱ्या जमावाने केले. प्रवीण पुजारी यांच्याहीवर ‘गाई चोरटय़ा मार्गाने कत्तलखान्याकडे नेल्या’चा ठपका या स्वघोषित गोरक्षकांनी ठेवला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गोरक्षक, गोसेवक, गोभक्त असा शब्दच्छल कधीही जाहीरपणे केलेला नाही. उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात तर नाहीच नाही. हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यांत ‘गोरक्षक’ त्यांचे काम करीतच राहिले.  दुसरीकडे, भाजपच्या तमाम नेत्यांशी फटकून आपले निराळेच संस्थान असल्याच्या थाटात राज्य करणाऱ्या राजस्थानच्या पुरोगामी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनीदेखील एकदाही गोरक्षकांविषयी कोणतीही टिप्पणी न करण्याचे पथ्य जपले आहे. राजस्थानातील गोरक्षकांच्या लढाऊ संघटनांतील सदस्य हे आम्हाला सरकारची मदत  मिळते, असा दावा करत असल्याच्या बातम्या मार्चअखेरीस ‘इंडियन एक्स्प्रेस’सह काही इंग्रजी वृत्तपत्रांनी दिल्या होत्या, तेव्हा त्यांचा प्रतिवाद करण्याचा उपचारसुद्धा राजस्थान सरकारातील कोणीही पार पाडला नाही. हरयाणाहून राजस्थानात दुभती गाय खरेदी करण्यासाठी येऊन, खरेदी केलेल्या गाईची वाहतूक परवान्यासह करणारा पेहलू खान हा इसम अल्वार जिल्ह्य़ात गोरक्षकांच्या मारहाणीत प्राणास मुकल्याचे प्रकरण १ एप्रिल रोजी घडल्याची बातमी तिच्या पाठपुराव्यासह प्रसारमाध्यमे देत असताना, तपशील पुरवत असतानाही ‘गोरक्षकांनी काम चांगले केले, पण कायदा मोडला,’ असे राजस्थानच्या गृहमंत्रिपदावरून गुलाबचंद कटारिया म्हणतात, ‘अल्वार येथे असा प्रकार घडलेलाच नाही,’ असे संसदेची दिशाभूल ठरू शकणारे विधान राज्यसभेत संसदीय कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नकवी करतात, तेव्हा हे गोरक्षकांच्या लांगूलचालनाची लक्षणेच स्पष्ट होऊ लागतात. एखादा अल्पसंख्य घटक योग्य मार्गावर नसूनही त्याला पाठीशी घालणे, त्या घटकासाठी कायदे फिरवणे आणि त्या घटकाच्या आगळिकींकडे दुर्लक्ष करणे ही लांगूलचालनाची गंभीर लक्षणे आहेत. गोरक्षकही सध्या संख्येने अल्पच आहेत.

 

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi remark that 80 percentage gau rakshaks are fake
First published on: 07-04-2017 at 04:45 IST