इंटरसव्र्हिसेस इंटेलिजन्स अर्थात आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाची नुकतीच तडकाफडकी बदली करण्यात आली व त्याजागी नवीन प्रमुखाची नियुक्तीही तितक्याच घाईने झाली. लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांना आयएसआयच्या प्रमुखपदावर (कागदोपत्री महासंचालक) आठ महिने राहू दिल्यानंतर त्यांची बदली आता गुजरानवाला कोअरच्या प्रमुखपदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयएसआयचे नवे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयएसआयच्या प्रमुखपदावर इतका कमी काळ कारभार पाहिलेले असीम मुनीर हे पहिले आणि एकमेव. फैझ हमीद हे आजवर पाकिस्तानी लष्कराचा गुप्तवार्ता विभाग सांभाळत होते. गेला काही काळ पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या विशेष मर्जीतले अधिकारी असा फैझ यांचा लौकिक होता. हे दोघेही बलोच रेजिमेंटचे आहेत हा योगायोग नसावा. असीम मुनीर यांच्या उचलबांगडीविषयी विविध तर्कटे मांडली जात आहेत. त्यात त्यांच्या अमदानीत पुलवामा हल्ला घडला आणि त्यातून त्यांची घसरण सुरू झाली हे एक. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात बऱ्यापैकी तणाव निर्माण झाला होता. जैश ए मोहम्मदच्या हस्तकांना आवर घालण्यात असीम कमी पडले आणि त्यातून त्यांना जावे लागले, असेही काही विश्लेषकांना वाटते. फैझ हमीद हे दोन महत्त्वाच्या घडामोडींच्या केंद्रस्थानी होते. त्यात त्यांनी बजावलेल्या कामगिरीचे फळ म्हणून आयएसआयचे प्रमुखपद त्यांना मिळाले, अशी चर्चा आहे. यातली पहिली घटना होती इस्लामाबादच्या वेशीवर २०१७मध्ये झालेल्या धरणे आंदोलनाची आहे. तेहरीक-इ-लबैक पाकिस्तान या संघटनेच्या हस्तकांनी इस्लामाबादकडे जाणारा रस्ता रोखून पाकिस्तानच्या राजधानीची नाकेबंदी केली होती. तत्कालीन नवाझ शरीफ सरकारच्या कायदामंत्र्यांना त्या वेळी राजीनामा द्यावा लागला, इतकी परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्या वेळी आयएसआयच्या अंतर्गत सुरक्षा विभागाचे प्रमुख या नात्याने फैझ हमीद यांनी सरकार आणि आंदोलकांमध्ये समेट घडवून आणला होता आणि त्यामुळे शरीफ सरकारवरील मोठे संकट टळले होते. फैझ हमीद यांनी २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांची तेहरीक-इ-इन्साफ पार्टी सत्तेवर येण्यासाठी ‘मोलाची कामगिरी’ बजावली होती, असा दावा आयएसआयचे टीकाकार करतात. पाकिस्तान मुस्लीम लीगचे काही नेते फैझ यांच्याच सांगण्यावरून फुटून तेहरीकला येऊन मिळाले, असा शरीफ समर्थकांचा आरोप आहे. त्यांना आयएसआयची मनसब लाभणार याची कुणकुण विश्लेषकांना एप्रिलमध्येच लागली होती. त्या वेळी त्यांना मेजर जनरल पदावरून लेफ्टनंट जनरल पदावर बढती मिळाली होती. त्यांचे पूर्वसुरी असीम मुनीर यांना पुलवामापेक्षाही पख्तून आंदोलन हाताळण्यात आलेले अपयश त्यांच्या गच्छंतीसाठी कारणीभूत ठरले असावे अशी शक्यता आहे. फैझ हमीद यांची रोखठोक कार्यपद्धती हा प्रश्न व्यवस्थित सोडवू शकेल, असे पाकिस्तानी लष्करी धुरीणांना वाटत असावे. भारतासाठी या घडामोडीतून नेमका बोध घेणे सोपे नाही. पाकिस्तान सध्या आर्थिक अरिष्टातून जात आहे. यातून जनतेत खदखदणाऱ्या असंतोषाचा फायदा उचलण्यासाठी पाकिस्तान मुस्लीम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी एकत्र आले आहेत. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठीच फैझ हमीद यांच्या हाती आयएसआयची सूत्रे सोपवण्यात आली असल्याची चर्चा असून ती सर्वाधिक पटण्यासारखी आहे. देशांतर्गत घडामोडींवर लक्ष ठेवण्याला फैझ आणि आयएसआय प्राधान्य देतील आणि भारताच्या कुरापती तूर्त काढणार नाही असे समजणाऱ्यांना दक्षिण काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांत झालेल्या हल्ल्यांचे स्मरण करून देणे पुरेसे ठरेल.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2019 रोजी प्रकाशित
आयएसआय : बदलले काय?
जैश ए मोहम्मदच्या हस्तकांना आवर घालण्यात असीम कमी पडले आणि त्यातून त्यांना जावे लागले
Written by लोकसत्ता टीम

First published on: 20-06-2019 at 05:01 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan appoints gen faiz hameed as isi spy agency chief