केवळ संघ परिवारातीलच नव्हे, तर अभिनिवेश बाजूला ठेवून व्यक्तिस्वभावाचा अभ्यास करणाऱ्या कोणासही, समर्पित वृत्तीचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून अशोक सिंघल यांच्याकडे बोट दाखवावे लागेल. नव्वदच्या दशकात, ‘सिंघल’गर्जनेने आकृष्ट होऊन हजारो तरुणांनी अयोध्येतील रामजन्मभूमी आंदोलनात स्वत:ला झोकून दिले होते. स्वत: सिंघल मात्र स्वत:ला संघविचारांचा प्रचारकच मानत होते. धार्मिक वृत्तीच्या कुटुंबात जन्मल्यामुळे साहजिकच धार्मिक संस्काराची शिदोरी सोबत घेऊन वाढलेल्या अशोक सिंघल यांना नववीत असतानाच महर्षी दयानंद सरस्वती यांच्या विचारांनी प्रभावित केले. १९४२ च्या दरम्यान राजेंद्र सिंह यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते दाखल झाले आणि एका संघसमर्पित जीवनाचा प्रारंभ झाला. लहानपणापासून संगीतात रमणाऱ्या या नेत्याने संघशाखेवर गायिल्या जाणाऱ्या असंख्य स्फूर्तिगीतांना सुरांचा साज चढविला. १९४८ मधील संघबंदीच्या विरोधात सत्याग्रह करून तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर येताच आपली अभियांत्रिकीची पदवी परीक्षा देऊन पूर्णवेळ प्रचारक म्हणून त्यांनी संघाला आपले जीवन समर्पित केले. वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेईपर्यंत या निर्धाराची धार जराही कमी झाली नाही, हे या समर्पित, ध्येयासक्त जीवनाचे वेगळेपण ठरले. वेदांचा सांगोपांग अभ्यास असलेल्या सिंघल यांचे संघाचे द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर (गुरुजी) यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे, मैत्रीपूर्ण संबंध होते. आणीबाणीच्या काळात संघाच्या अनेक नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अशा परिस्थितीत संघकार्य सुरू राहावे यासाठी अन्य उपक्रमांची आखणी करण्याची गरज अधोरेखित झाली आणि विश्व हिंदू परिषद, धर्मजागरण, गोसेवा प्रकल्प, संस्कृतसंवर्धन अशा उपक्रमांनी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून पाठबळ देण्याची योजना आखून त्याची जबाबदारीही त्यांनी उचलली. रामजन्मभूमी आंदोलनाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारा कल्पक संघटक ही त्यांची ओळख कायमची अधोरेखित झाली. अशोक सिंघल हा अयोध्या आंदोलनाचा कणखर आणि निश्चयी चेहरा बनला. १९९० मध्ये उत्तर प्रदेशचे तेव्हाचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी आंदोलन दडपण्यासाठी सारी ताकद पणाला लावली होती. आपल्या परवानगीखेरीज आकाशातील पक्षीदेखील आत येऊ शकणार नाही, अशी दर्पोक्ती करणाऱ्या मुलायमसिंगांच्या आणि त्यांच्या पोलीस दलाच्या हातावर तुरी देऊन अशोक सिंघल अयोध्येत दाखल झाले. रामजन्मभूमीबाबत नंतर झालेल्या राजकारणाचा मथितार्थ काहीही असो, अशोक सिंघल यांनी मात्र हे आंदोलन पूर्ण ताकदीने पुढे रेटले आणि मंदिर बनविण्याच्या सर्वोच्च प्राधान्याचा आग्रहदेखील कायम ठेवला. या आंदोलनातूनच हिंदुत्वाच्या नावाने एक आक्रमक चळवळ अशोक सिंघल यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. कणखर आंदोलकाचे एक रूप असलेल्या या चेहऱ्याचे दुसरे रूप मात्र लाघवी, माणसांवर प्रेम करणारे आणि माणसाला आपलेसे करणारे असे होते. या आंदोलनातून त्यांनी भाजपला सत्तेच्या जवळ नेऊन उभे केले, पण भाजपने सिंघल यांना मात्र नंतर काहीसे लांबच ठेवले. पण राजकारण हा त्यांच्या जगण्याचा पिंडच नव्हता. सेवा, समर्पण आणि सहनशीलता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या सिंघल यांनी संन्यस्त वृत्तीने अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या निश्चित केलेल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली होती. त्यामुळेच, ‘समर्पणाचे दुसरे नाव’ अशी त्यांची ओळख समाजजीवनात कायमच राहील.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2015 रोजी प्रकाशित
समर्पणाचे दुसरे नाव!
स्वत: सिंघल मात्र स्वत:ला संघविचारांचा प्रचारकच मानत होते.
Written by रत्नाकर पवार

First published on: 19-11-2015 at 01:15 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile of ashok singhal