अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा पहिला टप्पा बुधवारी रात्री अपेक्षेनुसार पार पडला. अमेरिकी संसदेच्या (काँग्रेस) दोन सभागृहांपैकी एक असलेल्या प्रतिनिधिगृहात दोन मुद्दय़ांवर अध्यक्षांविरोधात महाभियोग चालवला गेला. काय होते ते दोन मुद्दे? पहिला मुद्दा होता अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा. ट्रम्प यांचे राजकीय विरोधक, तसेच २०२० अध्यक्षपद निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार ज्यो बिडेन आणि त्यांच्या पुत्राची चौकशी करण्यासाठी युक्रेनच्या अध्यक्षांवर दबाव आणल्याचा ठपका ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला होता. दुसरा मुद्दा या प्रकरणी तपासादरम्यान काँग्रेसच्या व्यवहारात अडवणूक करण्याचा होता. दोन्ही मुद्दय़ांवर प्रतिनिधिगृहात मतदान झाले. पहिल्या मुद्दय़ावर महाभियोग ठरावाच्या बाजूने २३० विरुद्ध १९७, तर दुसऱ्या मुद्दय़ावर ठरावाच्या बाजूने २२९ विरुद्ध १९८ अशी मतविभागणी झाली. दोन्ही ठराव संमत होणे अपेक्षित होते; कारण या सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे. अशा प्रकारे महाभियोग चालवला गेलेले ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील तिसरेच अध्यक्ष ठरतात. पण महाभियोग चालूनही पुढील अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळणारे ते पहिले अध्यक्ष ठरतील, हे जवळपास निश्चित आहे. एकाही रिपब्लिकन नेत्याने बुधवारी ठरावाच्या बाजूने मतदान केलेले नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या पुढाकाराने जवळपास डझनभर साक्षीदारांच्या जबान्या, काही आठवडय़ांच्या सुनावण्या आणि हजारो पानांचे पुरावे सादर झाल्यानंतर महाभियोगाच्या ठरावांवर मतदान होऊ शकले. पण हा केवळ एक टप्पा आहे. ट्रम्प यांच्याविरोधात पूर्ण महाभियोग चालवून त्यांना पदच्युत करण्यासाठी सिनेटची मंजुरी आवश्यक आहे. तिथे रिपब्लिकनांचे बहुमत आहे. अमेरिकेच्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तेथेही सुनावणी होईल. १०० सदस्यीय सिनेट सभागृहात अध्यक्षांविरोधात महाभियोग पूर्णत्वाला नेण्यासाठी (पदच्युत करण्यासाठी) दोनतृतीयांश बहुमताने संबंधित ठराव संमत होणे अनिवार्य असते. सिनेटमध्ये सध्या ५३ रिपब्लिकन सदस्य आहेत नि ४५ डेमोक्रॅटिक सदस्य आहेत. दोन सदस्य डेमोक्रॅट्सच्या बाजूचे आहे. तरीही दोनतृतीयांश बहुमतासाठी आणखी २० रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या बरोबरीने मतदान करणे आवश्यक आहे. परंतु इतक्या मोठय़ा प्रमाणात ट्रम्प यांच्याविरोधात त्यांच्या पक्षात विरोध अजिबातच नाही. त्यांच्या पक्षात ट्रम्प यांना ठोस विरोध होऊ शकेल, असा पर्यायी नेता आजघडीला नाही. किंबहुना, असा पर्यायी नेता डेमोक्रॅटिक पक्षातही नाही हे उघड गुपित आहे. महाभियोगासंदर्भात इतके दिवस सुनावणी सुरू असतानाही ट्रम्प यांच्या लोकप्रियतेच्या टक्केवारीत अजिबात घट झालेली नाही. ट्रम्प हे राजकीय ध्रुवीकरणाच्या बळावर निवडून आले. या ध्रुवीकरणात २०१६ मध्ये ट्रम्प यांच्याकडे त्यांच्या डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा काही राज्ये अधिक होती. ही परिस्थिती फारशी बदललेली नाही. तेव्हा महाभियोगाचा महाठपका अमेरिकेच्या सध्याच्या किंवा नजीकच्या राजकीय पटामध्ये फार बदल करेल ही शक्यता नाही. ट्रम्प यांच्यावर ज्या पातकाबद्दल महाभियोग चालवला गेला, त्यापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाची किती तरी पातके त्यांच्या नावावर आहेत. लैंगिक अधिक्षेप असो वा हवामान परिषदेविषयी घेतलेली अत्यंत बेजबाबदार भूमिका, निर्वासितांविषयीचे हृदयशून्य धोरण वा पश्चिम आशियातील विध्वंसक भूमिका असो, यांपैकी कशावरही डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलेला नाही. महाभियोगावर मतदान झाल्यानंतर ट्रम्प यांच्या वतीने एक हास्यास्पद ट्वीट प्रसृत झाले : ‘ते माझ्या नव्हे, तुमच्या दिशेने चाल करून येत आहेत. मी केवळ वाटेत उभा आहे!’ पण निम्म्या अमेरिकी मतदारांना ते हास्यास्पद वाटत नाही, हे वास्तव नाकारणार कसे?