भारतातील नि:संशय महानतम कुस्तीपटू आणि महानतम ऑलिम्पियनांपैकी एक अशी दुहेरी बिरुदे आजवर अभिमानाने मिरवणारा सुशील कुमार एका बेसावध क्षणी खलनायक व्हावा, ही बाब असंख्य क्रीडारसिकांसाठी क्लेशकारक म्हणावी अशीच. भारतात मुळात ऑलिम्पिक पदकविजेते कमी, तशात एक नव्हे तर दोन-दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा सुशील हा अब्जातून एखादाच! २००८ मधील बीजिंग स्पर्धेत कांस्य आणि २०१२ मधील लंडन स्पर्धेत रौप्य अशी त्याची दुहेरी कामगिरी. १९५२ मध्ये खाशाबा जाधवांनी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले; परंतु त्यानंतर या अस्सल देशी खेळामध्ये दुसरा पदकवीर निर्माण होण्यासाठी ५६ वर्षे लोटावी लागली. हा सगळा प्रवास विलक्षण कष्टाचा आणि सबुरीची परीक्षा पाहणारा खराच. पण तो करण्यासाठी ग्रामीण भारतात कुस्तीपटूंची उणीव कधीच भासली नव्हती. या सगळ्या कुस्तीपटूंसमोर आदर्श होता सुशील कुमारचा. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. एका उदयोन्मुख कुस्तीपटूला – सागर धनखार – आपल्या साथीदारांसह बेदम मारहाण करून खून केल्याचा गंभीर आरोप सुशीलवर आहे. विशेष म्हणजे आपली दहशत इतरत्र पुरेपूर पसरावी यासाठी या घटनेचे चित्रीकरणही सुशीलने करवले अशी चर्चा आहे. ते सत्य असल्यास इतक्या विकृत मनोवस्थेपर्यंत हा कुस्तीपटू कसा पोहोचला याचा शोध घ्यावा लागेल. मारहाण करून झाल्यानंतर सुशील आणि त्याच्या साथीदारांतील हिंमत संपुष्टात आली, कारण पोलिसांना गुंगारा देत तो पाच राज्यांमधून निसटत राहिला. पण अखेरीस सापडला, त्या वेळी एखाद्या सर्वसामान्य गुन्हेगारांप्रमाणे त्याला सर्वासमक्ष हजर करण्यात आले. त्याही वेळी सुशीलच्या नजरेत पश्चात्तापाचा लवलेश नव्हता हे कटू वास्तव आहे. या प्रकरणातून कदाचित तो सहीसलामत सुटेलही. भारतात मुळातच खुनाचा गुन्हा सिद्ध होणे अत्यंत अवघड असते. तशात अशी व्यक्ती सुशील कुमारसारखी प्रभावी असल्यास, दोषी ठरण्याची बाब दुर्मीळातून दुर्मीळ. परंतु या प्रकारानंतर सुशील कुमारविषयी काही तरी ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे असे कुस्ती संघटना आणि क्रीडा मंत्रालयाला वाटले पाहिजे. दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता असल्यामुळे पुढील अनेक स्पर्धासाठी स्वत:चा प्रवेश ग्राह्य़ धरणे, पात्रता कुस्त्यांमध्ये सहभागीच न होणे, नरसिंह यादवसारख्या आणखी एका उदयोन्मुख कुस्तीपटूचा प्रतिस्पर्धी असूयेतून छळ करणे असले अनेक प्रकार तो करत आला आहे. शिक्षण आणि संस्काराच्या अभावातून हे घडत गेल्याची अत्यंत शहाजोग आणि एकतर्फी मीमांसा यासंदर्भात केली जाते. वास्तव वेगळे आहे. ते आपल्याकडील व्यक्तिपूजेच्या संस्कृतीत दडलेले आहे. स्वप्रतिमेच्या पलीकडे पाहायला सुशील कुमार स्वत:ही तयार नव्हता आणि इतरांनाही पाहू देत नव्हता. आपल्याकडे क्रिकेट, हॉकीमध्ये अशा कुप्रवृत्ती आढळत होत्याच, कुस्तीमध्ये सुशीलच्या निमित्ताने आपल्याला त्यांची ओळख झाली इतकेच. सुशील कुमारला वेळच्या वेळी जाब विचारण्यात आणि त्याची जागा दाखवून देण्यात आपल्याकडील व्यवस्था कमी पडली. यातूनच क्षुल्लक वादातून छत्रसाल स्टेडियमसारख्या दिल्लीतील कुस्तीपंढरीत सागर धनखारसारख्यांना मरेपर्यंत मारहाण करण्यापर्यंत त्याची मजल गेली. देश, खेळापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत ही भावना अशा प्रकारच्या मुजोरीच्या मुळाशी असते. बीजिंगच्या त्या कुस्तीसंकुलात कांस्यपदक जिंकल्यानंतर आत्मभान विसरून, चेहऱ्यावर हात ठेवून लहान मुलासारखा हरखून गेलेला सुशील कुठे नि हा आजचा सुशील कुठे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wrestler sushil kumar arrested in murder case zws
First published on: 26-05-2021 at 00:28 IST