तुम्ही कसे आहात, यापेक्षा तुम्ही कसे दिसता हे महत्त्वाचे असण्याच्या काळात राजकीय पक्ष, त्यांची विचारधारा, त्यांचे नेते यांचेही ‘ब्रॅण्ड’ बनले नसते तर नवलच! साबणाच्या वडीची जाहिरात करावी त्या पद्धतीने आजकाल राजकीय नेत्यांची प्रसिद्धी केली जाते. त्यासाठी जनसंज्ञापनाची उपलब्ध ती सर्व नवी-जुनी साधने वापरली जातात. नेत्यांच्या प्रत्यक्षाहून उत्तुंग अशा प्रतिमा बनविल्या जातात. अशा ब्रॅण्डेड नेत्यांनाच मग करिश्माई वगैरे म्हटले जाते. यात लोकांची फसगत होते, तशीच नेत्यांचीही. आणि ते अधिक भयंकर आहे. जाहिरातबाजीचा हा सापळा सावजाइतकाच शिकाऱ्यासाठीही महाघातक आहे. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी पक्षाची आणि स्वाभाविकच पक्षनेत्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी हाती घेतलेले उपाय पाहता, ते अशाच प्रकारच्या सापळ्यात अडकत चालले आहेत की काय अशी शंका कोणाही सुज्ञास येईल. असाच सापळा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्वत:साठी तयार करून ठेवलेला आहे. ‘देशगुजरात.कॉम’सारखे वेबपोर्टल असो की, ग्रे वर्ल्डवाइड वा अ‍ॅप्को वर्ल्डवाइडसारखी जाहिरात कंपनी असो वा सोशल मीडियातील तैनाती फौज.. यांच्या साहाय्याने मोदी यांची जी उत्तुंग प्रतिमा तयार करण्यात आली आहे, तीच आज त्यांच्या महत्त्वाकांक्षांच्या वाटेतील वेगनियंत्रक बनताना प्रत्यही दिसते आहे. मोदी विरुद्ध राहुल अशी लढाई, काँग्रेसने कितीही नाकारली, तरी देशातील राजकीय पटलावर सुरू झालेली आहे. या युद्धात मोदींची प्रचारसेना ज्या तडफेने मध्यमवर्गीय लोकमानस काबीज करीत चाललेली आहे, ते पाहून काँग्रेसला घाम फुटणे साहजिकच होते. त्यातूनच बहुधा काँग्रेसने जनसंपर्क आणि जाहिरातविषयक समिती नेमली. दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने केलेल्या शिफारशींवरून राहुल गांधी यांनी पक्षाच्या ब्रॅण्डिंगसाठी काही समित्या नेमल्या आहेत. समाजमाध्यमांसह वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांत येणाऱ्या बातम्या, घटना यांवर नजर ठेवणे, पक्षीय मतांची माध्यमांतून पेरणी करणे, घटना-घडामोडींवर प्रतिक्रिया देणे अशी विविध कामे या समित्यांकडे सोपविण्यात येणार आहेत. त्यांना सल्ला देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष, पंतप्रधान, माहिती व प्रसारणमंत्री, पंतप्रधानांचे माध्यमविषयक सल्लागार असा संघ असणार आहे. काँग्रेस पक्षात यापूर्वीही अशी व्यवस्था  होतीच. पण ती राहुल गांधींना पसंत नव्हती. आताच्या या नव्या समित्या आणि कार्यगटांच्या माध्यमातून काँग्रेसच्या चेहऱ्याला पितांबरी लावण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. राहुल गांधी यांना पक्षाला आधुनिक करण्याची घाई झालेली आहे. त्यात वावगे काहीही नाही. प्रश्न एवढाच की, कोणत्याही प्रश्नावर समिती नेमण्याच्या सरकारी खाक्याने काम करून काँग्रेसच्या गढीचे गगनचुंबी टॉवर कसे होणार? समित्यांच्या माध्यमांतून आणि जाहिरातींतून खरेच प्रतिमासंवर्धन करता येते का? की अंतिमत: ते केवळ वरवरचे, आभासीच असते?  ‘शायनिंग इंडिया’चे काय झाले ते सर्वासमोर आहेच. राहुल गांधी यांना जनभावना समजून घेणे आणि बदलणे हे काम करायचे आहे. त्यासाठी त्यांची सर्व धडपड सुरू आहे आणि त्यासाठी ते प्रसार आणि समाजमाध्यमांवर अवलंबून आहेत असे दिसते. हे आभासी नेत्याचेच लक्षण म्हणावे लागेल.